Mumbai: मुंबईकरांचा पाणीप्रश्न लवकरच सुटणार! पाणीटंचाई दूर करण्यासाठी राज्य सरकार मोठे पाऊल उचलणार
esakal March 19, 2025 03:45 AM

मुंबईः मुंबईकरांना मिळणाऱ्या अपुऱ्या पाण्याचा प्रश्न लवकरच सोडवण्यात येणार आहे. यासाठी समुद्राचे पाणी गोडे करण्यासाठीच्या निःक्षारीकरण प्रकल्पाची निविदा अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताच काढली जाणार आहे. त्यासाठी महापालिका आयुक्तांना निर्देश दिले जाणार असल्याची ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत मंगळवारी (ता. १८) दिली.

पाणीटंचाई दूर करण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञानाची गरज असल्यास त्याबाबतही महापालिकेला आदेश दिले जातील, असेही सामंत म्हणाले.विधान परिषदेचे सदस्य राजहंस सिंह यांनी मुंबईतील अपुऱ्या पाणीपुरवठ्यासंदर्भात लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती, तर अनिल परब यांनी समुद्रातील पाणी गोडे करण्याचा निःक्षारीकरण प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याचा मुद्दा मांडला. त्यावर सामंत यांनी अधिवेशन संपताच याबाबत जागतिक निविदा काढण्याबाबत महापालिका आयुक्तांना निर्देश दिले जातील, अशी स्पष्ट ग्वाही दिली.

विविध धरणांतून चार हजार दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. १२ नोव्हेंबर २०१३ रोजी गारगाई प्रकल्प मुंबई महापालिकेला विकसित करण्यासाठी परवानगी दिलेली होती. या प्रकल्पासाठी चार वर्षांचा कालावधी लागणार असून, तो पूर्ण झाल्यास ४४० दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणी मुंबईला मिळेल. यावर भाजपाचे प्रवीण दरेकर, भाई जगताप आदींनी उपप्रश्न उपस्थित केले होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.