युद्धाला ‘विराम’ नाहीच! इस्रायलचा गाझा पट्टीवर बॉम्बहल्ला, 44 पॅलेस्टिनी ठार
GH News March 18, 2025 12:10 PM

इस्रायलने गाझा पट्टीवर पुन्हा एकदा बॉम्बहल्ला करण्यास सुरुवात केली आहे. गाझामध्ये सोमवारी रात्री आणि मंगळवारी सकाळी अनेक स्फोटांचे आवाज ऐकू आले आहेत. इस्रायलच्या हवाई हल्ल्यात 44 जण ठार झाल्याची माहिती गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, इस्रायलच्या गाझामध्ये 19 जानेवारीला शस्त्रसंधी लागू झाल्यापासून झालेला हा सर्वात मोठा हल्ला आहे. उभय देशांमधील शस्त्रसंधी वाढवण्याबाबतची चर्चा रखडली असताना हे हल्ले झाले. इस्रायल आणि हमास यांच्यात 19 जानेवारीला झालेल्या तीन टप्प्यांतील शस्त्रसंधी कशी राखायची यावरून मतभेद आहेत. गेल्या दोन आठवड्यांपासून झालेल्या चर्चेत दोन्ही बाजूंना शस्त्रसंधीवर सहमती दर्शविण्यात अमेरिका आणि अरब वाटाघाटींना अपयश आले आहे.

गाझामधील हमासच्या तळांवर हल्ला केल्याचे इस्रायली लष्कराचे म्हणणे आहे. इस्रायलच्या लष्कराने टेलिग्रामवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, गाझा पट्टीतील हमासच्या तळांवर ते मोठ्या प्रमाणात हल्ले करत आहेत. तर दुसरीकडे स्थानिक डॉक्टरांनी या हल्ल्यांचे लक्ष्य सर्वसामान्य नागरिक, मुले आणि महिला असल्याचे म्हटले आहे. डॉक्टर आणि प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य गाझामधील दीर अल-बलाह मधील तीन घरे, गाझा शहरातील एक इमारत आणि खान युनूस आणि रफा येथील लक्ष्यांवर हे बॉम्ब हल्ले करण्यात आले.

‘या’ करारावर 19 जानेवारी रोजी स्वाक्षरी

हमास आणि इस्रायल यांच्यात 19 जानेवारीला शस्त्रसंधी करार झाला होता. यावेळी दोन्ही बाजूंकडून होणारी लढाई थांबेल, असा निर्णय घेण्यात आला. आता या कराराला मुदतवाढ देण्याबाबत दोघांमध्ये मतभेद आहेत. दरम्यान, हिंसाचार पुन्हा सुरू झाला आहे. इस्रायलनेही हमासविरोधात लष्करी बळ वाढवण्याचा निर्धार केला आहे.

इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे की, गाझामध्ये हमासवर हल्ला करण्याच्या सूचना लष्कराला देण्यात आल्या आहेत. अमेरिकेचे अध्यक्षीय दूत स्टीव्ह विटकॉफ आणि मध्यस्थांचा प्रस्ताव स्वीकारण्यास हमासने नकार दिल्याने हमासने बंधकांची सुटका करण्यास वारंवार नकार दिल्याचे निवेदनात म्हटले आहे.

ऑक्टोबर 2023 पासून तणाव

इस्रायल आणि हमास यांच्यात ऑक्टोबर 2023 पासून तणाव सुरू आहे. 17 महिन्यांपासून सुरू असलेले युद्ध संपुष्टात आणण्यासाठी जानेवारीत शस्त्रसंधी करण्यात आली होती. या करारात इस्रायलने दोन हजार पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका केली आणि त्या बदल्यात हमासने डझनभर इस्रायली बंधकांची सुटका केली. यामुळे परिसरात शांततेची आशा निर्माण झाली होती, मात्र आता ती पुन्हा भंग चालली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.