फुलंब्री - होळी-धुलीवंदनाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात दारू पिऊन वाहन चालविण्यात येतात. त्यामुळे जिल्हा वाहतूक शाखेच्या वतीने तळीरामांना दणका देत वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या 380 वाहनावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यात चार लाख 60 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी शनिवारी (ता.१५) रोजी दिली आहे.
जिल्ह्यामध्ये धुलीवंदनाच्या दिवशी दारू पिऊन वाहन चालविल्यामुळे दरवर्षी अपघात होण्याचे प्रमाण वाढले होते. सदरील अपघात होऊ नये यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. विनायक कुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी जिल्हाभर वाहतूक शाखा व स्थानिक पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने कारवाईची मोहीम हाती घेतली होती.
यामध्ये मद्य प्राशन करून वाहन चालविणे, अवैध प्रवासी वाहतूक करणे, चार चाकी वाहनात सीट बेल्टन न वापरणे, दुचाकी चालविताना हेल्मेट न वापरणे, दुचाकी ट्रिपल सीट चालविणे, लायसन सोबत न बाळगणे, मर्यादित वेगापेक्षा जास्त वेगाने गाडी चालवणे, नो पार्किंगच्या ठिकाणी वाहन उभे करणे, वाहतुकीचे नियम न पाळणे, मोबाईलवर बोलताना वाहन चालवणे, पोलिसांनी थांबण्याचा इशारा केल्यानंतरही पळून जाणे यासारख्या वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वर जिल्हा वाहतूक शाखा आणि स्थानिक पोलिसांनी 380 वाहनावर मोटार वाहन कायदा अधिनियम प्रमाणे दंडात्मक कारवाई केली. यातून चार लाख 60 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी दिली.
पोलिसांची दंडात्मक कारवाई -
* दारू पिऊन वाहन चालवणे : 26
* अवैध प्रवासी वाहतूक : 01
* चार चाकी चालवताना सीटबेल्ट न वापरणे : 35
* दुचाकीवर हेल्मेट न वापरणे : 59
* फोनवर बोलताना वाहन चालवणे : 17
* दुचाकी ट्रिपल सीट चालवणे : 26
* सिग्नलचे नियम न पाळणे :79
* नंबर प्लेट व्यवस्थित नसणे : 06
* चार चाकी वाहनाची काळी काच करणे : 01
* इतर पोलीस ठाण्याची कार्यवाही : 130
* एकूण : 380 वाहनावर कार्यवाही
* एकूण दंड वसूल : 4 लाख 60 हजार
जिल्ह्यातील ग्रामीण भागात सर्वत्र मोटार वाहन कायद्यांतर्गत जिल्हा वाहतूक शाखेने कारवाई केली. यामध्ये अल्पवयीन मुले ही गाडी चालवताना आढळून आले. त्यामुळे पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलाकडे वाहन चालविण्यासाठी देऊ नये असे आवाहन जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी केले आहे.
होळी व रंगपंचमी सणानिमित्त अनेक जण मद्यप्राशन करून वाहने चालवितात. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले. यात होणारे अपघात टाळण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ.विनयकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात वाहन कायदा अंतर्गत 380 केसेस करून चार लाख 60 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. त्यामुळे मोटार वाहन कायद्याचा नियम सर्व वाहन चालकांनी पाळावा.
- किशोर पवार, पोलीस निरीक्षक, जिल्हा वाहतूक शाखा छत्रपती संभाजीनगर.