Uddhav Thackeray : 'गृहखाते झोपा काढत होते का?'
esakal March 19, 2025 05:45 AM

‘नागपूरमध्ये उसळलेली दंगल पूर्वनियोजित होती, असे सरकार सांगत असेल तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृह नागपूरमध्ये आहे. संघाचे मुख्यालयही तिथेच आहे. असे असताना तिथे हिंदू खतरे मे कसा काय? नागपूर दंगल पूर्वनियोजित असेल तर तुमचे गृहखाते झोपा काढत होते का? कट शिजतोय हे गृहखात्याच्या कानावर आले असेल तर त्यांनी दुर्लक्ष केले का? ’असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला.

विधिमंडळ आवारात बोलताना उद्धव ठाकरे यांनी औरंगजेबाची कबर आणि नागपूर दंगलीवरून सरकारवर ताशेरे ओढले. सरकार आपले अपयश लपविण्यासाठी इतर मुद्दे उपस्थित करत आहे. त्यात ते आणखी अपयशी ठरत आहे अशी टीका त्यांनी केली.

ते म्हणाले की, ‘राहुल सोलापूरकर, प्रशांत कोरटकर, माजी राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला. पण दुसऱ्या बाजूला त्यांना सोडून औरंगजेबावरून दंगली लावल्या जात आहेत. गुजरातमध्ये जन्माला आलेल्या औरंगजेबाविरोधात छत्रपती शिवाजी महाराजांनी संघर्ष करून हिंदवी स्वराज्य स्थापन केले होते. नंतर औरंगजेब स्वराज्यावर चालून आला, पण तो महाराष्ट्राच्या मातीचा एक कणही जिंकू शकला नाही.’

आंदोलन करण्यापेक्षा कबर उखडून टाका

‘जे लोक औरंगजेबाचे थडगे उखडून टाकण्याची भाषा वापरत असेल तर त्यांनी नुसते आंदोलन करण्यापेक्षा त्यांनी पंतप्रधान मोदींकडे जावे. पंतप्रधान मोदींनी नितीशकुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या उपस्थितीत औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करावी,’ असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

औरंगजेब असो किंवा अफजल खान असो, ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे पुरावे आहेत. डबल इंजिन सरकार नुसती वाफ सोडण्यासाठी आहे का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कबर नष्ट करण्यासाठी असमर्थतता दाखवली असून त्याला केंद्राचे संरक्षण असल्याची बाब उद्धव ठाकरे यांनी निदर्शनास आणली.

तेव्हा एकनाथ शिंदे मोदींच्या ‘डस्टबिन’मध्ये होते. उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत मोदी यांची माफी मागितल्याचे विधान एकनाथ शिंदे यांनी केले. याविषयीच्या प्रश्नावर ‘होय तेव्हा एकनाथ शिंदे हे नरेंद्र मोदी यांच्या ‘डस्टबिन’मध्ये होते. कळलेच नाही,’ असे उपरोधिक उत्तर त्यांनी दिले.

महाराष्ट्राचा मणिपूर करण्याची भाजपची इच्छा आहे. त्यांना ज्या ठिकाणी सत्ता राबवता येत नाही, त्या ठिकाणी ते दंगली घडवतात. औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मुद्यावरून नागपूर येथे हिंसाचार झाला. मुख्यमंत्री कार्यालयाकडून कोणताही प्रतिसाद किंवा माहिती देण्यात आली नाही.

- आदित्य ठाकरे, आमदार

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.