Manikrao Kokate: ''..तर माणिकराव कोकाटे अपात्र झाले असते अन् पोटनिवडणूक लागली असती'' कोर्टाचं निरीक्षण
esakal March 15, 2025 02:45 PM

Nashik Court: आर्थिक उत्पन्नाचे बनावट दस्तावेज तयार करून मुख्यमंत्र्यांच्या १० टक्के राखीव कोट्यातून सदनिका लाटल्याप्रकरणी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना २ वर्षांच्या तुरुंगवासाची आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा नाशिकच्या सत्र न्यायालयानं सुनावली होती.

शिक्षेला स्थगिती मिळावी, यासाठी कोकाटेंकडून कोर्टात अपिल करण्यात आलेलं होतं. कोर्टाने कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती दिली त्यामुळे त्यांचं मंत्रिपद वाचलं. मात्र कोकाटे यांच्या शिक्षेच्या स्थगितीचा निकाल देतांना कोर्टाचे महत्वाचं निरीक्षण केलं आहे, त्याचीच सध्या चर्चा सुरु आहे.

माणिकराव कोकाटे यांना ट्रायल कोर्टाने दिलासा देतांना म्हटलं की, त्यांना शिक्षा झाली असती तर ते अपात्र झाले असते. अपात्र झाले असते तर पोटनिवडणुक घ्यावी लागली असती आणि जनतेचा पैसा खर्च झाला असता. खर्च टाळण्यासाठी माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला ट्रायल कोर्टाने स्थगिती दिली.

सरकारी कोट्यातून कोकाटे यांनी चार घरं लाटली, त्याप्रकरणी त्यांना शिक्षा सुनावली होती. दोन वर्षांचा कारावास आणि ५० हजारांचा दंड असं शिक्षेचे स्वरूप होतं. मात्र कोर्टाने त्यांच्या शिक्षेला स्थिगिती दिली. ही ऑर्डर करताना कोर्टाने जी टिपण्णी केली, त्याची सध्या चर्चा सुरु आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.