भारतीयांच्या झोपेच्या बदलत्या सवयींबाबतचा एक अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. मोबाईलमुळे ५८ टक्के भारतीय रात्री ११ वाजल्यानंतर झोपतात, असे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. झोपेतून उठल्यावर ४४ टक्के जणांना अपुऱ्या झोपेमुळे अस्वस्थता वाटते. ‘वेकफिट’ या संस्थेने ‘द ग्रेट इंडियन स्लीप स्कोअरकार्ड २०२५’ हे सर्वेक्षण नुकतेच प्रसिद्ध केले आहे.
यावरून हा मोबाईल आता सर्वांची झोप उडवू लागला आहे. ‘जग मुठीत आलं, पण हातात काही नाही राहिलं’, असं म्हणण्याची वेळ आली आहे. १४० कोटी लोकसंख्या असलेल्या भारतामध्ये सुमारे ११५ कोटींपेक्षा जास्त मोबाईलधारक आहेत. १० वर्षांत ७० कोटी मोबाईलधारक वाढले, अशी आकडेवारी सांगते.
माध्यम हाच संदेश, हे मार्शल मॅक्लुहान या तज्ज्ञाचे म्हणणे रोजच्या रोज प्रत्ययाला येत आहे. मोबाईलची भाषा, त्यातून निर्माण होणारी अस्वस्थता, तणाव, चलबिचल पाहता ‘सावध ऐका पुढल्या हाका’ असं म्हणण्याची वेळ आली आहे. साध्या-साध्या गोष्टी बघा. जोपर्यंत आपल्या पोस्टपुढे ‘ब्लू टीक मार्क’ दिसत नाही, तोपर्यंत जीव वरखाली होतो.
व्हॉटस्ॲपवर केलेली पोस्ट संबंधितांनी बघितली की नाही हे सांगणारी ही खूण. ‘अजून का बघितली नाही माझी पोस्ट...’ असा विचार मनात येतो आणि मन दुःखी होतं. कधी कधी तर संबंधित व्यक्तीला फोन करून ‘व्हॉटस्ॲप चेक कर’ असं सांगितलं जातं. आणि पोस्टपुढे ‘ब्लू टीक मार्क’ दिसला की जीव भांड्यात पडतो.
अर्थात ‘ब्लू टीक मार्क’ दिसला म्हणजे आपली पोस्ट संबंधिताने वाचली असं होत नाही. तरी मनाला आनंद होतो. ‘लाइक’ हे चिन्ह तर या भाषेतील मानाचे पहिले चिन्ह आहे. ‘तुझ्या त्या पोस्टला प्रचंड लाइक आले रे...’ हे वाक्य ऐकल्यानंतर आनंदाला उधाण येतं. अर्थात ‘लाइक’ केलेल्यांपैकी किती जणांनी ती पोस्ट वाचली आहे याचा काही हिशेब नसताना मन आनंदित होतं.
कुठल्याही पोस्टला ‘लाइक’चा अंगठा दाखवण्यात नुकसान काहीच नसल्याने समाज माध्यमावर ‘लाइक’च्या अंगठ्याला जोरदार मागणी आहे. ‘हात जोडणे’, ‘अंगठा आणि तर्जनी एकत्र केलेली मुद्रा (मस्त), पुष्पगुच्छ, फुलं अशी भाषाही मनाला सुखावणारी असते. पण असं करणाऱ्यांनी पोस्ट वाचलेली असेलच असे नाही.
पण यातलं काहीच झालं नाही तर मन विचलीत होते, अस्वस्थता वाढते. ‘स्वतःवरून जग ओळखू नये’ अशी एक म्हण आहे. पण येथे ही म्हण नेमकी उलट्या पद्धतीने वाचावी. समाज माध्यमांवरील भाषेचा वर जो उल्लेख केला आहे तसंच आपणही इतरांच्या पोस्टबाबत करतो की नाही? हे स्वतःलाच विचारा.
बराच वेळ मोबाईलवर मालिका बघतो म्हणून हातातून तो काढून घेतल्यामुळे पुण्यातील धनकवडीत एका १४ वर्षीय मुलाने घराच्या खिडकीच्या काचा फोडल्या. शिवाय आईला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून तिच्यावर कात्रीने वार करण्याच्या प्रयत्न केला. काही दिवसांपूर्वीची ही घटना सर्वांनाच गांभीर्याने विचार करायला लावणारी आहे.
या घटनेत आईला शेवटी मुलाविरुद्ध पोलिसांकडे तक्रार करावी लागली, यावरून त्या मातेची काय अवस्था झाली असेल किंवा एका मोबाईलमुळे त्या मुलाने आपल्या आईची काय अवस्था केली असेल, याची कल्पना येईल. या घटनेनंतर तो अल्पवयीन मुलगा बालनिरीक्षणगृहात होता. तो सुधारला, नाही सुधारला हा पुढचा प्रश्न आहे.
पण अशी घटना आपल्या घरात घडू नये यासाठी आपण काही प्रयत्न करणार की नाही? शाळांमध्ये मोबाईल वापरावर बंदी असली तरी शाळेत जाताना किंवा घरी येताना ज्या पद्धतीने मुलं बसमध्ये मोबाईलमध्ये मग्न झालेली पाहायला मिळतात ते पाहून त्यांची ‘मोबाईलची भूक’ किती आहे ते कळते.
मोबाईलच्या अतिरेकी वापराबद्दल अनेक वेळा लिहिले गेले, मार्गदर्शन केले गेले तरी याकडे अद्याप गांभीर्याने बघितले जात नाही हे सत्य आहे. शेजारी घडणाऱ्या किंवा इतरांच्या मुलांबद्दल घडणाऱ्या घटनांकडे आपण आणखी किती दिवस दुर्लक्ष करणार? हा प्रश्न स्वतःला विचारणे गरजेचे आहे. हातात असलेला मोबाईल गेला ‘डोक्यात’ असं म्हणण्याची वेळ आज आली आहे.