नाशिक- मुंबई-आग्रा महामार्गावरील पिंपळगाव बसवंत येथील टोल प्लाझावरील दोन्ही बाजूंचे अतिक्रमण भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हटविल्यावर आता ‘त्या’ हॉटेलचे अतिक्रमण का काढले नाही, असा प्रश्न स्थानिक व्यावसायिकांनी उपस्थित केला आहे. एकूणच, महामार्ग प्राधिकरणाच्या भूमिकेबद्दल संशय व्यक्त केला जात आहे.
पिंपळगाव बसवंत टोल प्लाझाच्या दोन्ही बाजूंना छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनी दुकाने थाटलेली होती. परंतु, वाहतुकीला अडथळा होत असल्याने टोल प्लाझा व भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने येथील दुकानांवर जेसीबी फिरविला. अतिक्रमणे काढण्याच्या कारवाईला १५ दिवस लोटले असताना प्राधिकरणाच्या जागेवरील नाशिक बाजूकडील हॉटेल आजही सुरू असल्याने ‘या हॉटेलवर कुणाचा वरदहस्त?’ असा प्रश्न व्यावसायिकांनी उपस्थित केला आहे. आम्ही पोटासाठीच व्यवसाय करतो; पण प्राधिकरणकडून अतिक्रमण काढले जाते. अतिक्रमण काढताना सर्वांना समान न्याय का नाही, असा प्रश्न व्यावसायिकांनी केला आहे.
नेमके गौडबंगाल काय?
येथील हॉटेलची जागा महामार्ग प्राधिकरणाची असल्याचे सांगितले जाते. हॉटेल काढण्यासाठी प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी २८ फेब्रुवारी २०२४ ला संबंधित हॉटेलचालकाला नोटीसही दिली आहे. त्यानंतरही अतिक्रमण काढलेले नाही. अशा परिस्थितीत पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण काढण्याचा पर्याय प्राधिकरणाकडे आहे. असे असताना कारवाई होत नसल्याने यात नेमके गौडबंगाल काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पिंपळगाव बसवंत टोल प्लाझावरील सर्वच अतिक्रमणे काढली आहेत. अजून अतिक्रमणे असतील, तर तीही काढण्याचे काम सुरू आहे. अतिक्रमित जागेवरील एकहीआस्थापना ठेवली जाणार नाही.
- दिलीप पाटील, सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण
वाहतुकीला अडथळा होत असल्याने टोल प्लाझाच्या माध्यमातून रस्त्याच्या दोन्ही बाजूंकडील अतिक्रमणे आम्ही काढली आहेत. अन्य आस्थापना काढण्याबद्दल भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण योग्य तो निर्णय घेईल.
- आत्माराम नथळे, व्यवस्थापक, पिंपळगाव टोल प्लाझा