सद्गुरू : कोणत्याही अनुभवाची कटुता ही घडलेल्या गोष्टीत नसते, तर तुम्ही ती कशी स्वीकारता यात असते. एका व्यक्तीसाठी जे अतिशय कटू आहे, ते दुसऱ्या व्यक्तीसाठी वरदान असू शकते. एकदा एक दु:खी माणूस एका थडग्यावर पडून जोरजोरात रडत होता, स्वतःचे डोके त्यावर आपटत म्हणाला, ‘माझं आयुष्य! अरे!
हे किती निरर्थक आहे! माझं हे पार्थिव किती निरुपयोगी आहे, कारण तू सोडून गेला आहेस. तू जगला असतास तर सगळं किती वेगळं झालं असतं!’ जवळच असलेल्या एका धर्मगुरूने त्याचा विलाप ऐकला आणि विचारले, ‘मला वाटतं की, या मातीच्या ढिगाऱ्याखाली असलेली व्यक्ती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची होती.’
‘महत्त्वाची? हो, नक्कीच,’ तो माणूस आणखी मोठ्याने रडत म्हणाला, ‘तो माझ्या पत्नीचा पहिला नवरा होता!’’ कटुता ही घडत असलेल्या गोष्टीत नसते, तर ती गोष्ट तुम्ही स्वतःला कशी अनुभवू देता यात असते. त्याचप्रमाणे, तुमच्या भूतकाळातल्या कृती किंवा कर्म हेसुद्धा कामाच्या संदर्भात नसते, तर ते ज्या इच्छेने केले जाते त्यात असते.
तुम्ही माझ्याबाबतीत किंवा माझ्या शिकवणीबद्दल थोडे खुले असाल, तर इच्छा काढून घेतली जाते, मग तुम्ही फक्त जे आवश्यक आहे तेच करता. जागरूकता म्हणजे हेच आहे की; कोणतीही इच्छा नसते. जिथे इच्छा नसते, तिथे कर्म देखील नसते. स्वीकृती म्हणजे तुम्ही जे आवश्यक आहे केवळ तेच करत आहात.
प्रतिसाद देण्याची अमर्याद क्षमता म्हणजे कोणत्याही गोष्टीबद्दल तुमची इच्छा राहत नाही. प्रत्येक परिस्थितीत, तुमच्या जागरूकतेनुसार तुम्हाला जे आवश्यक वाटत आहे, ते तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार करता. तुमच्या इच्छेची ताकदच तुमचे कर्म तयार करते; ते चांगले की वाईट, त्याला महत्त्व नाही.
लोक मला पुनःपुन्हा तोच प्रश्न विचारतात, ‘तुमचे ध्येय काय आहे?’ जेव्हा मी त्यांना सांगतो, ‘माझे काहीही ध्येय नाही, मी फक्त मजा मस्ती करतोय,’ तेव्हा त्यांना वाटते, की मी काहीतरीच बोलत आहे. त्यांना हे समजत नाही, की मला जीवनाबद्दल करता येण्यासारखे हे सर्वांत खोल विधान आहे, कारण त्यामध्ये कोणतीही विशिष्ट इच्छा नाही - फक्त जे आवश्यक आहे ते करणे, बस इतकेच.
यात, तुम्ही काहीही अनुभवले तरी, त्याचे कर्म तयार होत नाही. तुम्ही जे काही करत आहात ते केवळ आवश्यक आहे म्हणून घडत आहे. कर्म हे केवळ ‘काहीतरी करण्याची’ तुमची जी गरज आहे, त्या संदर्भात असते. जेव्हा तुम्हाला काहीही करण्याची गरज नसते आणि तुम्ही केवळ जे आवश्यक आहे तेच करता, तेव्हा त्यात कोणतेही कर्माचे बंधन नसते. ते चांगले किंवा वाईट नसते.