आंतरराष्ट्रीय अवकाश तळावर अडकून पडलेल्या सुनीता विलियम्स यांचं 9 महिन्यांनी पृथ्वीवर पुनरागमन झालं आहे. इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीच्या ड्रॅगन कॅप्सूलमधून सुनीता विलियम्स यांचं फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर लँडिंग झालं. सुनीत विलियम्स यांच्या सुरक्षित पुनरागमनाने भारतात आनंद आहे. कारण त्या भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर आहेत. सुनीता विलियम्सची चुलत बहिण फाल्गुनी पंड्या सुनीताच भारतीय संस्कृतीशी जे कनेक्शन आहे, त्या बद्दल मोकळेपणाने बोलली. सुनीता विलियम्स स्वत:सोबत आंतरराष्ट्रीय अवकाश तळावर गणपतीची मुर्ती घेऊन गेली होती. संपूर्ण प्रवासात तिने ही मुर्ती आपल्याजवळ ठेवली होती.
फाल्गुनी पंड्याने मीडियाशी बोलताना हे सांगितलं. सुनीता विलियम्स आंतरराष्ट्रीय अवकाश तळावर नऊ महिन्यापेक्षा जास्त काळ होती. सहअंतराळवीर बुच विल्मोर आणि चालक दलाच्या दोन सदस्यांसह सुनीता पृथ्वीवर परतल्या आहेत. फाल्गुनी पंड्याने सुनीता विलियम्सच्या घर वापसीबद्दल आनंद व्यक्त केला. सुनीता सुरक्षित परतल्याने मंदिरात प्रार्थना आणि हवन करण्यात येणार असल्याच फाल्गुनीने सांगितलं.
सुनीताच्या भारतीय आवडी-निवडीबद्दल चुलत बहिणीने काय सांगितलं?
बहिण परत आल्याने फाल्गुनी पंड्या खूप खुश आहे. “आम्ही आतुरतेने तिच्या परतण्याची वाट पाहत आहोत. आम्ही सुनीताच्या परतण्याचा आनंद साजरा करण्यासाठी मंदिरात विशेष प्रार्थना आणि हवनची योजना बनवली आहे” असं फाल्गुनी पंड्याने सांगितलं. फाल्गुनीने सांगितलं की, “सुनीताने ISS वर तरंगत असलेल्या गणेशाची प्रतिमा शेअर केली होती” भारतीय खाद्यपदार्थांवर सुनीताच किती प्रेम आहे, त्या बद्दल फाल्गुनी बोलली. पृथ्वीवर आल्यानंतर सुनीताची भारतात येण्याची योजना असल्याच ती म्हणाली. सुनीताला भारतीय खाद्य पदार्थ खूप आवडतात. आता आम्ही पुन्हा भारतात येऊ असं फाल्गुनी पंड्याने सांगितलं.
पीएम मोदीना कधी भेटलेली?
“आम्ही 2007 साली मोदींना भेटलो होतो. त्यावेळी ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर सुनीता आणि तिचे वडिल अमेरिकेत पीएम मोदींना भेटले होते. सुनीताला भारतीय जेवण खूप आवडतं. आम्ही पुन्हा भारतात येऊ. ती गुजरातची मुलगी आहे. आमचं गाव झूलासनमध्ये लोक सुनीताच्या सुरक्षित येण्याचा आनंदोत्सव साजरा करत आहेत. तिचे वडिल नेहमीच गुजरात ते अमेरिकेपर्यंतच्या प्रवासाचे किस्से सांगत असतात” असं सुनीताची चुलत बहिण फाल्गुनी पंड्या म्हणाली.
सुनीताला कधी भेटणार?
“ज्यावेळी मी भारतात कुंभ मेळ्यासाठी आली होती, त्यावेळी सुनीता कुंभ मेळ्याशी संबंधित प्रत्येक छोटी-मोठी गोष्ट जाणून घेण्यासाठी उत्सुक होती. ज्यावेळी मी तिला कुंभ मेळ्याचे फोटो दाखवले, त्यावेळी तिने अवकाशातून मला कुंभ मेळ्याचा फोटो पाठवला. कुंभ मेळ्याचा तो सुंदर फोटो होता. मागच्याच आठवड्यात माझं तिच्याशी बोलण झालं होतं. ती खूप आनंदी होती. 9 महिन्यांनी पृथ्वीवर परतली आहे. आम्ही पुढच्या काही दिवसात भेटण्याचा प्लान बनवला आहे. पृथ्वीवर आल्यानंतर ती रिहॅबमध्ये जाईल, तिथे आम्ही तिला भेटू” असं फाल्गुनी पंड्याने सांगितलं.