पराग ढोबळे, साम टीव्ही
नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी येथे उड्डाणपुलावरून कार कोसळून झालेल्या अपघातात भावाचा मृत्यू तर बहीण गंभीर जखमी झाली आहे. भीषण अपघात बुटीबोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील बुटीबोरी येथील टी-पॉईंटवर घडला. भीषण अपघातात १८ वर्षीय अरिंजय अभिजित श्रावणे याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याची बहीण अक्षता अभिजित श्रावणे ही गंभीर जखमी झाली आहे.
येताना चालकाने चुकून चंद्रपूरकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या दिशेने गाडी वळवली. त्यानंतर हा अपघात झाल्याचं बुट्टीबोरी पोलिसांकडून सांगितलं जात आहे. नागपूरच्या सदर परिसरातील गांधी चौकात राहणारे सक्षम बाफना, हिमांशू बाफना आणि मानस बदानी (वय सुमारे २० वर्षे) हे तिघे होळीनिमित्त गेट-टुगेदरसाठी वर्धा येथे गेले होते. परत येताना अरिंजय आणि त्याची बहीण अक्षता यांना वर्धेतून सोबत घेतले.
नागपूरकडे येताना कार चालवताना चुकून चंद्रपूरकडे जाणाऱ्या उड्डाणपुलावर गाडी वळवली. रस्ता चुकल्याचे लक्षात आल्यानंतर चालक गोंधळला. त्यानंतर भरधाव वेगातील कार उड्डाणपुलाच्या कठड्याला धडकून रस्त्याचा कडेला गेली. अपघाताच्या वेळी कारमध्ये एकूण पाच प्रवासी होते, अशी माहिती बूटीबोरी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रतापराव भोसले यांनी दिली. या अपघातातील जखमींना नागपूरच्या किंग्ज वे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
धुळ्यात अपघातात तरुणाचा मृत्यूधुळ्यात खड्डेमय रस्त्यामुळे शिरपूर तालुक्यातील शिरपूर-वाघाडी रस्त्यावर तरुणाचा नाहक बळी गेला. शिरपूर तालुक्यातील शिरपूर-वाघाडी रस्त्यावर खड्ड्यांचे मोठ्या प्रमाणात साम्राज्य पसरले असल्यामुळे खड्डे वाचविण्याच्या नादात मध्य प्रदेश येथील परिवहन विभागाच्या बसने दुचाकीस्वराला चिरडले. या दुर्घटनेमध्ये दुचाकीस्वार पंचवीस वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला. या जखमी तरुणास उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर उपचारादरम्यान या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.