पुणे - मंगळवार पेठेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाची जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या विस्तारासाठी त्वरित द्यावी, अशी मागणी दलित बहुजन व आंबेडकर अनुयायांची आहे.
सामाजिक हिताच्या दृष्टिकोनातून या संवेदनशील व महत्त्वपूर्ण जागेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारीकरण समितीने केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे केली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनालगत मंगळवार पेठेतील सर्व्हे क्रमांक ४०५ मधील जागा विस्तारीकरणासाठी देण्याचा निर्णय २० जुलै २००० रोजी पुणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत झाला होता. पण ही जागा सप्टेंबर २०२४ पासून एका खासगी कंपनीला ६० वर्षासाठी भाड्याने देण्यात आली. यास विरोध झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाला स्थगिती दिली आहे.
या जागेत आंबेडकर भवनाचा विस्तार आणि डॉ. आंबेडकरांचे भव्य स्मारक व्हावे यासाठी पुण्याचे खासदार या नात्याने मोहोळ यांनी शासनाकडे पाठपुरावा करावा अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारीकरण समितीने केली आहे.
यावेळी माजी आमदार ॲड. जयदेव गायकवाड, ॲड. अविनाश साळवे, डॉ. सिद्धार्थ धेंडे, रोहिदास गायकवाड, परशुराम वाडेकर, संजय सोनावणे, शैलेश चव्हाण, राहुल डंबाळे, श्याम गायकवाड, महिपाल वाघमारे, युवराज बनसोडे आदी उपस्थित होते.