Sunita Williams Return : Starliner यानामुळे सुनीता विलियम्स यांना वनवास, 9 महिने अडकल्या अंतराळात, आता Boeing कंपनीचे भविष्य काय?
GH News March 19, 2025 02:10 PM

अखेर भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विलियम्स पृथ्वीवर सुखरूप परतल्या. त्यांच्या चेहर्‍यावरील गोड हास्याने 9 महिन्यांच्या संयम दिसून आला. भारतीय वेळेनुसार आज भल्या पहाटे SpaceX च्या ड्रॅगन कॅप्सूलच्या माध्यमातून फ्लोरिडाच्या समुद्र किनार्‍यावर त्यांचं यशस्वी लँडिंग झाले. 5 जून 2024 रोजीपासून सुनीता विलियम्स आणि बूच विल्मोर हे दोघे बोईंग कंपनीच्या स्टारलाईनर या अंतराळ यानातून (Spacecraft) अंतराळासाठी रवाना झाले होते. 8 दिवसानंतर 13 जून 2024 रोजी त्या सहकार्यासोबत पृथ्वीवर परतणार होत्या. पण तांत्रिक बिघाड दुरूस्तच न झाल्याने या दोघांना 9 महिने स्पेस स्टेशनमध्येच अडकून पडावे लागले. त्यांच्या सुटकेचे या दरम्यान प्रयत्न झाले. पण त्यात यश आले नाही. बोईंगऐवजी जागतिक अब्जाधीश एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीने त्यांची अंतराळातून सुटका केली. त्यामुळे आता बोईंगच्या Starliner या अंतराळयानावरच नाही तर कंपनीच्या भवितव्यावरच मोठे प्रश्नचिन्ह उभं ठाकलं आहे.

NASA ने ऑक्टोबर 2011 मध्ये बोईंग कंपनीला अंतराळ यान तयार करण्याचे काम सोपवले होते. पुढे स्टारलाईनर तयार करण्यासाठी 6 वर्षे लागली. 2017 मध्ये ते तयार झाले. 2019 पर्यंत या स्टारलायनरच्या चाचण्या सुरू होत्या. हे अंतराळ यान अंतराळाकडे झेपावले. पण त्यात कोणताही मनुष्य नव्हता. ही उड्डाणे मानवरहीत होती. त्यानंतर मानवासह झालेले उड्डाणच धोक्यात आले. गेल्या 9 महिन्यांपासून दोन अंतराळवीर अंतराळातच अडकून पडल्याने स्टारलायनरच्या कार्यक्षमतेवरच मोठे प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.

स्टारलायनर मदत कमी, ताप जास्त

स्टारलायनरचे पहिले मानवरहित अंतराळ कक्षासाठीची चाचणी 20 डिसेंबर 2019 रोजी करण्यात आली. पण त्यात सॉफ्टवेअरमध्ये गडबड झाल्याचे समोर आले. ते दुसर्‍याच कक्षेत पोहचले. स्पेस स्टेशनमध्ये त्याची डॉकिंग सुद्धा होऊ शकले नाही. दोन दिवसानंतर न्यू मॅक्सिकोच्या व्हाईट सँड्स मिसाईल रेंजमध्ये स्टारलायनर परतले.

प्रत्येक उड्डाणामध्ये अडचण

दुसर्‍या मानवरहित उड्डाण 6 एप्रिल 2020 रोजी झाले होते. या यानाला अंतराळ स्थानकापर्यंत जायचे होते. त्यानंतर पृथ्वीवर परत यायचे होते. पण लाँचिंगवेळीच थोडी अडचण आली. तांत्रिक कारण पुढे करत हे उड्डाण लांबणीवर पडले. ऑगस्ट 2021 मध्ये उड्डाण करण्याचे ठरले. पण स्पेसक्राफ्टच्या 13 प्रोप्लशन वॉल्वमध्ये तांत्रिक बिघाड समोर आला. बोईंगने संपूर्ण अंतराळयानच पुन्हा तयार केले.

मे 2022 मध्ये उड्डाणाची चाचणी झाली. 19 मे 2022 मध्ये स्टारलायनरने पुन्हा उड्डाण घेतले. यावेळी त्यामध्ये दोन डमी अंतराळवीर बसवण्यात आले. पण अंतराळ कक्षेत मोठी तांत्रिक अडचण आली. कंट्रोल सिस्टम थ्रस्टर्स पूर्णपणे कोलमडले. पण कसेतरी 22 मे 2022 रोजी स्टारलायनर अंतराळ स्थानकाशी जोडण्यात यश आले. त्याच दिवशी स्टारलायनर स्पेस स्टेशनवरून पृथ्वीवर परत आले. पृथ्वीवर परताना सुद्धा स्पेसक्राफ्टकडून नॅव्हिगेशन सिस्टिम खराब झाली. संवाद प्रक्रिया तुटली. सोबतच जीपीएस सॅटेलाईटशी कनेक्शन तुटले. गडबडीची मालिका सुरू असली तरी बोईंगने ही सामान्य कुरबुर असल्याचा दावा केला.

