नागपुरात दोन गटातील वादातून तणाव निर्माण झाला आहे. वाहनांची जाळपोळ आणि दगडफेकीची घटना घडली आहे. पोलिसांनी बळाचा वापर करून परिस्थिती नियंत्रणात आणली असून शांतता राखण्याचं आवाहन सर्वसामान्यांना केलं आहे.
नागपूर झालेल्या हिंसाचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर नागपूरचे पोलीस उपायुक्त (डीसीपी) अर्चित चांडक यांनी माहिती दिली आहे.
अर्चित चांडक म्हणाले की, "ही घटना गैरसमज किंवा चुकीच्या संवादामुळे घडली. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. आमचं इथलं पोलीस दल भक्कम आहे. माझं सर्वांना आवाहन आहे की घराबाहेर पडू नका किंवा दगडफेक करू नका. दगडफेक होत असल्यामुळे आम्हाला बळाचा वापर करावा लागला. तसंच अश्रुधुराचा देखील वापर करावा लागला."
"इथे काही वाहनं जाळण्यात आली. अग्निशमन दलाला बोलावून आम्ही आग विझवली आहे. काही पोलीस कर्मचारीदेखील जखमी झाले आहेत. दगडफेक होत असताना माझ्या पायालादेखील छोटी दुखापत झाली आहे," चांडक म्हणाले.
"मात्र सर्वांनाच आम्ही शांतता राखण्याचं आवाहनं करतो. अफवांवर विश्वास ठेवू नका. कायदा आणि सुव्यवस्था मोडू नका. पोलिसांना सहकार्य करा. या घटनेसंदर्भात आम्ही कायदेशीर कारवाई करत आहोत," असं चांडक म्हणाले.
केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरींनी सर्वांना शांततेचे आवाहन केले आहे.
नागपुरच्या महाल परिसरात आज (17 मार्च) संध्याकाळी तोडफोड आणि दगडफेकीची घटना झाली आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचं नागपूर पोलिसांनी सांगितलं आहे.
घटनेनंतर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस दल तैनात करण्यात आलं आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)