सुनीता विल्यम्स अंतराळात तब्बल 9 महिने कशा राहिल्या? झिरो ग्रॅव्हिटीमध्ये राहणं, खाणं, झोपणं कसं होतं?
BBC Marathi March 19, 2025 02:45 PM
Getty Images

नऊ महिन्यांनंतर भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परत आल्या आहेत. इतका मोठा कालावधी अंतराळात राहणं त्यांच्यासाठी आव्हानात्मक होतं.

इतके महिने शून्य गुरुत्वाकर्षणात (झिरो ग्रॅव्हिटी) राहणे, मर्यादित संसाधनांमध्ये काम करणं आणि पृथ्वीपासून शेकडो किलोमीटर दूर रोजच्या गरजा पूर्ण करणं, ही मोठी आव्हानं आहेत.

संपूर्ण बातमी :

अशा परिस्थितीत पृथ्वीपासून 400 किलोमीटर्सहून वर अंतराळात राहताना कसं वाटतं? तिथे ते खातात-झोपतात कसे? व्यायाम कसे करतात? कपडे धुतात का? आणि अंतराळस्थानकात वास असतो का कसला?

या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी बीबीसीच्या प्रतिनिधी जॉर्जिया रानार्ड यांनी काही महिन्यांपूर्वी तीन माजी अंतराळवीरांशी संवाद साधला.

या माजी अंतराळवीरांनी सांगितलेल्या माहिती आणि अनुभवांवरून सुनीता विल्यम्स यांनी 9 महिन्यांचा काळ अंतराळात कसा घालवला असेल, याचा अंदाज लावता येतो.

अंतराळ स्थानकातलं आयुष्य कसं असतं?

अंतराळात असताना हे अंतराळवीर काय काय करणार हे पृथ्वीवरच्या त्यांच्या मिशन कंट्रोलने ठरवलेलं असतं.

ते रोज लवकरच साधारण सकाळी 6.30 (GMT) वाजता उठतात. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये ज्या मॉड्यूलमध्ये त्यांच्या फोन बूथच्या आकाराच्या झोपण्याच्या जागा आहेत त्या मॉड्यूलचं नाव आहे - हार्मनी.

2009 आणि 2011 मध्ये नासाच्या दोन मोहिमांसाठी अंतराळात एकूण 104 दिवस राहून आलेल्या अमेरिकन अंतराळवीर निकोल स्टॉट सांगतात, "तिथे असणाऱ्या स्लीपिंग बॅग्स जगातल्या सर्वोत्तम आहेत."

झोपण्यासाठीच्या या लहानशा जागांमध्ये लॅपटॉप्स आहेत, ज्यांद्वारे हे अंतराळवीर घरच्यांच्या संपर्कात राहू शकतात. शिवाय, पुस्तकं, फोटोंसारख्या वैयक्तिक गोष्टी ठेवण्यासाठीही जागा आहे.

इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमधल्या बाथरूम्स या सक्शन सिस्टीम (Suction System) वर काम करतात. एरवी या स्थानकात घाम आणि मूत्र यांवर प्रक्रिया करून (Recycle) त्याचं पिण्याच्या पाण्यात रूपांतर केलं जातं. पण जर यंत्रणेत बिघाड झाला तर मात्र मूत्र वेगळ्याने साठवून ठेवलं जातं.

BBC

सकाळची आन्हिकं उरकून मग अंतराळवीर कामाला लागतात. अंतराळस्थानकात त्यांचा सर्वाधिक वेळ विविध प्रयोग करण्यात किंवा डागडुजीच्या कामात जातो. हे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आहे बकिंगहॅम पॅलेसच्या आकाराचं किंवा 3 फुटबॉल मैदानांएवढं.