सुनीता विलियम्स यांच्या उड्डाणाचा थरार

बोईंगने मानवासह उड्डाण करण्याचे 2017 मध्येच ठरवले होते. पण त्यात सतत उशीर होत होता. जुलै 2023 मध्ये मानवासहित उड्डाण करण्याचे ठरवण्यात आले. 1 जून 2023 मध्ये बोईंगने सध्या उड्डाण होणार नसल्याचे जाहीर केले. 7 ऑगस्ट 2023 रोजी कंपनीने स्पेसक्राफ्टमधील तांत्रिक अडचणी दूर झाल्याचा दावा केला. त्यानंतर 6 मे 2024 रोजी उड्डाण करण्याचे निश्चित करण्यात आले.

बोईंगने पुन्हा हात झटकले. एटलस रॉकेटच्या ऑक्सिजन वॉल्वमध्ये काही अडचणी दिसून आल्या. त्यानंतर स्पेसक्राफ्टमध्ये हेलियम लीक झाल्याचे उघड झाले. या अडचणीमुळे सतत लाँचिंग टळली. अखेर 5 जून रोजी सुनीता विलियम्स आणि बॅरी बूच विलमोर यांना घेऊन अंतराळात उड्डाण केले. 8 दिवसानंतर 13 जून रोजी दोघांना परत आणण्यात येणार होते. पण स्टारलायनरमध्ये सततच्या गडबडींमुळे बोईंगला थोबाड झोडून घेण्याची वेळ आली. या कंपनीला स्वत:च्या तांत्रिक चुका दूर करण्यात यश आले नाही. त्यामुळे एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्सला आपसूकच संधी मिळाली. त्याचे या कंपनीने सोने केले. कोणत्याही अडचणीशिवाय स्पेसएक्सचे स्पेसक्राफ्ट अंतराळात झेपावले. त्याने डॉकिंग केले आणि दोन अंतराळवीरासह ते सुखरूप पृथ्वीवर परतले सुद्धा, हे या कंपनीने अगदी लिलाया पूर्ण केले.

रशियाचे Soyuz तीन तासात पृथ्वीवर

रशियाचे सोयूज हे अंतराळ यान पृथ्वीवर अवघ्या 3 ते 3.5 तासात परत येते. पण सुनीता विलियम्ससह इतर अंतराळवीराना परत आणण्यास स्पेसएक्सला जवळपास 17 तास लागले. त्यामागे एक मोठे कारण आहे. बोईंगची तांत्रिक मालिका दूरच होत नसल्याने अखेर स्पेसएक्स कंपनीला संधी देण्यात आली. कंपनीने सर्व अंतराळवीरांना एका निश्चित वेळेत परत आणण्याचे शिवधनुष्य पेलून दाखवले. त्यासाठी त्यांना 17 तास लागले.

अंतराळयानाचे चालकदल आणि अंतराळवीर यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणि यान अचूक वेळेत उतरण्यासाठी हा वेळ लागला. अंतराळ स्थानक हे जवळपास 420 किमी उंचीवरून 28 हजार प्रति तासाने पृथ्वीला प्रदक्षिणा घालते. परतीच्या प्रवासात लँडिंग झोनसह अचूक वेळेची गरज आहे. म्हणजे स्पेसएक्स ड्रॅगन कॅप्सूल अनडॉक केल्यानंतर लागलीच पृथ्वीवर उतरण्याची प्रक्रिया सुरू होत नाही. पृथ्वीवर सुरक्षितपणे उतरण्यासाठी अंतराळ यानाला डीऑर्बिट बर्न करावे लागते. परतीचा प्रवास करताना कॅप्सूल वातावरणातील घर्षणाचा सामना करावा लागतो. ही सगळी कसरत करून अंतराळ यानाची गती कमी करण्यासाठी पॅराशूट लावण्यात आले. ड्रॅगन कॅप्सूल हे समुद्रात उतरवण्यात येते. तर सोयुज हे थेट जमिनीवर उतरवता येते.

Boeing कंपनीची डोकेदुखी वाढली

खर्चाचे गणित आणि वेळेची मर्यादा यामध्ये Boeing कंपनी चांगलीच फसली. कंपनीला 2014 मध्ये नासाला $4.2 अब्ज खर्चासाठी देण्यात आले होते. पण या खर्चासह बोईंग कंपनीला $1.6 अब्जचा खर्च खिशातून करावा लागला. 2023 मधील दुसर्‍या तिमाहीत कंपनीचे $250 दशलक्ष पेक्षा अधिक रक्कम खर्च झाली. त्याचवेळी कंपनीच्या विमानांच्या अपघातांची मालिका सुरू झाली. दोन अपघातात 346 प्रवाशांचा मृत्यू ओढावला. इतरही प्रकल्पांना झटका बसला. दरम्यान गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात बोईंगला अंडरवेट रेटिंग मिळाले. त्यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये 7.3% घसरण झाली. त्यातच स्पेसक्राफ्टमध्ये अडचण वाढतच असल्याने बोईंगची अंतराळ मोहिम ढेपाळली. त्याचा फायदा स्पेसएक्सने घेतला.

