शिक्षणभान – परीक्षा नो टेन्शन, सकारात्मकतेचे चिंतन
Marathi March 16, 2025 08:24 AM

>> आशिष निंगुरकर

'शिक्षक, विद्यार्थी आणि शिक्षण' ही शिक्षणाची त्रिसूत्री आहे? याला शिक्षणाची साखळीदेखील म्हणता येईल? यातील एखादा घटक जर कमजोर असेल, तर शिक्षणातील मूल्यमापन 100 टक्के होऊच शकत नाही? ते शिक्षण अधोगतीकडे वाटचाल करत आहे असे समजावे? यंत्रणा राबविणारी मंडळी अनुभवी, जाणकार असावी? त्यातून राष्ट्रीय उद्दिष्टे साध्य होण्यासाठी परीक्षा या मूल्यमापन तंत्राचा प्रामाणिक व विश्वासार्हतेने वापर होणे गरजेचे आहे?

सध्या सर्वत्र परीक्षांचा मौसम सुरू आहे. विद्यार्थीदशेत प्रत्येक परीक्षेला विशेष असे महत्त्व असते. विद्यार्थी ही देशाची खरी संपत्ती आहे. आधुनिक शिक्षणप्रणालीत विद्यार्थी हा केंद्रबिंदू ठरला आहे. त्या विद्यार्थ्याला सर्वांगीण विकास साधणारे शिक्षण मिळणे गरजेचे आहे व त्यासाठी योग्य त्या परीक्षा साधनांचा वापर केला गेला पाहिजे. 100 टक्के लेखी परीक्षेचे उद्दिष्ट असावे. कारण काही शाळांत विद्यार्थी, शाळा, संस्था यांच्या गुणवत्ता टक्केवारीसाठी 20 गुणांचा तोंडी परीक्षेचा गैरवापर होतो. ते लेखी परीक्षेत समाविष्ट करून मूल्यमापन तंत्राचा कमजोरपणा सिद्ध होतो. ज्या विद्यार्थ्याला चारओळी लिहिता येत नाही, बोलता येत नाही तो विद्यार्थी हे तोंडी गुण मिळाल्यामुळे उत्तीर्ण होतो आणि नंतर त्याला साधा अर्जही लिहिता येत नाही. हे कुठेतरी शालेय स्तरावर थांबले पाहिजे. शिक्षणाचे महत्त्व वाढवायचे असेल तर 100 गुणांचाच लेखी पेपर असावा.

भाषा विषयात तरी तोंडी गुणांचा समावेश नसावा. अन्यथा शिक्षण हे रद्दड, कंटाळवाणे व निरर्थक राहील. लेखी परीक्षा म्हणजे शिक्षणातील जिवंतपणा आहे. त्याचे विद्यार्थी जीवनात फार महत्त्व आहे. कोणत्याही विद्यार्थ्याचे मूल्यमापन करायचे असेल तर 100 टक्के लेखी परीक्षेशिवाय पर्याय नाही. आज जी स्पर्धा परीक्षेची वेळ ओढवली ती परीक्षेतील कमकुवतपणाचे लक्षण दर्शविते. मूल्यमापन तंत्र जर योग्य असेल तर अशी वेळ येत नाही. गुणवत्ताप्रमाण 100 टक्क्यांच्या वर कधीच जाणार नाही. आज सर्व सामान्य विद्यार्थी शाळाशाळांत 95, 96 टक्के गुण घेतो. याचा अर्थ काय समजायचा? पूर्वी ही टक्केवारी राज्य स्तरावर होती. गुणांचे मूल्यमापन लेखी परीक्षेत 100 टक्के होते.

