नागपूर हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाईंड फहीम खानला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. नागपूर पोलीस दंगली प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. मास्टरमाईंड फहीम खानचा काही गुन्हेगारी रेकॉर्ड आहे का? आंदोलनात नेमकं कुणाचा सहभाग होता? यासगळ्या प्रश्नांची उत्तरे पोलीस तपासातून समोर येणार आहेत.
दंगलीचा सुत्रधार फहीम खानला अटक केल्यानंतर पोलीस आयुक्तांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी दंगली प्रकरणी करण्यात आलेल्या पोलीस कारवाईची माहिती दिली आहे.
पोलीस आयुक्त पत्रकार परिषदेत म्हणाले, 'नागपुरात झालेल्या दंगली प्रकरणी एकाचे नाव पुढे येत आहे. फहीम शमीम खानचा या दंगली प्रकरणात हात होता का? त्यानं हा प्लान आधीच आखला होता का? त्याचे राज्यस्तरीय किंवा स्थानिक संबंध आहेत का? याचा तपास सुरू आहे'.
कारवाई सुरू
'नागपूरात सोमवारी रात्री झालेल्या दंगलप्रकरणी आतापर्यंत सहा एफआयआर रजिस्टर झाल्या आहेत. सर्व प्रकरणात कारवाई सुरू आहे. ज्या लोकांची नावे या प्रकरणातून समोर आल्या आहेत. त्यांना शोधण्याचे काम सुरू आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आणि फोटोच्या आधारे देखील चौकशी केली जात आहे', असं पोलीस आयुक्त म्हणालेत.
महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग
महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या विनयभंगाप्रकरणी पोलीस आयुक्त म्हणाले, 'नागपूर हिंसाचारप्रकरणी दंगलखोरांनी दगडफेक केली होती. दगडफेकीच्या दरम्यान, एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग करण्यात आल्याची तक्रार पुढे आली आहे. या संदर्भात कारवाई सुरू असून लवकरच माहिती दिली जाईल', असं म्हणालेत.
दंगल घडवण्यामागे षडयंत्र
'प्राथमिक तपासात दंगल घडवण्यामागे षडयंत्र दिसून येत आहे. या प्रकरणात कुणीतरी लोकांची माथी भडकवण्याचा प्रयत्न करत आहे, असा संशय आहे. सोशल मीडियावरून लोकांना भडकवण्यात आले होते का? याचाही तपास सुरू' असल्याचं सिंघल म्हणालेत.
संचारबंदी कधीपर्यंत लागू राहील?
'आतापर्यंत एफआयआरमधून पुढे आलेली नावे नागपूरची आहेत. मात्र, फक्त नागपूर नसून, इतर लोकांचाही यात समावेश आहे का? याचा तपास सुरू आहे. तसेच संचारबंदी कधीपर्यंत लागू राहील हे सांगणं आत्ताच कठीण आहे. मात्र परिस्थिती सामान्य झाल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल, असंही सिंघल म्हणालेत.