- डी. एस. कुलकर्णी, जीवन कौशल्य प्रशिक्षक
आपल्याला 5S ची माहिती मिळाली आहे. यावरून ‘प्रत्येक Sचा उपयोग प्रत्येकाने कसा करायचा ते आपण बघूयात’ असे राजूला सांगितले.
कागद आणि पेनाचा वापर कर.
१) सॉर्ट - शोधणे, तपासणे आणि वेचून वेगवेगळे करणे. असे अर्थ या प्रक्रियेचे लावता येतील. मनुष्याच्या मनात चोवीस तासात हजारो विचार तरळून जातात. त्यातील ८५ टक्के नकारात्मक म्हणून निरुपयोगी असतात आणि ९५ टक्के विचारांची वारंवार पुनरावृत्ती होत असते. म्हणजे जेमतेम ५ टक्के विचार, उपयुक्त, उत्पादक, कल्पक, सृजनात्मक असू शकतात.
‘काय सांगतो? छट, काहीतरीच काय? उगा टेपा लावू नको.’
राजूचा विश्वासच बसेना.
‘अजाण बालका, गुगलून काढ, कळेल तुला.’
मी जरा झिडकारलेच.
‘ऐक बर गपगुमान’
‘तर हा ९५ टक्के कचरा पहिले शोधावा लागतो.’
म्हणजे तपासून ‘सॉर्ट’ करावा लागतो. स्वविचारावर लक्ष केंद्रित करावे लागते. मन एकाग्र करून ही क्रिया करावी लागते. एकाग्र मन ही फारच अवघड बाब आहे.
श्वासावर लक्ष ठेवणे, एकाग्र होऊन जाणीवपूर्वक आपला भवताल अभ्यासणे. या आणि अशा अनेक बाबी ‘माईंडफुलनेस’च्या सरावाने, ध्यान, मनन, चिंतनाने काही प्रमाणात शक्य होतात.
आपल्या आवडीनिवडी तर आपल्याला माहिती असतातच.
मग केव्हा तरी ‘अरेच्च्या मी असा विचार करत होतो तर किंवा असा सुष्ट किंवा दुष्ट विचार माझ्या मनात येऊन गेला होता होय’ वगैरेचा साक्षात्कार होत असेल ना? आणि मग सॉर्टिंग सोपे होत जात असेल ना?’
राजूने मध्येच विचारले. ‘हां, तर फक्त शोध असतो. आणि तो शोध प्रसंगी अत्यंत निष्ठूरपणे आणि त्रयस्थ वृत्तीने करणे अपेक्षित असते. त्याची एक पद्धत असावी लागते. एका ठिकाणी शांत बसून, एकाग्र चित्ताने ही प्रक्रिया करायची असते. अंतर्मुख होणे, सिंहावलोकन करणे, वगैरे म्हणतात ते हेच. कधी बसला आहेस, एकचित्त करून?’
राजू जरा बुचकळ्यात पडला.
‘नाही ना लक्षात आले? तर ऐक.’
वाईट सवयी, व्यसने, उंचीची भीती फोबिया, चारचौघांत बोलण्याची भीती वाटणे, चालत्या गाडीत सिगारेट पेटवून ओढत गाडी चालवून इतरांचा जीव धोक्यात घालणे. उजव्या बाजूने वाहन चालवणे, या वाईट सवयी आणि काही चांगल्या सवयी स्वत:शीच अधोरेखित करायच्या. सेट इन ऑर्डरसाठी बाहेर काढून ठेवायच्या. या प्रक्रियेस ‘सॉर्ट’ असे म्हणतात.
सॉर्टिंगसाठी, प्रसंगी जवळच्या व्यक्तींची मदत घ्या.
‘मग पुढे काय करायचे?’ राजू आधीचे सगळे काही कळाल्यासारखा विचारता झाला.
‘शोधलेल्या विचारांची प्रत्यक्ष वर्गवारी ‘सेट इन ऑर्डर’ या दुसऱ्या प्रकारच्या ‘S’ मध्ये होते.