"आतून हे अंतराळ स्थानक हे अनेक बसेस एकमेकांना जोडल्यासारखं आहे. कधीकधी अर्धा दिवस उलटला तरी तुम्हाला दुसरा माणूस दिसत नाही. लोक काही इथून तिथे सारखे उडत जात नसतात. अगदी शांत आणि मोठी जागा आहे ती," असं कॅनेडियन अंतराळवीर क्रिस हॅडफील्ड सांगतात.

2012-13मधल्या एक्सपिडीशन 35चे कमांडर होते.

BBC

वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये 6 लॅब म्हणजे प्रयोगशाळा आहेत. या अनोख्या वातावरणात राहताना शरीरावर होणारा परिणाम मोजण्यासाठी हे अंतराळवीर हेल्मेट, मेंदू किंवा ब्लड मॉनिटर वापरतात.

निकोल स्टॉट म्हणतात, "आम्ही इथे गिनीपिग असतो. अंतराळात तुमच्या हाडांची आणि स्नायूंची झीज वेगाने होते. आणि संशोधकांना त्याबद्दलचा अभ्यास करता येतो."

शक्य असेल तेव्हा हे अंतराळवीर पृथ्वीवरच्या मिशन कंट्रोलने दिलेल्या कालावधीपेक्षा कमी वेळात काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात.

क्रिस हॅडफील्ड म्हणतात, "5 मिनिटांचा मोकळा अवधी मिळवण्याची स्पर्धा असते. मी खिडकीजवळ जाऊन शेजारून जाणारं काही पाहत असे. किंवा गाणी लिहीणं, फोटो काढणं किंवा माझ्या मुलांसाठी काही लिहीत असे."

BBC स्पेसवॉक आणि अंतराळस्थानकातला वास

काही मोजक्याच जणांना स्पेसवॉकची संधी मिळते. यामध्ये इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमधून बाहेर पडत बाहेरच्या अंतराळ पोकळीमध्ये जाता येतं. हॅडफील्ड यांनी दोन स्पेसवॉक केले.

"ते 15 तास माझ्यात आणि या विश्वामध्ये माझ्या हेल्मेटचं समोरचं प्लास्टिकचं तावदान सोडल्यास काहीच नव्हतं. ते 15 तास माझ्यासाठी अतिशय रोचक आणि भन्नाट होते."

पण याच स्पेसवॉकमुळे स्पेस स्टेशनमध्ये एक वेगळी गोष्टही येते. याला 'स्पेस स्मेल' म्हणजे अंतराळातला वास म्हटलं जातं.

BBC

"पृथ्वीवर आपल्याला वेगवेगळे वास आणि गंध येतात. म्हणजे धुतलेल्या कपड्यांना येणारा सुगंध किंवा मोकळ्या हवेचा गंध. पण अंतराळात एकच वास असतो ज्याची आम्हाला पटकन सवय होते. स्थानकाबाहेर अंतराळ पोकळीत जाणारे स्पेससूट, सायंटिफिक किट यांच्यावर अंतराळातल्या तीव्र किरणोत्सर्गाचा परिणाम होतो. रेडिएशनमुळे त्यांच्या पृष्ठभागावर Free Radicals म्हणजे अस्थिर रेणू तयार होतात. अंतराळ स्थानकातल्या ऑक्सिजनच्या संपर्कात हे अस्थिर रेणू आल्यानंतर त्यामुळे एक मेटॅलिक वास निर्माण होतो," असं पहिल्या ब्रिटीश अंतराळवीर हेलन शर्मन सांगतात. 1991 साली त्यांनी मीर या सोव्हिएत अंतराळस्थानकात 8 दिवस घालवले होते.

पृथ्वीवर परतल्यानंतर आपल्याला या पंचेद्रियांचं महत्त्वं अधिक वाटू लागल्याचं त्या सांगतात. "अंतराळात ऋतू किंवा हवामान नाही. तुमच्या चेहऱ्यावर पावसाचे थेंब पडत नाहीत की केसांना वारा लागत नाही. आता 33 वर्षांनंतरही मला यासगळ्याचं अधिक अप्रूप वाटतं," त्या सांगतात.

