नागपुरात सोमवारी (17 मार्च) रात्री दोन गटातील वादातून हिंसाचाराची घटना घडली. त्यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला.
नागपूर शहरातील महाल भागात वाहनांची जाळपोळ आणि दगडफेकीची घटना घडली.
पोलिसांनी बळाचा वापर करून परिस्थिती नियंत्रणात आणली असून शांतता राखण्याचं आवाहन सर्वसामान्यांना केलं आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना शांततेचं आवाहन केलं आहे. फडणवीस म्हणाले, "मी सातत्याने पोलीस प्रशासनाच्या संपर्कात आहे. नागपूर शांतताप्रिय आणि एकमेकांच्या सुख-दु:खात सहभागी होणारं शहर आहे. हीच नागपूरची परंपरा आहे. अशावेळी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि प्रशासनाला पूर्ण सहकार्य करा."
सध्या परिस्थिती शांततापूर्ण असल्याचे नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांनी म्हटले आहे.
"काही ठिकाणी जाळपोळ झाली आहे. दोन वाहने जाळण्यात आली असून दगडफेक देखील झाली. आम्ही परिस्थितीचा आढावा घेत आहोत," असे पोलीस आयुक्त सिंघल यांनी म्हटले आहे.
नागपूर शहरात कलम 144 लागू करण्यात आल्याचं पोलीस आयुक्त सिंघल यांनी सांगितलं.
नागपूर पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल वृत्तसंस्था एएनआयला म्हणाले, "सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. एक फोटो जाळण्यात आला होता, त्यानंतर लोक जमले. त्यांनी विनंती केली आणि आम्ही त्यासंदर्भात कारवाई देखील केली. ते माझ्या कार्यालयात मला भेटण्यासाठी आले होते. त्यांनी दिलेल्या नावांच्या आधारे एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
"ही घटना आज (17 मार्च) संध्याकाळी आठ-साडेआठच्या सुमारास घडली. यात दोन वाहनं जाळण्यात आली असून दगडफेक देखील झाली आहे. पोलीस तपास करत आहेत आणि त्यात सहभागी असलेल्यांची ओळख पटवून त्यांना अटक केली जात आहे," असे सिंघल यांनी सांगितले.
"आम्ही कलम 144 लागू केले आहे आणि सर्वांना अनावश्यकपणे बाहेर पडू नये किंवा कायदा हातात घेऊ नये असे आवाहन करण्यात आलं आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका. या परिसर वगळता संपूर्ण शहरात परिस्थिती शांत आहे", असं सिंघल यांनी सांगितलं.
'गैरसमजामुळे घडली घटना'नागपूर झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर नागपूरचे पोलीस उपायुक्त (डीसीपी) अर्चित चांडक यांनी माहिती दिली आहे.
अर्चित चांडक म्हणाले की, "ही घटना गैरसमज किंवा चुकीच्या संवादामुळे घडली. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. आमचं इथलं पोलीस दल भक्कम आहे. माझं सर्वांना आवाहन आहे की घराबाहेर पडू नका किंवा दगडफेक करू नका. दगडफेक होत असल्यामुळे आम्हाला बळाचा वापर करावा लागला. तसंच अश्रुधुराचा देखील वापर करावा लागला."
"इथे काही वाहनं जाळण्यात आली. अग्निशमन दलाला बोलावून आम्ही आग विझवली आहे. काही पोलीस कर्मचारीदेखील जखमी झाले आहेत. दगडफेक होत असताना माझ्या पायालादेखील छोटी दुखापत झाली आहे," चांडक म्हणाले.
"मात्र सर्वांनाच आम्ही शांतता राखण्याचं आवाहनं करतो. अफवांवर विश्वास ठेवू नका. कायदा आणि सुव्यवस्था मोडू नका. पोलिसांना सहकार्य करा. या घटनेसंदर्भात आम्ही कायदेशीर कारवाई करत आहोत," असं चांडक म्हणाले.
केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरींनी सर्वांना शांततेचे आवाहन केले आहे.
