चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील विजयानंतर दिग्गज खेळाडू खेळणार की नाही याबाबत चर्चा होती. मात्र स्पर्धा झाल्यानंतर कोणीही निवृत्ती घेतली नाही. उलट रोहित शर्माने पुढेही खेळणार असल्याचं सांगितलं. असं असताना विराट कोहलीच्या एका विधानाने खळबळ उडाली आहे. त्याच्या विधानाने त्याचे चाहते चिंतेत आले आहे. कोहलीने आयपीएल 2025 स्पर्धा सुरु होण्यापूर्वीत कसोटी करिअरबाबत आपलं मत मांडलं आहे. तसेच ऑस्ट्रेलियात कदाचित खेळणार नसल्याचं सांगितलं. त्याच्या या विधानाने क्रीडावर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. विराट कोहलीने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत चांगली कामगिरी केली. पण ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी स्पर्धेत अपयशी ठरला. त्याने एक शतक ठोकलं होतं. पण त्यानंतर मात्र फार काही चांगलं करू शकला नाही. विराट कोहली यावेळी स्टम्प बाहेरील चेंडू खेळताना वारंवार बाद झाला. यामुळे त्याचे चाहते आणि क्रीडातज्ज्ञही हैराण होते.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात फेल गेल्याने त्याच्या कसोटी कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. त्यामुळे इंग्लंड दौऱ्यावर जाणार की नाही याबाबत चर्चांना उधाण आलं होतं. माजी कर्णधार विराट कोहलीने एका कार्यक्रमात सांगितलं की, ‘कदाचित मी पुन्हा ऑस्ट्रेलिया दौऱ्यात खेळणार नाही. त्यामुळे आतापर्यंत जे काही झालं त्याने संतुष्ट आहे.’ टीम इंडियाचा पुढचा ऑस्ट्रेलिया दौरा 2027 च्या शेवटी होणार आहे. दुसरीकडे, इंग्लंड दौऱ्यासाठी विराट कोहलीची निवड होणार की नाही इथपासून चर्चा आहे. जर निवड झाली तर या दौऱ्यानंतर निवृत्ती घेईल? असे एक ना अनेक प्रश्न चाहत्यांच्या मनात घोळ घालत आहेत.
विराट कोहलीच्या चाहत्यांना अजून एक धास्ती लागून आहे की, अचानक निवृत्ती तर घेणार नाही ना? दुसरीकडे, चाहत्यांना विराट कोहलीला पुन्हा एकदा कसोटीत चांगली कामगिरी करताना पाहायचं आहे. इंग्लंड दौऱ्यात त्याच्याकडून फार अपेक्षा आहेत. दुसरीकडे, आयपीएल 2025 स्पर्धेत विराट कोहली कशी कामगिरी करतो याकडेही लक्ष लागून आहे. मागच्या 17पर्वात तो आरसीबीकडून खेळला आहे. मात्र अजूनही जेतेपदाची चव चाखलेली नाही. मात्र यंदा तरी हे स्वप्न पूर्ण होतं का? याकडे लक्ष लागून आहे.