वूमन्स प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेचे विजेतेपद मुंबई इंडियन्सने जिंकले. त्यांनी अंतिम सामन्यात ब्रबॉर्न स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सला ९ धावांनी पराभवाचा धक्का दिला. त्यांनी याआधी २०२३ मध्ये पहिल्यांदा विजेतेपद मिळवले होते. त्यावेळीही याच मैदानावर मुंबईने दिल्लीचा पराभूत केले होते.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की दिल्ली सलग तिसऱ्यांदा अंतिम सामन्यात पराभूत झाले आहेत. त्यांना तिसऱ्यांदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे.
या सामन्यात दिल्लीसमोर विजयासाठी १५० धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीला २० षटकात ९ बाद १४१ धावाच करता आल्या.
कर्णधार मेग लॅनिंग आणि शफाली वर्मा यांनी सलामीला फलंदाजीला उतरले होते. पण दोघीही झटपट बाद झाल्या. लॅनिंगला दुसऱ्या षटकात नतालिया सायव्हर-ब्रंटने १३ धावावंर त्रिफळाचीत केले. शफली वर्माला तिसऱ्या षटकात शबनीम इस्माईलने ४ धावांवर पायचीत केले. जेस जोनासेन आणि ऍनाबेल सदरलँडही फार काही करू शकल्या नाहीत.
जोनासेनला १३ धावांवर एमेलिया केरने यष्टीरक्षक यास्तिका भाटियाच्या हातून झेलबाद केले. सदरलँड २ धावांवर सायका इशाकविरुद्ध खेळताना यष्टीचीत झाली.
तरी एक बाजू जेमिमाह रोड्रिग्स सांभाळत होती. तिला मारिझान कापने साथ देण्याचा प्रयत्न केला. पण जेमिमाही २१ चेंडूत ३० धावावंर बाद झाली. तिला ११ व्या षटकात एमेलिया केरने तिच्याच गोलंदाजीवर झेल घेत बाद केले. त्यामुळे ५ बाद ६६ धावा अशी अवस्था दिल्लीची झाली होती.
त्यानंतर मारिझानने आक्रमक खेळ सुरू केला. पण चोरटी धाव घेताना साराह ब्रायसला संस्कृती गुप्ताच्या थ्रोवर यास्तिका भाटियान ५ धावांवर धावबाद केले. पण नंतर निकी प्रसादने मारिझान कापला चांगली साथ दिली.
त्यांच्या भागीदारीमुळे दिल्लीचा विजय सोपा वाटायला लागला होता. मात्र मोक्याच्या क्षणी मारिझान कापला १८ व्या षटकात नतालिया सायव्हर-ब्रंटने बाद केले. तिचा झेल हेली मॅथ्युजने घेतला.
मारिझानने ३६ चेंडूत ४० धावांची झुंज दिली. तिच्यापाठोपाठ पुढच्याच चेंडूवर नतालियाने शिखा पांडेला त्रिफळाचीत केले. मिन्नू मणीही ४ धावांवर बाद झाली. अखेर निकी प्रसादने प्रयत्न केले. पण दिल्लीला ९ धावा कमी पडल्या. निकीने २३ चेंडूत नाबाद २५ धावा केल्या.
मुंबईकडून गोलंदाजी करताना नतालिया सायव्हर ब्रंटने ३ विकेट्स घेतल्या. एमेलिया केरने २ विकेट्स घेतल्या. शबनीम इस्माईल, हेली मॅथ्यूज आणि सायका इशाक यांनी प्रत्येकी १ विकेट्स घेतल्या.
तत्पुर्वी, दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे मुंबई प्रथम फलंदाजीसाठी उतारले. मुंबईकडून यास्तिका भाटिया आणि हेली मॅथ्यूजने सलामीला फलंदाजी केली. पण त्या दोघींनाही मारिझान कापने बाद केले.
पण यानंतर नतालिया सायव्हर-ब्रंट आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी डाव सावरताना ८९ धावांची भागीदारी करत संघाला १०० धावांचा टप्पा ओलांडून दिला होता. पण नतालिया २८ चेंडूत ३० धावा करून बाद झाली. तिला नल्लापुरेड्डी चरानीने मिन्नू मणीच्या हातून झेलबाद केल.
यानंतर एमेलिया केर (२) आणि सजीवन सजना (०) यांनीही स्वस्तात विकेट्स गमावल्या. तरी हरमनप्रीतने चांगला खेळ करत अर्धशतक केले होते. पण १८ व्या षटकात हरमनप्रीतला ऍनाबेल सदरलँड्सने मारिझान कापच्या हातून झेलबाद केले. हरमनप्रीतने ४४ चेंडूत ६६ धावांची खेळी केली.
जी कामिलीनीही १० धावांवर नल्लापुरेड्डी चरानीविरुद्ध खेळताना यष्टीचीत झाली. त्यामुळे मुंबईला २० षटकात ७ बाद १४९ धावा करता आल्या. अमनज्योत कौर आणि संस्कृती गुप्ता नाबाद राहिल्या. अमनज्योतने १४ आणि संस्कृतीने ८ धावा केल्या.
दिल्लीकडून मारिझान काप, जेस जोनासन आणि नल्लापुरेड्डी चरानी यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. ऍनाबेल सदरलँडने १ विकेट घेतली.