श्रीरामपूर : मोठमोठ्या शहरांमध्ये सुरू असलेले वाईफ स्वॅपिंगचे लोण श्रीरामपूरसारख्या शहरातही पोचले आहे. याबाबत एका पीडित पत्नीच्या फिर्यादीवरून पतीसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत पीडितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, लग्नानंतर काही दिवसांनी पतीने मारहाण, शिवीगाळ सुरू केली. सासू-सासरेही त्रास देत असत. सुमारे दीड वर्षापूर्वी पतीने लोणी येथील प्रवरा कॉलेज मागे राहणाऱ्या अनोळखी व्यक्तीसोबत आम्ही परस्परांना ओळखत नसताना संबंध ठेवण्यास भाग पाडले. त्या अनोळखी व्यक्तीने धमकावून शारीरिक अत्याचार केले, तसेच फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली.
त्यानंतर मागील ११ ते १२ महिन्यांपूर्वी पतीने फेसबुकवर दोन दिवसांपूर्वी ओळख झालेल्या एका व्यक्तीस आपण चांगले मित्र बनूया, असा मैत्रीचा बहाणा करुन त्यास भेटायला बोलावले. त्यानंतर एका लॉजवर पतीने मला व त्या व्यक्तीस फसवून एका खोलीत नेले, तर दुसऱ्या खोलीत पतीने संबंधित व्यक्तीसह आलेल्या महिलेस नेले.
त्यानंतर तीन ते चार महिन्यांपूर्वी छत्रपती संभाजीनगर येथे कामानिमित्त गेले असता, पतीने संबंधित व्यक्तीच्या गंगापूर येथील घरी नेले. तेथे पतीने तुम्ही माझ्या पत्नीसोबत व मी तुमच्या पत्नी सोबत शारिरीक संबंध करतो, असे सांगितले. मात्र, मी त्यास नकार दिला, असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी शहर पोलिसांत पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून पतीसह लोणी येथील व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.