आयपीएलच्या 18 व्या मोसमाची सर्व तयारी झाली आहे. एकूण 10 संघांनी सरावही सुरु केला आहे. या हंगामातील सलामीचा सामना हा 22 मार्चला खेळवण्यात येणार आहे. गतविजेता कोलकाता विरुद्ध बंगळुरु यांच्यात सलामीचा सामना खेळवण्यात येणार आहे. या हंगामात कोलकातासमोर ट्रॉफी कायम राखण्याचं आव्हान असणार आहे. तर इतर 9 संघ ट्रॉफी जिंकण्यासाठी जोरदार प्रयत्न करताना दिसणार आहेत. या स्पर्धेत आतापर्यंत एकूण 17 हंगामांचं यशस्वीरित्या आयोजन करण्यात आलं आहे. मात्र या स्पर्धेच्या इतिहासात निवडक गोलंदाजांनाच एका डावात 5 विकेट्स घेता आल्या आहेत. ते कोण आहेत? हे सविस्तर जाणून घेऊयात.
आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत फक्त 4 गोलंदाजांनाच 2 वेळा एका डावात 5 विकेट्स घेतल्या आहेत. या चौघांमध्ये 3 भारतीय आणि 1 विदेशी गोलंदाजाचा समावेश आहे. जेम्स फॉकनर याने आयपीएलमध्ये 2011 ते 2017 या दरम्यान अनेक संघांचं प्रतिनिधित्व केलं. जेम्सने या दरम्यान 2 वेळा 5 विकेट्स घेतल्या. तसेच जेम्सने आयपीएल कारकीर्दीतील 60 सामन्यांत 59 विकेट्स घेतल्या.
जयदेव उनाडकट 2010 पासून आयपीएलमध्ये खेळतोय. जयदेवने 105 सामन्यांमध्ये 99 विकेट्स घेतल्या आहेत. जयदेवने 2 वेळा 5 विकेट्स घेतल्या आहेत. जयदेवला आयपीएलमध्ये विकेट्सचं शतक पूर्ण करण्यासाठी फक्त 1 विकेटची गरज आहे. तसेच भुवनेश्वर कुमार यानेही 2 वेळा 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. भुवनेश्वर आयपीएल स्पर्धेत 2011 पासून खेळतोय. भुवीने 176 आयपीएल सामन्यात 181 विकेट्स घेतल्या आहेत.
आयपीएल 18 व्या मोसमाचं वेळापत्रक
जसप्रीत बुमराह आयपीएल स्पर्धेतील एकाच सामन्यात 5 विकेट्स घेणारा एकूण चौथा आणि तिसरा भारतीय गोलंदाज आहे. बुमराह 2013 पासून आयपीएलमध्ये खेळतोय. बुमराहने तेव्हापासून 133 सामन्यांमध्ये 165 विकेट्स घेतल्या आहेत. ‘यॉर्कर किंग’ बुमराह यानेही 2 वेळा 5 विकेट्स घेतल्या आहेत. मात्र यंदा बुमराहला दुखापतीमुळे सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकावं लागू शकतं. बुमराहला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात झालेल्या दुखापतीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेलाही मुकावं लागलं होतं.