स्पेस स्टेशनमधला व्यायाम

बाकी कामं सुरू असतानाच या इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये दीर्घकालीन वास्तव्यासाठी आलेले अंतराळवीर रोज किमान दोन तास व्यायाम करतात. शून्य गुरुत्वाकर्षणात राहण्याचे हाडं ठिसूळ होण्यासारखे शरीरावर होणारे परिणाम कमी करण्यासाठी 3 वेगवेगळ्या मशीन्सची मदत घेतली जाते.

द अॅडव्हान्स रेझिस्टीव्ह एक्सरसाईझ डिव्हाईस (ARED) हे बैठका, वजन उचलणं आणि स्नायूंच्या इतर व्यायामांसाठी वापरलं जातं.

अंतराळात ट्रेडमिलचाही वापर होतो. पण ती वापरणारी व्यक्ती उडून जाऊ नये म्हणून त्यांना या ट्रेडमिलला असणाऱ्या बेल्टनी बांधून घ्यावं लागतं. याशिवाय व्यायामासाठीची सायकलही वापरली जाते.

अंतराळात कपडे धुतात?

या सगळ्या कामांमुळे अंतराळवीरांना घाम येतोच. मग कपडे धुण्याचं काय?

निकोल स्टॉट सांगतात, "आमच्याकडे लाँड्री नाही. फक्त तरंगून मोठा थेंब होणारं पाणी आणि साबण. गुरुत्वाकर्षण नसल्याने घाम शरीरापासून वेगळा होत नाही. त्यामुळे अंतराळवीरांच्या शरीरावर घामाचा थर तयार होतो. पृथ्वीपेक्षा कितीतरी जास्त. मला माझ्या डोक्यावर वाढणारा घामही कळायचा. तो मग मी टिपून घेत असे. कारण डोकं हलवलं तर घाम इतरत्र उडेल."

हे कपडे इतके मळतात की ते अंतराळात जळून जाणाऱ्या कार्गो वाहनात टाकून दिले जातात.

पण रोजचे कपडे मात्र स्वच्छ राहत असल्याचं अंतराळवीर सांगतात.

निकोल स्टॉट म्हणतात, "गुरुत्वाकर्षण नसल्याने कपडे शरीरावर तरंगत राहतात. त्यामुळे शरीराचं तेल किंवा इतर गोष्टी त्यांना लागत नाहीत. मी एकच पँट तीन महिने वापरली होती. खरंतर सगळ्यात मोठा धोका अन्नापासून असतो. म्हणजे कोणी मीट आणि ग्रेव्ही असणारा रस्सा उघडला की सगळे मागे सरकतात. अगदी मेट्रिक्स सिनेमासारखे. कारण त्यातल्या तेलाचे लहान गोळे तरंगायला लागतात."

पृथ्वीवरून येणारं दुसरं यान येताना या क्रूसाठी नवीन अन्न, कपडे आणि इक्विपमेंट्स यांचा पुरवठा घेऊन येतं. नासा दरवर्षी अशी काही 'Supple Vehicles' इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला पाठवतं.

इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमधला अनुभव

पृथ्वीवरून इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला दाखल होण्याचा अनुभवही भन्नाट असल्याचं क्रिस हॅडफील्ड सांगतात.

ते म्हणतात, "त्या अथांग विश्वामध्ये तुम्हाला ते अंतराळस्थानक पहिल्यांदा दिसतं, त्या काळ्या पोकळीमध्ये असणारा हा मानवी आयुष्याचा बुडबडा दिसतो तो क्षण आयुष्य बदलणारा असतो."

दिवसभराचं काम संपल्यावर पाळी येते रात्रीच्या जेवणाची. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमधलं अन्न हे पॅकेट्समध्ये असतं. देशांनुसार ते वेगवेगळ्या कम्पार्टमेंट्समध्ये वेगवेगळं ठेवलेलं असतं.

