वाघोली - पाणी वितरित करणाऱ्या टेम्पो खाली आल्याने दोन वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. या प्रकरणी अल्पवयीन चालक मुलासह त्याच्या वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना लोणीकंद येथे घडली.
मल्हार अक्षय चापोडे (वय-२ वर्ष ) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या बालकाचे नाव आहे.
याप्रकरणी अक्षय चापोडे यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टेम्पोने पाणी दिल्यानंतर अल्पवयीन मुलगा टेम्पो पुढे घेत होता. टेम्पोचा मल्हार याला धक्का लागल्याने तो समोरील चाकाखाली आला.
यामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याचा उपचारापूर्वी मृत्यू झाला. लोणीकंद पोलिसांनी अल्पवयीन चालक मुलासह त्याच्या वडिलांवर गुन्हा दाखल केला. पुढील तपास लोणीकंद पोलीस करीत आहेत.