अर्जेंटिनामध्ये झालेल्या विभागीय पात्रता फेरीतील प्रभावी कामगिरीमुळे अमेरिकेच्या महिला संघाने 2026 महिला टी-20 विश्वचषकासाठी जागतिक पात्रता फेरीत स्थान मिळवले आहे. ICC महिला टी-20 विश्वचषक अमेरिका क्षेत्रीय पात्रता फेरी 2025 जिंकून USA ने पुढील वर्षी इंग्लंडमध्ये होणाऱ्या जागतिक स्पर्धेकडे वाटचाल केली आहे.
अमेरिकन संघाने सोमवारी झालेल्या अंतिम सामन्यात कॅनडाचा 78 धावांनी पराभव करत गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवले आणि जागतिक पात्रता फेरीसाठी पात्र ठरले.
चार जागांसाठी लढतजागतिक पात्रता फेरीचे आयोजन कधी आणि कुठे होणार हे अद्याप जाहीर झाले नाही, मात्र या 10 संघांच्या स्पर्धेतून 2026 च्या महिला टी-20 विश्वचषकासाठी चार संघांना थेट प्रवेश मिळणार आहे. USA व्यतिरिक्त बांगलादेश आणि स्कॉटलंड या संघांनी आधीच जागतिक पात्रता फेरीसाठी आपले स्थान निश्चित केले आहे.
टूर्नामेंटच्या पहिल्या सामन्यात कॅनडाकडून पराभूत झाल्यानंतर USA संघाने शानदार पुनरागमन करत निर्णायक सामन्यात विजय मिळवला. कर्णधार अनिका कोलन हिने 34 धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत USA ला 131/6 धावसंख्येपर्यंत पोहोचवले.
प्रत्युत्तरात कॅनडाचा संपूर्ण संघ केवळ 53 धावांवर बाद झाला. युवा फिरकीपटू चेतना प्रसाद हिने 4 बळी घेत विजयात मोलाचा वाटा उचलला.
चेतना प्रसाद हिने या पात्रता फेरीत एकूण 9 बळी घेतले, तर तिच्या साथीदार अदितीबा चुडासमा हिने 10 बळी घेत सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरली. USA संघाची सलामीवीर दिशा धिंग्रा अंतिम सामन्यात 16 धावांवर बाद झाली, मात्र संपूर्ण स्पर्धेत तिने 123 धावा (सरासरी 20.50) करत सर्वाधिक धावा करणारी फलंदाज बनली.
यजमान इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, पाकिस्तान आणि श्रीलंका टी२० वर्ल्ड कपसाठी थेट पात्र ठरले आहे. अन्य ४ संघ जागतिक पात्रता स्पर्धेतून निश्चित होणार आहेत. जागतिक पात्रता फेरीत १० संघ खेळतील, ज्यात बांगलादेशचाही समावेश आहे.