मुंबई : भारतीय रेल्वेने एक नवा नियम बनवला आहे. यानुसार आता फक्त कन्फर्म तिकिट असलेल्या लोकांनाच देशातील 60 प्रमुख रेल्वे स्थानकांवर प्रवेश दिला जाणार आहे. स्थानकावरील गर्दी कमी करण्यासाठी आणि प्रवाशांची सुरक्षा वाढवण्यासाठी हा नियम लागू करण्यात येत आहे. विशेषत: सण, सुट्टी आणि गर्दीच्या काळात रेल्वे स्थानकांवर खूप गर्दी असते. त्यामुळे लोकांना खूप त्रास होतो. या नवीन नियमामुळे स्थानकावरील अनावश्यक गर्दी कमी होईल आणि प्रवाशांचा प्रवास अधिक सुकर आणि सुरक्षित होईल.
कोणत्या स्थानकांवर नियम लागू हा नियम सुरुवातीला 60 मोठ्या आणि व्यस्त रेल्वे स्थानकांवर लागू केला जाईल. यामध्ये नवी दिल्ली रेल्वे स्टेशन, मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, हावडा जंक्शन (कोलकाता), चेन्नई सेंट्रल आणि बेंगळुरू सिटी रेल्वे स्टेशनचा समावेश आहे. भविष्यात या नियमात गरजेनुसार आणखी स्थानके जोडता येतील.
प्रवाशांवर काय परिणाम आता ज्यांच्याकडे कन्फर्म तिकीट नसेल त्यांना स्थानकात प्रवेश दिला जाणार नाही. पूर्वी अनेक लोक आपल्या कुटुंबातील सदस्यांना सोडण्यासाठी किंवा घेण्यासाठी स्टेशनवर येत अस., त्यामुळे मोठी गर्दी होत असे. आता हे होणार नाही. काही लोकांना सुरुवातीला या नियमामुळे अडचणी येण्याची शक्यता आहे. परंतु दीर्घकाळात त्याचा फायदा होईल. त्यामुळे फलाटावरील गर्दी कमी होईल आणि ट्रेन पकडणे सोपे होईल.
रेल्वेचा उद्देश प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवास करणे हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीनंतर हा नियम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे रेल्वे स्थानकांवर चांगली व्यवस्था होईल आणि लोकांना प्रवास करणे सोपे होईल, असे अधिकाऱ्यांचे मत आहे.रेल्वेने प्रवाशांना त्यांच्या प्रवासाचे आगाऊ नियोजन करण्याची विनंती केली आहे आणि स्टेशनवर येण्यापूर्वी त्यांच्याकडे कन्फर्म तिकीट आहे की नाही ते तपासावे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे, जेणेकरून भविष्यात रेल्वे प्रवासाचा अनुभव अधिक चांगला होऊ शकेल.