निकोल स्टॉट सांगतात, "हे अन्न कॅम्पिंग फूड किंवा सैन्यांना देण्यात येणाऱ्या अन्नासारखं असतं. चांगलं असतं पण ते अजून पौष्टिक होऊ शकतं. मला जापनीज करीज किंवा रशियन सिरीयल आणि सूप्स खूप आवडत. शिवाय कुटुंबही फूड पॅक्स पाठवतं. माझ्या नवऱ्याने आणि मुलाने लहान लहान गोड पदार्थ पाठवले होते."

बहुतेकदा अंतराळ स्थानकातील क्रू एकमेकांसोबत जेवण वाटून घेतात.

BBC

अंतराळ स्थानकात राहणाऱ्या या लोकांच्या वृत्ती वेगवेगळ्या असल्या तरी त्यांना टीमम्हणून एकत्र काम करण्याचं प्रशिक्षण देण्यात आलेलं असतं. यामुळे वादाचे प्रसंग कमी येतात.

अंतराळ पोकळीमध्ये कोणताही आवाज नसला तरी अंतराळ स्थानकात मात्र सतत आवाज असतो. कारण कार्बन डायऑक्साईड एकाच ठिकाणी साचून राहू नये, लोकांना श्वास घेता यावा म्हणून इथे सतत पंखे सुरू असतात आणि त्यांचा आवाज मोठा असतो.

दिवसभराच्या या गडबडीनंतर येते अंतराळवीरांची झोपायची वेळ.

X\Commercial_Crew अंतराळ स्थानकात सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर

निकोल स्टॉट सांगतात, "आम्ही खरंतर 8 तास झोपू शकतो. पण बहुतेकजण खिडकीतून पृथ्वीकडे बघत राहतात."

अंतराळ कक्षेमध्ये 400 किलोमीटर्सवरून पृथ्वी पाहण्याचा मनावर काय परिणाम होतो, याबद्दल तीनही अंतराळवीर सांगतात.

शर्मन म्हणतात, "त्या अथांग अंतराळात आपण किती क्षुल्लक आहोत, असं मला वाटायचं. स्पष्ट दिसणारी पृथ्वी, त्यावर गुरफटलेले ढग आणि समुद्र पाहून मला वाटायचं की यावर आपण काय सीमा आखून ठेवल्यायत आणि प्रत्यक्षात आपण एकमेकांशी किती पूर्णपणे जोडलेले आहोत!"

6 वेगवेगळ्या देशांच्या लोकांसोबत काम करणं आपल्याला आवडल्याचं निकोल स्टॉट सांगतात. त्या म्हणतात, "आम्ही हे पृथ्वीवरच्या सगळ्यांच्या वतीने करत असतो. एकत्र काम करतो आणि प्रश्न कसे सोडवायचे ते पाहतो. हेच मग आपण राहतो त्या पृथ्वीवर का घडू शकत नाही?"

कधी ना कधी या अंतराळ स्थानकातून परतण्याचा दिवस उजाडतोच, पण संधी मिळाली तर एक क्षणही न दवडता आपण परत जायला तयार असल्याचं तिघे अंतराळवीर सांगतात. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये 'अडकल्याचं' लोकांना का वाटतं, हे आपल्याला कळत नसल्याचं ते सांगतात.

क्रिस हॅडफील्ड सांगतात, "अंतराळात दीर्घकाळ राहण्याचं आमचं स्वप्न होतं, त्यासाठी आम्ही काम केलं, प्रशिक्षण घेतलं. एखाद्या अंतराळवीराला मिळू शकणारं सगळ्यात मोठं गिफ्ट म्हणजे त्यांना तिथे दीर्घकाळ राहता येणं."

(ग्राफिक्स : कॅथरीन गेयनॉर, कमिला कॉस्टा)

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचं प्रकाशन.)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.