Nagpur News : औरंगजेबाच्या कबरीवरून नागपूरमध्ये उसळलेली दंगल पूर्वनियोजित होती. मशिदीच्या भोंग्यावरून मुस्लिमांना चिथावणी देण्यात आली, असा आरोप भाजपने केला आहे. त्यामुळे अजनासाठी मशिदीत वापरल्या जाणारे भोंगे बंद करण्याची मागणी शहर भाजपच्यावतीने पोलिस आयुक्तांकडे करण्यात आली. यावेळी भाजपच्यावतीने बांगलादेशी रोहिंग्यावर शंका व्यक्त करून त्यांना शोधून काढण्याची मागणी करण्यात आली.
सोमवारी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्यावतीने महाल येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले होते. मात्र, आंदोलनाचे पडसाद रात्री आठ वाजताच्या सुमारे शहरात उमटले. अचानक एक जत्था हिंदू-मुस्लिम बहूल हंसापुरी परिसरात धावून आला. त्यांनी तुफान दगडफेक केली, तोडफोड केली. रात्री बारावाजेपर्यंत हा प्रकार सुरू असल्याने शहरात एकच खळबळ उडाली होती.
दंगल उसळण्याचा अंदाज येताच पोलिस परिसरात धावून गेले. त्यांच्यावरही दगडफेक करण्यात आली. यात काही पोलिस अधिकारी जखमी झाले आहेत. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (), मध्य नागपूरचे आमदार प्रवीण दटके अधिवेशन सोडून तातडीने नागपूरला आले.पोलिसांनी परिसरातील संचारबंदी लागू केली. शाळा, कॉलेज, महाविद्यालयांना सुटी जाहीर केली. मंगळवारी दिवसभर शहरात तणाव पूर्ण शांतता होती. मात्र, मुस्लिम आणि हिंदूमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे.
भाजपचे () शहराध्यक्ष बंटी कुकडे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने पोलिस आयुक्तांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मशिदीवरील भोंग्यावरून हिंदूंना मारण्याचे आवाहन करण्यात आले होते, असा आरोप बंटी कुकडे यांनी केला. त्यामुळे मशिदीतील भोंगे कायद्यानुसार बंद करावेत, अशी मागणी त्यांनी केली.
हंसापुरीत झालेली दगडफेक, जाळपोळ, तोडफोड पूर्वनियोजित होती. एकूण 30 वाहने जाळण्यात आली. भागलदारापुरा येथे अचानक दोन हजार लोक कसे जमा झाले, याचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. भाजपने बांगलादेशी रोहिंग्यावरही शंका व्यक्त करून त्यांची ओळखपरेड करण्याची मागणी केली.
भाजपच्या शिष्टमंडळात शहराध्यक्ष बंटी कुकडे यांच्यासह माजी आमदार डॉ. मिलिंद माने, प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे, विदर्भाचे संगठन मंत्री डॉ. उपेंद्र कोठकर, राजेश बागडी, गिरीश देशमुख, महामंत्री राम अंबुलकर, गुड्डू त्रिवेदी, अश्विनी जिचकार, संजय बंगाले यांचा समावेश होता.