"नागपूरमध्ये काही अफवा पसरवल्यामुळे धार्मिक तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. या शांततेचा इतिहास हे नेहमीच नागपूरचं वैशिष्ट्यं राहिलेलं आहे. माझी सर्व बांधवांना विनंती आहे की त्यांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. शांतता प्रस्थापित करावी आणि रस्त्यावर येऊ नये. सर्वांनी कायदा आणि सुव्यवस्थेला सहकार्य करावं," असं गडकरी म्हणाले.
"सलोख्याचं आणि सौहार्दाचं वातावरण ठेवण्याची नागपूरची जी परंपरा आहे, त्या पंरपरेनुरुप वर्तणूक ठेवावी. ज्या ज्या लोकांनी चुका केल्या असतील किंवा ज्यांनी बेकायदेशीर कृत्यं केली असतील, त्यांच्यावर सरकार कारवाई करेल, असा विश्वास मी आपल्या सर्वांना देतो.
"माननीय मुख्यमंत्र्यांनीदेखील यासंदर्भातील सर्व माहिती मिळालेली आहे. त्यामुळे आपण कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता, सगळ्यांनी सहकार्य करावं आणि प्रेमाचं, सौहार्दाचं उत्तम वातावरण ठेवण्याकरता मदत करावी. पोलिसांना मदत करावी अशी माझी आपणा सर्वांना नम्र विनंती आहे," असं नितीन गडकरी म्हणाले.
नागपुरच्या महाल परिसरात आज (17 मार्च) संध्याकाळी तोडफोड आणि दगडफेकीची घटना झाली होती. त्यानंतर ही तणाव निर्माण झाला. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचं नागपूर पोलिसांनी सांगितलं आहे.
घटनेनंतर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस दल तैनात करण्यात आलं आहे.
'..त्यांची तत्काळ हकालपट्टी करा'बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांची आणि समाजात द्वेष पसरवणाऱ्यांची तत्काळ हकालपट्टी करावी असे काँग्रेस नेते विजय वड्डेट्टीवार यांनी म्हटले आहे.
"नागपूर हे अतिशय शांत शहर असताना त्याला सत्ताधाऱ्यांच्या समर्थक संघटनांनी गालबोट लावलेले आहे. हे सगळ मंत्रिमंडळातील बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांमुळे झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी तत्काळ या मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी," असे विधान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.
वडेट्टीवार म्हणाले, "जाणून बुजून दोन समाजात द्वेष पसरवणे, भांडण लावणे हे उद्योग केले जात आहेत आणि हे सत्ताधारी करत आहेत.नागपूरकरांनी शांतता बाळगावी, कोणताही गैरप्रकार होऊ नये याची दक्षता घ्यावी."
वारिस पठाण यांच्याकडून निषेध व्यक्तया घटनेचा MIM नेते आणि माजी आमदार वारिस पठाण यांनी निषेध केला आहे. "नागपुरात जाळपोळ आणि दगडफेकीची घटना घडली आहे. अशा कुठल्याही हिंसाचाराच्या घटनांचा आम्ही पूर्णतः निषेध करतो. प्रत्येकानं कायदा व सुव्यवस्थेचं कसोशीनं पालन करायला हवं. परंतु, ही घटना कशी घडली? यामागचं कारण काय, याबाबत प्रशासनानं चौकशी करायला हवी.
"महाराष्ट्रातील गेल्या काही दिवसांची परिस्थिती बघितल्यास लक्षात येईल की, भाजपचे काही द्वेष पसरवणारे चिंटू आले आहेत, जे द्वेषपूर्ण भाषणबाजी करत सौहार्द बिघडवून वातावरण दुषित करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा लोकांवर शासनानं लगाम कसायची गरज आहे. महाराष्ट्रात तणावपूर्ण स्थिती निर्माण व्हावी, अशी काहींची इच्छा दिसून येत होती आणि तसंच घडताना दिसत आहे.
"औरंगजेबच्या मुद्द्यावरून राज्यात तणाव निर्माण करून इतर महत्वपूर्ण मुद्यांकडे पाठ फिरवली जात आहे. सर्वांनी कायद्याचं पालन करावं, आणि जे कोणी या परिस्थितीला जबाबदार आहे, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, जेणेकरून अशा घटना भविष्यात घडणार नाही, हीच आमची सरकारकडे मागणी आहे," असं वारिस पठाण म्हणाले.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)