पाकिस्तान क्रिकेट टीमला न्यूझीलंडविरुद्ध सलग दुसऱ्या टी 20I सामन्यात पराभूत व्हावं लागलं आहे. पावसामुळे उभयसंघात 15 ओव्हरचा सामना खेळवण्यात आला. युनिव्हर्सिटी ओव्हल, डुनेडिन येथे आयोजित करण्यात आलेल्या सामन्यात पाकिस्तानने 15 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 135 धावा केल्या. प्रत्युत्तरात यजमान न्यूझीलंडने 136 धावांचं आव्हान हे 11 चेंडू राखून पूर्ण केलं. किंवींनी 13.1 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 137 धावा केल्या. न्यूझीलंडने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशा एकतर्फी फरकाने आघाडी घेतली आहे.
न्यूझीलंडसाठी टीम सायफर्ट याने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. सायफर्टने 22 बॉलमध्ये 5 सिक्स आणि 3 फोरसह 45 रन्स केल्या. फिन एलन याने 16 चेंडूत 5 षटकार आणि 1 चौकारसह 38 धावा केल्या. मार्क चॅपमॅन याने 1, जेम्स निशाम याने 5 आणि डॅरेल मिचेलने 14 धावांचं योगदान दिलं. तर अखेरीस मिचेल हे आणि कर्णधार मायकल ब्रेसवेल या जोडीने न्यूझीलंडला विजयापर्यंत पोहचवलं. मिचेल हे याने 16 बॉलमध्ये नाबाद 21 धावांची खेळी केली. तर मायकल ब्रेसवेलने नॉट आऊट 5 रन्स केल्या. तर पाकिस्तानकडून हारिस रौफ याने 2 विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद अली, खुशदिल शाह आणि जहांदाद खान या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
न्यूझीलंडने टॉस जिंकून पाकिस्तानला बॅटिंगसाठी भाग पाडलं. पाकिस्तानकडून एकूण 5 जणांनी दुहेरी आकडा गाठला. कॅप्टन सलमान आघा याने सर्वाधिक 46 रन्स केल्या. शादाब खान याने 26 धावा केल्या. मोहम्मद हारिस आणि अब्दुल समद या दोघांनी प्रत्येकी 11-11 धावा जोडल्या. तर अखेरीस शाहीन अफ्रिदी याने 14 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 2 फोरसह नॉट आऊट 22 रन्स केल्या. दोघांना भोपळाही फोडता आला नाही. न्यूझीलंडकडून जेकब डफी, बेन सियर्स, जेम्स निशाम आणि इश सोढी या चौघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या.
न्यूझीलंडचा सलग दुसरा विजय
न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : मायकेल ब्रेसवेल (कर्णधार), टिम सेफर्ट, फिन ऍलन, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, मिशेल हे (विकेटकीपर), झकरी फॉल्क्स, जेकब डफी, ईश सोधी आणि बेन सीयर्स.
पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन : सलमान आघा (कर्णधार), मोहम्मद हरिस (विकेटकीपर), हसन नवाज, इरफान खान, शादाब खान, अब्दुल समद, खुशदिल शाह, जहांदाद खान, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ आणि मोहम्मद अली.