अभ्यासक्रमात आता भाषा विषयात घटक नियोजनात घटकाचे तुकडे-तुकडे केले. सृजनशीलता, आवड, अभिरुची या गोष्टी हळूहळू कालबाह्य होऊन शिक्षण निरस होईल. 100 गुणांच्या लेखी परीक्षेत वस्तुनिष्ठ प्रश्न, दीर्घोत्तरी प्रश्न, निबंधवजा प्रश्न, निबंध, पत्र, मुद्दय़ावरून गोष्ट, उताऱयावरून प्रश्न, कवितेच्या ओळी व व्याकरण हे इयत्ता पाचवीपासून ते दहावीपर्यंत असावे. व्याकरणाशिवाय भाषा जिवंत राहू शकत नाही. अभ्यासक्रमात प्रत्येक भाषेत व्याकरण हे असलेच पाहिजे तरच श्रवण, वाचन, संभाषण, लेखन ही कौशल्ये आत्मसात करता येईल. यासाठी नियमित शाळा असावी.

लेखी परीक्षा विद्यार्थ्याची गुणवत्ता तपासण्याची फार विश्वासार्ह यंत्रणा आहे. जगातील सर्वात महत्त्व याच यंत्रणेला आहे. बुद्धिमत्ता व बौद्धिक कौशल्य यातून आजमावता येते. त्यासाठी अभ्यास, शोधक वृत्ती असायला पाहिजे. यात कठीण पातळीसुद्धा महत्त्वाची आहे. यात हुशार विद्यार्थ्यांचा शोध घेऊन राष्ट्रीय पातळीवर संशोधनात प्रवेश देता येतो. हे तर खरे शिक्षणातून साध्य व्हायला हवे आहे. गुणवत्तेनुसार त्यांना प्रवेश मिळायला पाहिजे, पण दुर्दैव असे की त्यांनाही स्पर्धा परीक्षेला सामोरे जावे लागते.

विद्यार्थी लेखी परीक्षेमुळे बौद्धिक विकास साध्य करू शकतो. लेखी परीक्षा ज्या वेळी 100 गुणांची होती, त्या वेळी विद्यार्थी वर्षभर वाचन, चिंतन, मनन करत असतो. स्वयंशिस्त, नम्रता, आदर हे गुण वाढीस लागतात. लेखी परीक्षा व मूल्यमापन सरकारी यंत्रणेत निःपक्षपातीपणे झाले पाहिजे.त्यासाठी उत्तम व्यवस्थापनाची गरज आहे.

विद्यार्थी जीवनात परीक्षेला फार महत्त्व आहे. परीक्षा नाही तर शिक्षण नाही. शिक्षण नाही तर देश विकास नाही. विद्यार्थी घडवायचे असतील तर लेखी परीक्षा असलीच पाहिजे. अन्यथा शिक्षणातील मृतवतपणा जाणवेल. अनगोंदी कारभार होईल. परीक्षा अभ्यासक्रमावर आधारित असल्यामुळे त्यात संस्कार, संस्कृती, राष्ट्रीय मूल्ये यांचा समावेश असतो. शिक्षणाला वाघिणीचे दूध म्हणतात, तर त्या वाघिणीला चारापाणी घालण्याचे काम परीक्षा करतात. 2019 मध्ये दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये ‘परीक्षेवर चर्चा’ या कार्यक्रमामध्ये पंतप्रधानांनी सांगितले होते की, आई-वडिलांनी विद्यार्थ्यांवर परीक्षेचे दडपण देऊ नये. दडपणामुळे परिस्थिती बिघडते. आई-वडिलांनी आपली स्वप्ने मुलांवर लादू नयेत.

