Gold Price Today: 5 दिवसांत 2,500 रुपयांनी महागलं सोनं; काय आहे 10 ग्रॅमचा भाव?
esakal March 19, 2025 03:45 PM

Gold and silver price on March 19: गेल्या पाच दिवसांपासून सोन्याच्या भावात सातत्याने वाढ होत आहे. सोन्याचा भाव 89 हजार रुपये प्रति दहा ग्रॅमच्या जवळपास पोहोचला आहे. दुसरीकडे, दिल्लीत सोन्याच्या भावाने पहिल्यांदाच 91 हजार रुपयांची पातळी ओलांडली आहे.

विशेष बाब म्हणजे सोन्याच्या भावात 5 दिवसांत 2,500 रुपयांनी वाढ झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, येत्या काही दिवसांत सोन्याच्या भावात आणखी वाढ होऊ शकते. याचे कारण भू-राजकीय तणाव आणि मध्यवर्ती बँकांकडून होणारी मागणी आहे.

बुधवारी यूएस सेंट्रल बँक फेड व्याजदरात कपात करण्याची शक्यता खूपच कमी आहे. 90 टक्क्यांहून अधिक लोकांचा अंदाज आहे की व्याजदरात कोणतीही कपात होणार नाही. त्यामुळे सोन्याच्या भाव आणखी वाढू शकतो. दुसरीकडे, रशिया युक्रेन युद्धबंदीच्या वृत्तानंतर सोन्याच्या किमतीतील वाढीला आळा बसेल असा अंदाज वर्तवला जात आहे.

देशाची राजधानी दिल्लीत सोन्याच्या भावात वाढ दिसून आली. सराफ बाजाराच्या आकडेवारीनुसार, सोन्याचा भाव 500 रुपयांनी वाढला आणि 91,250 रुपये प्रति 10 ग्रॅम या नवीन विक्रमी पातळीवर पोहोचला.

सोमवारी, 99.9 टक्के शुद्धता असलेल्या या मौल्यवान धातूची किंमत 1,300 रुपयांनी वाढली आणि 90,750 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या नवीन शिखरावर पोहोचली होती. तर चांदीचा भाव 1,02,500 रुपये प्रति किलोवर स्थिर राहिला आहे आणि हा चांदीचा ऐतिहासिक उच्चांक आहे.

5 दिवसात 2,500 रुपयांची वाढ

सलग 5 दिवस सराफ बाजारात तेजी पाहायला मिळत आहे. या काळात सोन्याच्या भावात 2,500 रुपयांची वाढ झाली आहे. 11 मार्च रोजी सोन्याच्या भावात 40 रुपयांची वाढ झाली होती, तर दुसऱ्या दिवशी 12 मार्चला सोन्याच्या भावात 60 रुपयांची वाढ झाली होती.

होळीच्या एक दिवस आधी म्हणजे 13 मार्च रोजी सोन्याच्या भावात 600 रुपयांची वाढ झाली होती. होळीनंतरच्या वीकेंडमुळे सराफ बाजार सलग तीन दिवस बंद होता. त्यानंतर सोमवारी 1300 रुपये आणि मंगळवारी 500 रुपये वाढ झाली आहे.

सोन्याचे भाव का वाढत आहेत?

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक सौमिल गांधी यांच्या मते, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची धोरणे, अमेरिकेतील मंदीची भीती आणि भू-राजकीय अनिश्चिततेमुळे सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोने हा आकर्षक पर्याय राहिला आहे. याशिवाय, यूएस फेडरल रिझर्व्ह या वर्षी अनेक वेळा व्याजदरात कपात करेल, ज्यामुळे सोन्याला आणखी आधार मिळेल.

LKP सिक्युरिटीजचे जतिन त्रिवेदी म्हणाले की, पश्चिम आशियातील अस्थिरता, चीनच्या अतिरिक्त आर्थिक प्रोत्साहन योजनांमुळे सोन्याच्या सुरक्षिततेची मागणी वाढत आहे. अबन्स फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) चिंतन मेहता यांनी सांगितले की, अमेरिकन अर्थव्यवस्थेतील मंदीच्या वाढत्या भीतीमुळे सोन्याच्या किमती विक्रमी उच्चांकावर पोहोचल्या आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.