अण्वस्त्रे चाचणी टाळण्यासाठी भारताचे योगदान
Marathi March 18, 2025 09:24 AM

पोलंडचे नेते बार्टोझेवस्की यांच्याकडून विशेष दखल

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

रशिया आणि युक्रेन युद्धात अण्वस्त्रांचा प्रयोग टाळला जाण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रयत्न कारणीभूत आहेत, अशी प्रशंसा पोलंडचे परराष्ट्र व्यवहार उपमंत्री व्लादिस्लाव्ह टोफिल बार्टोझेवस्की यांनी केली आहे. ते सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत. रशिया आणि युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले प्रयत्न स्तुत्य असून आम्ही त्यांचे आभारी आहोत, असे प्रतिपादन त्यांनी केले.

युव्रेनविरोधात धोरणात्मक पद्धतीने मर्यादित स्वरुपात अण्वस्त्रांचा उपयोग रशियाकडून केला जाण्याची शक्यता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे मन वळविल्याने टळली, अशी स्पष्टोक्ती त्यांनी केली. युरोपमध्ये आम्हाला स्थायी शांतता हवी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पोलंडच्या दौऱ्यावर असताना त्यांच्याशी आमची चर्चा झाली होती. त्या चर्चेत रशिया-युक्रेन युद्ध थांबविण्याचा विषय आला होता. अण्वस्त्रांचा उपयोग कोणत्याही परिस्थितीत टाळावा, असा आग्रह त्यांनी रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्यापाशी धरला होता. त्यामुळे या युद्धात ही अस्त्रे उपयोगात आणली गेली नाहीत. यामुळे युद्धाचा विस्तार झाला नाही. अन्यथा युरोपात स्थिती कठीण झाली असती. यासाठी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आदर करतो, असे प्रतिपादन त्यांनी केले.

चर्चेतूनच तोडगा

कोणत्याही समस्येवर युद्ध हा तोडगा नाही. कोणताही उपाय हा चर्चेतूनच साध्य आहे, हे भारताचे प्रथमपासूनचे धोरण आहे. युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धालाही हाच नियम लागू आहे. दोन्ही देशांनी युद्ध टाळून समझोत्याने आणि सौहार्दाने त्यांच्यातील समस्या सोडवाव्यात, असे भारताने या दोन्ही देशांना गेल्या दोन वर्षांपासून जाणवून देण्याचा प्रयत्न केला आहे. रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी भारताच्या या प्रयत्नांचा काही दिवसांपूर्वी मुलाखतीत उल्लेखाही केला होता.

युद्धा थांबावे ही साऱ्यांची इच्छा

रशिया-युक्रेन युद्ध थांबावे, ही युरोपसह साऱ्या जगाची इच्छा आहे. या युद्धामुळे या दोन देशांचीच नव्हे, तर जगाची मोठी हानी झाली आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठा साखळ्या उध्वस्त झाल्याने जगातच महागाई वाढली आहे. या युद्धाला आता तीन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. पण कोणताही देश निर्विवाद विजयाची शाश्वती देऊ शकत नाही. जीवीत आणि वित्त हानी मात्र दोन्ही देशांची प्रचंड प्रमाणात झाली आहे, असे भारतासह अनेक देशांचे मत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.