वाघोली - घरात आई काम सांगते म्हणून घरातून शाळेत न जाता निघून गेलेल्या दोन तेरा वर्षीय अल्पवयीन मुलींना चंदननगर पोलिसांनी तासाभरात शोधून त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले.
दोघी एका वर्गात शिकणाऱ्या. मंगळवारी सकाळी त्या शाळेत जाण्यासाठी निघाल्या. मात्र शाळेत न जाता त्या दुसरीकडे निघून गेल्या. शाळेने पालकांना मुली आज शाळेत आल्या नसल्याचे कळविले. पालकांनी त्यांचा तत्काळ शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या मिळून न आल्याने त्यांनी चंदानगर पोलिस ठाणे गाठले. त्यांनी पोलिसांनी ते सांगितले.
चंदननगर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक सीमा ढाकणे यांनी तत्काळ पथक नेमून त्यांची शोधाशोध सुरू केली. त्यातील एकीकडे मोबाईल असल्याचे त्यांना कळले. त्यांनी सी सी टीव्ही व मोबाईल या आधारे त्यांचा शोध सुरू केल्या. त्या रिक्षाने पुण्यात फिरत असल्याचे लोकेशन वरून लक्षात आले.
पोलिसांनी अखेर त्यांना कसबा पेठेत गाठले. त्यांना परत आणून पालकांच्या स्वाधीन केले. त्यांनी आपल्या सोबत चौदा हजार रुपये बरोबर नेले होते. पोलिसांना मदत करणारे रिक्षाचालक संतोष लोखंडे व कृष्ण नागपुरे यांचा सहायक पोलिस आयुक्त प्रांजली सोनावणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
पोलीस उपनिरीक्षक किरण मोरे, पोलीस अंमलदार विजय टिकेकर, रामचंद्र गुरव, विश्वनाथ गोणे, नानासाहेब पतुरे, अमोल कोळेकर, भारत उकिर्डे, शिवाजी धांडे, मनोज भंडारी, अतुल आदकयांच्या पथकाने ही कामगिरी केली.