2020 मध्ये पंतप्रधानांनी सांगितले होते की, परीक्षा हॉलमध्ये तुम्ही जितका जास्त तणाव घ्याल, तेवढी जास्त परीक्षा कठीण होत जाईल. जितक्या जास्त आत्मविश्वासाने परीक्षा द्याल, तुम्हा सर्वांसाठी परीक्षा तेवढीच सोपी होईल. पंतप्रधानांनी आई-वडिलांना सल्ला दिला होता की, त्यांनी विद्यार्थ्यांवर परीक्षा आणि प्रवेश यासंदर्भात दबाव टाकू नये. कारण जगामध्ये खूप संधी उपलब्ध आहेत. त्यांना फक्त शाळेतील परीक्षेपर्यंत सीमित ठेवता कामा नये. 2021 मध्ये पंतप्रधानांनी सांगितले होते की, अभ्यास करताना आधी कठीण विषयाचा अभ्यास करा आणि त्यानंतर सोप्या विषयाला हात लावा. कठीण विषयापासून दूर पळू नका. 2022 मध्ये पंतप्रधानांनी सांगितले होते की, इथे घाबरलेले कोण आहे? तुम्ही विद्यार्थी की तुमचे आई-वडील? इथे जास्त करून तुमचे आई-वडील घाबरले आहेत. त्यामुळे जर आपण परीक्षेला ‘उत्सव’ बनविले, तर आपण यामध्ये आनंदाने सहभागी होऊ. तुम्ही पूर्ण समुद्र पार केला आहे आणि किनाऱयावर येऊन तुम्हाला बुडण्याची भीती वाटते आहे.

2023 मध्ये या कार्यक्रमादरम्यान बोलताना पंतप्रधानांनी संदेश दिला होता की, विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या वेळी अनुचित साधनांचा वापर करू नये. विद्यार्थ्यांनी आईकडून वेळेचे व्यवस्थापन करणे शिकावे. तुम्ही मेहनत करायला पाहिजे, परंतु त्यामध्ये समज असायला हवी. विद्यार्थ्यांनी टीकेला सकारात्मक रूपामध्ये घ्यायला हवे. पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना सांगितले होते की, त्यांनी प्रादेशिक भाषा शिकायला हव्यात. पंतप्रधान नरेंद्र मोदी घेत असलेल्या 2024 मधील या विशेष कार्यक्रमाची ही सातवी आवृत्ती असणार आहे. ‘परीक्षा पे चर्चा’ हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तरुणांसाठी तणावमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी सुरू असलेल्या ‘एक्झाम वॉरियर्स’ या मोठय़ा चळवळीचा एक भाग आहे.

विद्यार्थ्यांचे आदर्श मूल्यमापन कसे झाले पाहिजे? गुरुकुलपद्धतीप्रमाणे त्याचा कल लक्षात घेऊन त्यात त्याला प्रवीण केले गेले पाहिजे. आता सरसकट सर्वांना एकच एक अभ्यासक्रम असतो आणि तोही मूळ इतिहासाशी विसंगत, त्याच्या मातीशी नाळ तोडणारा, त्याची भाषा दूषित करणारा किंवा त्याच्या संस्कृतीपासून दूर नेणारा. (आता या स्थितीत काही प्रमाणात पालटही होत आहे, हे स्वागतार्ह आहे.) विद्यार्थी ही देशाची उद्याची पिढी आहे. हे घडण्याचे, उमेदीचे वय असल्याने या वयात शिस्त आणि कष्ट यांना पर्याय नाही. पालकांनीही पाल्याला या वयात लाडावणे योग्य ठरणार नाही.

साऱया जगाची कायदा आणि सुव्यवस्था जिथे शिक्षेच्या भीतीने चालते, तिथे ‘शिस्तीची छडी लागल्याविना विद्याही घमघम येत नाही,’ हे पालकांनीही लक्षात घेतले पाहिजे. ‘संस्कारक्षम विद्या ग्रहण करणारा ‘विद्यार्थी घडवायचा’ असून परीक्षा देणारा परीक्षार्थी नाही,’ हे शिक्षण मंडळाचे पदाधिकारी, शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक आणि पालक यांनी प्रामुख्याने लक्षात घेतले पाहिजे. ‘विद्यार्थ्यांना घडवणे’ आणि ‘कसे घडवायचे’ ही दिशा एकदा स्पष्ट असेल, तर परीक्षांचा ताण कुणालाच राहणार नाही. आयुष्य म्हणजे एक परीक्षाच असते. आपण सकारात्मक राहून त्याला सामोरे गेले तर जगात कुठलीच गोष्ट अशक्य नाही.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.