तीन वर्षात मलेरियाचा एकही रुग्ण नाही
जनजागृती मोहिमेचे यश; १३०३ गावे कीटकजन्य आजारमुक्त
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १५ ः जिल्ह्यातील १ हजार ३०३ गावे कीटकजन्य आजारमुक्त गावे म्हणून घोषित करण्यात आली आहेत. या गावामध्ये गेल्या तीन वर्षात हिवतापाचा (मलेरियाचा) एकही रुग्ण आढळलेला नाही. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्याक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्हा आरोग्य विभागाने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे हे शक्य झाले आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूद्ध आठल्ये व जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संतोष यादव यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली कीटकजन्य आजाराचे निर्मुलन करण्यासाठी नियमित सर्वेक्षण उपाययोजना व आरोग्य शिक्षणाच्या माध्यामातून काम करत असलेल्या जिल्ह्यातील सर्व आरोग्य कर्मचारी व अधिकारी यांच्या एकत्रितपणे प्रयत्नांचे हे साध्य झाले आहे. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी आरोग्य विभागाच्या कीटकजन्य आजारमुक्त गाव या संकल्पनेचे व या उल्लेखनीय कामाबद्दल अभिनंदन केले आहे. यापुढेही ही संकल्पना नियमित प्रभावीपणे राबवावी याबाबत सर्व सूचना आरोग्य समिती सभेमध्ये सर्व तालुका आरोग्य अधिकारी यांना दिल्या आहेत.
उन्हाळ्यात पाणीटंचाईमुळे लोक भांड्यामध्ये कंटेनरमध्ये जास्त काळासाठी पाण्याचा साठा करतात. हे पाणीसाठे जास्त काळ उघडे राहिले तर त्यात डासांच्या अळ्या तयार होतात. परिणामी, मलेरिया, डेंगीसारख्या कीटकजन्य आजाराचे प्रमाण वाढते. त्यामुळे नागरिकांनी पाणीसाठा व्यवस्थित झाकून मगच पाण्याचा वापर करावा तसेच आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आठल्ये यांनी केले आहे.
-----
चौकट...
प्रतिबंधात्मक उपायांमुळे आजारात घट
मलेरिया, डेंगी, हत्तीरोग निर्मुलनाच्या मोठ्या ध्येयाकडे एक पाऊल आहे. जागतिक आरोग्य संघटनेने २०३० पर्यंत मलेरिया निर्मुलनाचे आवाहन केले आहे. दरवर्षी असंख्य व्यक्तींना त्याचा त्रास होतो. त्यामुळे मच्छरदाण्यांचे वितरण, ऑईल बॉल पद्धत, नियमित रक्तनमुना तपासणी, कंटेनर तपासणी, टेमेफोस कीटकनाशक फवारणी आणि व्यापक जागरूकता मोहिमा यांसह व्यापक प्रतिबंधात्मक उपायांच्या अमंलबजावणीमुळे जिल्ह्यात मलेरिया, डेंगी प्रकरणांमध्ये लक्षणीय घट झाली आहे.