स्टारलायनरच्या थ्रस्टरच्या अडचणी, समस्यांचे निराकरण करण्यासाठी किती खर्च येईल हे सांगता येत नाही. काहींच्या मते पूर्वी अडचणी सोडवण्यासाठी जसे तीन वर्षे लागले. तसेच आता पुन्हा तितकीच वर्षे खर्ची पडू शकतात. त्यामुळे पुढील अंतराळ मोहिमेसाठी स्टारलायनरचा विचार होणे अशक्य आहे. तर दुसरीकडे स्पेसएक्सने 2020 पासून आतापर्यंत 13 यशस्वी मानवी उड्डाणे पूर्ण केली आहेत. त्यात 9 ही नासासाठी तर 4 उड्डाणे ही खासगी ग्राहकांसाठी आहेत. त्यामुळे आता NASA समोर स्टारलायनरपेक्षा स्पेसएक्स हा चांगला पर्याय आहे. चॅलेंजर आणि कोलंबिया या अपघातानंतर नासा सुरक्षेबाबत अधिक सजग झाले आहेत. त्यामुळे अंतराळवीराच्या परतीच्या प्रवासासाठी 9 महिने वाट पाहावी लागली. स्टारलायनर अंतराळवीरांना परत आणण्यात अपयशी ठरल्याचे समोर येताच, नासाने ही मोहिम स्पेसएक्सच्या हातात सोपवली.

अंतराळवीरांवरून अमेरिकेत राजकारण

बोईंगच्या स्टारलायनरच्या तांत्रिक अडचणींमुळे अंतराळ स्थानकात सुनीता विलियम्स आणि तिचा सहकारी बूच यांचा मुक्काम सतत वाढत होता. त्याच्या सातत्याने बातम्या येऊ लागल्याने अमेरिकन प्रशासनावर सुद्धा साहजिकच ताण आला. त्यातच अमेरिकेत सत्तापालट आले. बायडेन जाऊन ट्रम्प आले. ट्रम्प यांचा शपथविधी उरकताच त्यांनी मोठी घोषणा केली.

28 जानेवारी 2025 रोजी अध्यक्ष ट्रम्प यांनी बूच आणि सुनीता यांना पृथ्वीवर परत आणा, असे एलॉन मस्क यांना जाहीरपणे सांगितले. पदग्रहणाच्या आठव्या दिवशीच ट्रम्प यांनी ही घोषणा केली. मस्क यांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून दोन्ही अंतराळवीरांना परत आणण्यास आपण सांगितल्याचे ट्रम्प म्हणाले. मस्क याने पण राष्ट्राध्यक्षांच्या आवाहनाला तात्काळ प्रतिसाद दिला. इतके दिवस अंतराळवीरांना अंतराळात ताटकाळत ठेवण्यावरून मस्क याने बायडेन सरकारवर टीका केली.

पण सुनीता विलियम्स आणि बूच यांना आणण्यासाठी स्पेसएक्सला पाच महिन्यांपूर्वीच सांगण्यात आले. त्यासाठीचे नियोजन आणि योजना आखण्यात आल्याची गोटातील माहिती समोर आली. ट्रम्प आणि मस्क यांनी ही गोष्ट का लपवून ठेवली याची चर्चा अमेरिकेत रंगली.

108 वर्षे जुन्या बोईंगची नाचक्की

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) सुनीता विलियम्स आणि बॅरी बूच विलमोर यांना पृथ्वीवर परतण्यासाठी सतत वेळ लागत असल्याने अखेर बोईंगला झटका देण्यात आला. आठ दिवसांचा थांबा नऊ महिन्यांवर पोहचला. त्याचा बोईंग स्टारलायनर कॅप्सूलमध्ये सतत तांत्रिक बिघाड होत होता. त्यामुळे बॅकअप योजनेसाठी एलॉन मस्क याच्या नवख्या स्पेसएक्स कंपनीला संधी मिळाली.

स्टारलायनर अंतराळ स्थानकावर डॉक झाले. तेव्हा थ्रस्टरमध्ये बिघाड आला. हेलियमची गळती होत होती. त्यामुळे स्टारलायनर ऐवजी स्पेसएक्सच्या ड्रॅगन कॅप्सूलला या अंतराळवीरांच्या सुटकेची संधी देण्यात आली. त्याचे मस्क यांच्या कंपनीने सोने केले. मस्क यांच्या नवोदित कंपनीने 108 वर्षे जुन्या बोईंगला पाणी पाजले. बोईंगला या क्षेत्रात उतरती कळा लागल्याचा दावा करण्यात येत आहे. बोईंग ही तांत्रिक, सुरक्षा आणि अभियांत्रिकी समस्यांमध्येच अडकून पडली. त्यातून या कंपनीला नवीन विचार सुचला नाही की नवीन काही गोष्ट करण्याची कल्पना सुचली नाही. नेमकी हीच बाब हेरून स्पेसएक्सने स्वतःचा शिक्का खणखणीतपणे वाजवला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.