25-Year-Old Man Killed for Stopping Holi Colours: होळीचा रंग लावण्यास नकार दिल्याच्या रागातून तिघांनी २५ वर्षीय तरुणाची गळा आवळून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. राजस्थानच्या दौसा जिल्ह्यात ही घटना घडली. याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध घेतला जातो आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, गुरुवारी रात्री ही घटना घडली. हंसराज असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे, तर अशोक, बबलू, कालूराम अशी आरोपींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, तिन्ही आरोपी गुरुवारी रात्री हंसराजच्या घरी त्याला होळीचा रंग लावण्यासाठी गेले होते. यावेळी हंसराजने अभ्यासाचं कारण ते रंग लावण्यास नकार दिला. त्यामुळे तिघांमध्येही शाब्दीक वाद झाला.
हा वाद इतका विकोपाला गेला, की आरोपींनी हंसराजच्या छातीवर लाथ मारली. त्यामुळे तो खाली कोसळला. त्यानंतर अन्य एका आरोपीने त्याला बेल्टने मारहाण केली. शिवाय रागाच्या भरात तिघांनी त्याचा गळा आवळला यातच त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे तिघांनी घटनास्थळावरून पळ काढला.
दरम्यान, याप्रकरणी हंसराजच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून तिघांविरोधात भारतीय न्याय संहितेंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांचाही शोध सुरु असून आरोपींना लवकरच ताब्यात घेण्यात येईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे.
या घटनेनंतर हंसराजच्या कुटुंबियांनी ५० लाख रुपये आणि कुटुंबातील सदस्याला सरकारी नोकरी मिळाली अशी मागणी केली आहे. या मागणीसाठी गावकऱ्यांनी रात्री १ वाजेपर्यंत राष्ट्रृीय महामार्गही रोखून धरला. त्यानंतर पोलिसांना हस्तक्षेप करत महामार्ग मोकळा केला.