जाफर एक्सप्रेस ट्रेन हायजॅकनंतर पाकिस्तानमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. दरम्यान, रविवारी (१६ मार्च) बलुचिस्तानमध्ये लष्कराच्या ताफ्यावर हल्ला झाला. या हल्ल्याची जबाबदारी बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (BLA) ने स्वीकारली आहे. या हल्ल्यात त्यांनी ९० पाकिस्तानी लष्करी सैनिक मारल्याचा दावा बीएलएने केला. पाकिस्तानी लष्कराच्या एकूण आठ बस जाळल्याचा दावा बीएलए ने केला आहे.
द बलुचिस्तान पोस्टच्या वृत्तानुसार, नोशिकीमध्ये पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला. स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरसीडी महामार्गावर लष्कराच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला. सुरुवातीला सलग अनेक स्फोट झाले आणि नंतर जोरदार गोळीबार झाला. या हल्ल्यानंतर, अनेक रुग्णवाहिका आणि सुरक्षा दल घटनास्थळाकडे जाताना दिसले, तर रुग्णालयांमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.
पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्यावरील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारताना बीएलएचे प्रवक्ते झियांद बलोच म्हणाले, “काही तासांपूर्वी नोशिकी येथील आरसीडी महामार्गावरील रसखान मिलजवळ बीएलएच्या आत्मघाती विंग माजीद ब्रिगेडने पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्याला लक्ष्य केले. या ताफ्यात आठ बस होत्या, त्यापैकी एक पूर्णपणे उद्ध्वस्त झाली.
या हल्ल्यात ९० पाकिस्तानी लष्करी सैनिक मारले गेल्याचा दावा बीएलएने केला आहे. संघटनेने म्हटले आहे की हल्ल्यानंतर लगेचच, बीएलएच्या फतह पथकाने पुढे सरसावले आणि एका बसला पूर्णपणे वेढले आणि त्यात असलेल्या सर्व सैनिकांवर हल्ला करून त्यांना ठार मारले.
पाकिस्तानी माध्यमांनुसार, नोशिकी-दलबंदिन महामार्गावर झालेल्या हल्ल्यात ७ प्रवासी ठार झाले आणि ३५ जण जखमी झाले. तथापि, अधिकाऱ्यांनी अद्याप स्फोटाचे कारण उघड केलेले नाही. पोलिसांनी सांगितले की, स्फोटानंतर जखमींना ताबडतोब नोशिकी रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णाल प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, परिस्थिती हाताळण्यासाठी मीर गुल खान नसीर शिक्षण रुग्णालयात आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आहे आणि तपास सुरू आहे.