बुलढाणा : जिल्हा परिषद शाळांची दुरावस्था हा आता नवीन विषय राहिलेला नाही. यासह शाळेतील शिक्षणाचा दर्जा यामुळे विद्यार्थी या शाळांमध्ये येण्यास तयार होत नाहीत. असाच काहीसा अनुभव बुलढाणा जिल्ह्यातील सोनबर्डी येथील जिल्हा परिषद शाळेत येत आहे. या शाळेत मुलांना सुविधांचा अभाव पाहण्यास मिळत असून पिण्याचे पाणी आणण्यासाठी विद्यार्थ्यांना बाहेर जावे लागत आहे. तसेच मागील तीन वर्षांपासून शाळेतील वीज पुरवठा बंद आहे.
जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्याच्या सातपुडा पर्वतरांगे लगत असलेल्या सोनबर्डी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. शाळा परिसरात विद्यार्थ्यांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय तर सोडा पाण्याचे कोणतेच स्तोत्र उपलब्ध नसल्याने विद्यार्थी गावातील हातपंपावर आपली तहान भागवत असल्याचे या ठिकाणी दिसून येते. पिण्यासाठी आणि हात धुण्यासाठी शाळेत पाणीच उपलब्ध नसल्याने मध्यान्ह भोजनाची खिचडी स्वयंपाकी आपल्या स्वतःच्या घरी तयार करून दररोज शाळेत आणतो.
विद्यार्थ्यांची पाण्यासाठी भटकंती
पाण्याची सोय उपलब्ध नसल्याने विद्यार्थी पाणी पिण्याकरिता आणि मध्यंतरी जेवणाकरिता घरी येणे जाणे सतत करतात. त्यामुळे शिक्षणात सुद्धा खंड पडत आहे. शाळेच्या वर्ग खोल्या जीर्ण झाल्या असून पावसाळ्यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून वर्गात बसावे लागते. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार प्रत्येक शाळेत मूलभूत भौतिक सुविधा असणे बंधनकारक आहे. परंतु सोनबर्डी त मूलभूत सुविधा देखील नाहीत.
तीन वर्षांपासून वीज पुरवठा खंडित
मूलभूत भौतिक सुविधांसह पिण्याच्या पाण्यासाठी विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागत असल्याचे विदारक वास्तव समोर आले आहे. त्याच बरोबर मागील तीन वर्षांपासून या शाळेचा विद्युत पुरवठा खंडित झाल्याने शाळेतील वॉटर फिल्टर, एलईडी स्क्रीन आणि संगणक या केवळ शोभेच्या वस्तू बनल्या आहेत.
लेखी अर्ज करूनही शिक्षण विभागाचे दुर्लक्ष
जीर्ण झालेल्या वर्ग खोल्या आणि शाळेच्या पडक्या इमारतीत विद्यार्थ्यांसाठी शौचालय, मुतारी उपलब्ध नाही. या संदर्भात शाळेच्या मुख्याध्यापकांनी वारंवार जळगाव जामोद पंचायत समिती गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे लेखी अर्ज सादर करत शाळेच्या दयनीय अवस्थेची माहिती दिली आहे. परंतु केवळ कागदपत्री घोडे नाचणाऱ्या शिक्षण विभागाने शाळेच्या या दुरावस्तेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून गोरगरीब आदिवासी विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा खेळ खंडोबा सुरू केल्याचे विदारक वास्तव आज समोर आले आहे.