Ahilyanagar Crime : एलसीबीकडून पोलखोल! : दीड महिन्यात ११ खून; जलद तपास करून आरोपी गजाआड
esakal March 18, 2025 07:45 PM

-अरुण नवथर

अहिल्यानगर : शहरासह जिल्ह्यात खुनाची मालिका सुरूच आहे. गेल्या दीड महिन्यात ११ खून झाले आहेत. त्यापैकी शिर्डी, दाणेवाडी, नारायणडोहो येथील खुनाच्या तपासाचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. परंतु एलसीबीने (स्थानिक गुन्हे शाखा) या गुन्ह्यांचा जलद तपास करून आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. नुकत्याच झालेल्या दाणेवाडी येथील खुनाच्या गुन्ह्याची उकल देखील एलसीबीने केली.

दरम्यान, या खुनाचा तपास पूर्ण होत नाही, तोच आज सायंकाळी निंबळक बायपास परिसरात आणखी एक मृतदेह आढळून आला आहे. खुनाच्या या घटना रोखण्यात पोलिस प्रशासन अपयशी ठरत असले, तरी आरोपींना तत्काळ गजाआड करण्यात मात्र एलसीबी यशस्वी ठरत आहे.

अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यात खुनासारखे गंभीर गुन्हे सातत्याने घडत आहेत. एक खुनाच्या गुन्ह्याचा तपास पूर्ण होत नाही, तोच दुसऱ्या खुनाचा प्रकार समोर येत आहे. श्रीगोंदे तालुक्यातील दाणेवाडी येथे १९ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून केल्याचा प्रकार नुकताच समोर आला.

त्याचे शीर आणि हात-पाय धडावेगळे करून मृतदेह विहिरीत टाकण्यात आला. या खुनामुळे दाणेवाडीसह परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच गुन्ह्याच्या तपासाबाबत पोलिसांवर मोठा दबाव होता. अशा परिस्थितीत एलसीबीने जलद गतीने तपास करून आरोपीला अटक केली. शिर्डी येथील संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांच्या खुनाच्या तपासाचे देखील मोठे आव्हान होते. नारायणडोहो शिवारातील अनोळखी मृतदेह, तसेच एमआयडीसी परिसरात वैभव नायकोडी या १९ वर्षीय तरुणाला मारहाण करून त्याचा मृतदेह डिझेल टाकून जाळण्यात आला. दीड महिन्यात असे ११ खून झाले आहेत. हे गुन्हे वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत झाले असले, तरी तपास मात्र एलसीबीने तडीस नेला. केवळ तपासत नव्हे, तर सर्व खुनाच्या गुन्ह्यांतील आरोपींना बेड्या देखील ठोकल्या आहेत. एलसीबीच्या या कामगिरीने गुन्हेगार गजाआड झाले. परंतु खुनासारख्या गंभीर गुन्ह्यांची मालिका मात्र अद्याप थांबलेली नाही.

गुंतागुंतीच्या गुन्ह्यांचा तपास

वैभव नायकोडी या १९ वर्षीय तरुणाच्या खुनाच्या गुन्ह्यात आरोपींची संख्या अधिक होती. काही आरोपींना तोफखाना पोलिसांनी पकडले. परंतु त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली नव्हती. एलसीबीने अन्य आरोपींचा शोध घेऊन या गुन्ह्याचा तपास पूर्ण केला. दाणेवाडी येथील माऊली गव्हाणे याच्या खुनाने तर जिल्हाभर खळबळ उडाली होती. हा खून नाजूक कारणातून झाला, त्यामुळे तपासही गुंतागुंतीचा झाला होता. परंतु एलसीबीचे निरीक्षक दिनेश आहेर यांनी या गुन्ह्याची उकल केली. नारायणडोह शिवारातील अनोळखी मृतदेहाची ओळख पटविणेही अवघड होते. परंतु हा तपास पूर्ण करून आरोपीला आग्रा येथून अटक केली.

तांत्रिक विश्लेषणावर भर

खुनाच्या गुन्ह्यात तांत्रिक विश्लेषण महत्त्वाचे आहे. त्यावरून आरोपी, तसेच खुनाचे कारण निष्पन्न होते. एलसीबीकडे तांत्रिक विश्लेषणासाठी स्वतंत्र टीम आहे. तसेच पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांचा अनुभव मोठा आहे. त्यामुळेच वारंवार ठिकाण बदलून राहणाऱ्या काही आरोपींना एलसीबीने थेट परराज्यातून अटक केली आहे.

आपसांतील वादातून, चोरीच्या उद्देशाने देखील गुन्हे घडतात. दाणेवाडी सारख्या गुन्ह्याचा तपास गुंतागुंतीचा होता. खुनाचे गुन्हे घडू नयेत, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. गुन्ह्याचा प्रकार, तांत्रिक विश्लेषण, तसेच परिस्थितीजन्य पुरावे, सीसीटीव्ही यांसारखे पुरावे तपासात महत्त्वाचे ठरतात.

- दिनेश आहेर, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा

ही आहेत खुनाची कारणे
  • चोरीचा उद्देश

  • अनैतिक संबंध

  • दारूची नशा

  • पूर्ववैमनस्य

  • घरगुती भांडण

  • प्रेमसंबंध

  • कर्ज, जुगार

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.