भोसरी, ता. १५ ः येथील मारुती मंदिरासमोर रंगलेल्या रेवड्यांच्या कुस्त्यांचा आनंद भोसरी ग्रामस्थांनी घेतला. या कुस्त्यांत शंभरहून अधिक कुस्तीगिरांनी सहभाग घेतला. या वेळी भोसरी गावच्या जत्रेच्या तारखांचीही घोषणा करण्यात आली.
शुक्रवारी (या. १४) सायंकाळी रंगलेल्या रेवड्याच्या कुस्तींमध्ये तीन वर्षांपासून अठरा वर्षापर्यंतच्या पहिलवानांनी सहभाग घेतला. माजी नगरसेवक वसंत लोंढे, पंडित गवळी, सागर गवळी, पांडुरंग गवळी, उत्सव समितीचे अध्यक्ष जंगल फुगे, राजाराम महाराज फुगे, सोपान महाराज फुगे, बाळासाहेब लांडगे, हिरामण लांडगे, राणू कंद आदींनी प्रोत्साहन दिले. गणपत गव्हाणे, मदन गव्हाणे, विलास फुगे, दामू फुगे, विष्णुपंत लांडगे, बाबा लांडगे, सुनील गव्हाणे, प्रशांत बाबर, मारुती फुगे, बाळासाहेब फुगे, मारुती गवळी, संजय गव्हाणे, गणेश धावडे आदी उपस्थित होते. पंच म्हणून सम्राट फुगे, मच्छिंद्र गवळी, नारायण गव्हाणे, विनायक माने, अजय लांडगे, अमर फुगे, विनय लांडगे, ॲड. राहुल गवळी, शेखर लांडगे आदींनी पंच म्हणून भूमिका पार पाडली. राजाराम फुगे यांनी निवेदन केले.
भोसरीत होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलवडीला मारुती मंदिरासमोर गावातील तालीम मंडळातील कुस्तीगिरांची ओळख ग्रामस्थाला होण्यासाठी आणि त्यांची कुस्तीतील तयारी पाहण्यासाठी कुस्त्यांचा आखाडा घेतला जातो. या कुस्त्यांमध्ये सर्वच कुस्तीगिरांना कुस्तीच्या सामन्यानंतर बक्षीस म्हणून ग्रामस्थांद्वारे रेवड्या दिल्या जातात. त्यामुळे या कुस्त्यांना रेवड्यांच्या कुस्त्याही म्हटले जाते. बक्षीस म्हणून मिळालेल्या रेवड्या पहिलवांनाद्वारे उपस्थित ग्रामस्थांनाही वाटल्या जाऊन त्यांना या आनंदात सहभागी करून घेतले जाते. ही परंपरा शेकडो वर्षांपासून सुरू असल्याचे भोसरी ग्रामस्थ अभिमानाने सांगतात.
शुक्रवारी झालेल्या कुस्त्यांमध्ये भोसरी कुस्ती संकुल, फुगे-माने तालीम मंडळ, लांडगे लिंबाची तालीम मंडळ, गव्हाणे तालीम मंडळ, समस्त गव्हाणे तालीम मंडळ, भवानी तालीम मंडळ आणि भोसरी गावातील पहिलवानांनी सहभाग घेतला.
भोसरीची जत्रा १५ व १६ एप्रिलला होणार
भोसरीचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांचा उत्सव १५ व १६ एप्रिल रोजी होणार असल्याचे भानुदास फुगे यांनी जाहीर केले. उत्सवात कुस्त्यांचा आखाड्यासह दरवर्षीप्रमाणे पारंपरिक कार्यक्रम होणार आहेत.