Mumbai News: काय सांगता, मुंबई अंधारात? विजेच्या खांबांवरील तांब्याच्या तारा चोरीला, सरकारी यंत्रणा झोपेत?
esakal March 15, 2025 02:45 PM

मुंबई : कोस्टल रोडवरील स्ट्रीट लाईटच्या तांब्याच्या तारा चोरीला गेल्याने गेल्या महिनाभरापासून संपूर्ण मार्ग अंधारात गडप झाला आहे. नागरिक आणि स्थानिक राजकारण्यांनी यावरून मुंबई महापालिकेवर आणि पोलिसांवर टीका केली आहे. सोशल मीडियावरही यासंदर्भात संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, नागरिक विचारत आहेत की, "मुंबई महापालिका आणि पोलिस नेमकं काय करत आहेत?"

कोस्टल रोडवर अंधार-

मुंबईतील प्रतिष्ठित कोस्टल रोड हा शहरातील महत्त्वाचा प्रकल्प आहे, जो वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. मात्र, या ठिकाणी असलेल्या स्ट्रीट लाईटच्या तांब्याच्या तारा चोरीला गेल्याने संपूर्ण मार्ग अंधारात गेला आहे. यामुळे प्रवासी आणि स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

ट्विटरवरील एका वापरकर्त्याने "कोस्टल रोडवरील दिवे सुरू का नाहीत? गेल्या महिनाभरापासून हा रस्ता अंधारात आहे. एखादी दुर्घटना घडण्याआधीच महापालिकेने काहीतरी करावे!" अशी तक्रार केली.

मुंबई महापालिकेचा खुलासा – चोरीबाबत FIR दाखल

या घटनेवर स्पष्टीकरण देताना मुंबई महापालिकेने सांगितले की, "कोस्टल रोडवरील स्ट्रीट लाईटच्या तांब्याच्या तारा चोरट्यांनी चोरल्या आहेत. याआधीही अशा घटना घडल्या असून, याप्रकरणी FIR दाखल करण्यात आले आहेत. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत."

महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, अशा चोरीला आळा घालण्यासाठी तांब्याच्या तारांऐवजी अॅल्युमिनियम तारा बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

वर्षा गायकवाड यांची सरकारवर टीका

यांनीही यावर नाराजी व्यक्त करत म्हटले की, "सरकारी यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरत आहे. जिथे सामान्य नागरिकांनाही प्रवेश नाही, तिथे चोर आत घुसून इतक्या जाडजूड तांब्याच्या तारा चोरी करू शकतात, आणि पोलिसांना याची साधी कल्पनाही येत नाही?"

कोस्टल रोडवरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

या घटनेमुळे कोस्टल रोडवरील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. जर अशा महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा निष्क्रिय असेल, तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचे काय? मुंबई महापालिकेने अॅल्युमिनियम तारा बसवण्याचा निर्णय घेतला असला, तरी यासाठी किती कालावधी लागणार आणि यामध्ये पुन्हा भ्रष्टाचार होणार का, हे प्रश्न उपस्थित होत आहेत.

शासनाची जबाबदारी कोण घेणार?

मुंबई महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी वेळीच कारवाई केली असती, तर इतका मोठा अंधार निर्माण झाला नसता. नागरिक आता सरकारकडून ठोस पावले उचलण्याची अपेक्षा करत आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.