'लो-कार्ब' आहार - काळाची गरज
esakal March 18, 2025 12:45 PM

आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत वाढत्या स्थूलत्वाचा आणि त्यासोबत येणाऱ्या जीवनशैलीजन्य आजारांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मधुमेह, हृदयरोग, इन्सुलिन रेझिस्टन्स, पीसीओडी यांसारख्या सर्व समस्या (NCDs) मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.

या सर्वांचा मूळ गाभा म्हणजे असंतुलित आहार आणि बिघडलेली चयापचय क्रिया (Metabolic Dysfunction). यावर प्रभावी उपाय म्हणून लो-कार्ब आहार ही काळाची गरज बनली आहे.

लो-कार्ब आहार म्हणजे काय?

लो-कार्ब (Low-Carb) आहार म्हणजे आहारातील कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी करणे आणि त्याऐवजी प्रथिने (Proteins) आणि स्निग्ध पदार्थांचे (Healthy Fats) प्रमाण वाढवणे. पारंपरिक आहारात भरपूर प्रमाणात भात, गहू, साखर आणि इतर प्रक्रिया केलेले धान्ये (धान्याचं पीठ करणं म्हणजे प्रक्रिया करणंच) जे शरीरातील इन्शुलिनची लेव्हल वाढवतात (हायपरइन्सुलीनेमिया) आणि चरबी साठवण्यास प्रवृत्त करतात.

या उलट, लो-कार्ब आहारात नैसर्गिक, कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले अन्नघटक निवडले जातात, जे शरीराला पुरेसे इंधन पुरवतात, सतत भूकही लागत नाही आणि रक्तातील साखरेचे प्रमाणही नियंत्रित ठेवतात.

फंक्शनल मेडिसिनचा दृष्टिकोन

फंक्शनल मेडिसिन हा आधुनिक वैद्यकशास्त्राचा एक प्रगत आणि मुळापासून समस्या सोडवण्याचा दृष्टिकोन आहे. तो केवळ आजाराचे निदान करून औषधोपचार करण्याऐवजी शरीराच्या मूळ चयापचयाच्या कार्यक्षमतेवर भर देतो. लो-कार्ब आहाराच्या मदतीने इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी सुधारते, चयापचय क्रिया संतुलित होते आणि शरीर स्टोअर्ड फॅट्सवर ऊर्जा वापरण्यास सक्षम होते (Fat Adaptation).

लो-कार्ब आहाराचे फायदे :

१. इन्शुलिन रेझिस्टन्स आणि मधुमेह नियंत्रण : कमी कार्बोहायड्रेट सेवनामुळे रक्तातील साखर आणि इन्सुलिन नियंत्रित राहते, ज्यामुळे टाइप-२ मधुमेहाचा धोका कमी होतो.

२. स्थूलत्वावर उपाय : लो-कार्ब आहारामुळे शरीर साठवलेल्या चरबीचा इंधन म्हणून वापर करते, ज्यामुळे नैसर्गिकरीत्या वजन कमी होते.

३. ऊर्जावान आणि उत्साही वाटणे : साखर आणि प्रोसेस्ड फूडमुळे येणारा थकवा व सुस्ती दूर होते.

४. मेंदूच्या कार्यक्षमतेत सुधारणा : मेंदूसाठी स्थिर ऊर्जा स्रोत मिळतो, त्यामुळे एकाग्रता आणि मानसिक स्पष्टता वाढते.

५. हृदयाचे आरोग्य सुधारते : ट्रायग्लिसराइड्स (बॅड कोलेस्टेरॉल) कमी होऊन चांगल्या कोलेस्टेरॉलचे (HDL) प्रमाण वाढते.

आहार कसा असावा?

१. नैसर्गिक स्निग्ध पदार्थ (Healthy Fats) : साजूक तूप, खोबरेल तेल, लोणी, नट्स, बिया व कोल्ड प्रेस्ड ऑईल्स (घाण्याचे तेल). शक्यतो जेवण ह्यापैकी एकात बनवावे. रिफाइंड ऑईल टाळावे.

२. भरपूर प्रथिने (Proteins) : अंडी, मासे, चिकन, मटण, पनीर, चक्का, सर्व उसळी इत्यादी.

३. फायबरयुक्त पदार्थ (Fiber) : फ्लॉवर, कोबी, ब्रोकोली, सर्व पालेभाज्या, सर्व फळभाज्या, काकडी, टोमेटो, सर्व मिश्रित कोशिंबीर.

४. अतिरिक्त धान्याचा वापर टाळावा. प्रक्रिया न केलेले पदार्थ आणि नैसर्गिकरीत्या मिळालेले अन्न खावे.

निष्कर्ष

लो-कार्ब आहार हा फक्त ट्रेंड नसून, तो एक वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध व उपयुक्त ठरलेला उपाय आहे. योग्य प्रकारे संतुलित लो-कार्ब आहार घेतल्यास मधुमेह, स्थूलत्व, हृदयरोग, उच्च रक्तदाब आणि असे अनेक जीवनशैलीजन्य आजार टाळता येऊ शकतात. त्यामुळे लो-कार्ब हा आजच्या युगातील उत्तम आरोग्यासाठी आवश्यक असा जीवनशैली बदल आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.