Randhir Jaiswal : दहशतवादाचे केंद्र जगाला माहिती; जयस्वाल, रेल्वेवरील हल्ल्यातील सहभागाचा इन्कार
esakal March 15, 2025 12:45 PM

नवी दिल्ली : बलुचिस्तानमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला करून त्यातील प्रवासी आणि सैनिकांना ओलिस ठेवल्याच्या घटनेत भारताचा हात नसल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानची कठोर शब्दांत कानउघाडणीही केली आहे. ही घटना कशामुळे घडली, याचे आत्मपरीक्षण करावे असा सल्लाही मंत्रालयाने पाकिस्तानला दिला आला. ‘‘वैश्विक दहशतवादाचे केंद्र कोठे आहे? याची साऱ्या जगाला माहिती आहे,’’ अशी टिपणीही परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी शुक्रवारी समाज माध्यमातून केली.

‘‘बलुच लिबरेशन आर्मीच्या (बीएलए) कारवायांसाठी तुम्ही भारताला दोष देता का?’’ असे जयस्वाल यांनी विचारले असता पाकिस्तानने भारतावरील आरोप आजही कायम असल्याची प्रतिक्रिया दिली होती. बीएलएचे दहशतवादी अफगाणिस्तानातील हँडलरच्या संपर्कात होते, असा दावाही त्यांनी केला होता.

आरोप निराधार

‘‘जाफर एक्स्प्रेसवरील हल्ल्याच्या संदर्भात पाकिस्तानने भारतावर अत्यंत निराधार आणि हास्यास्पद आरोप केले आहेत. स्वतःच्या देशातील अपयशाचे खापर इतर देशांवर फोडण्याच्या बाबतीत पाकिस्तान पारंगत झाला आहे. वास्तविक पाक हाच दहशतवादाला खतपाणी घालतो, ही वस्तुस्थिती आहे’’ असे जयस्वाल यांनी सांगितले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.