Yuzvendra Chahal Dhanashree Verma: ६० कोटी नाही; धनश्री वर्माला युजवेंद्र चहलकडून मिळणार 'इतक्या' कोटींची पोटगी
Saam TV March 19, 2025 10:45 PM

Yuzvendra Chahal Dhanashree Verma Divorce: क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाचा निर्णय उद्या (२० मार्च) घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी मुंबई कुटुंब न्यायालयाला दिले. धनश्रीच्या वतीने उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती, यामध्ये तिने सहा महिन्यांचा कूलिंग ऑफ कालावधी माफ करण्याची मागणी केली होती. तसेच, घटस्फोटासाठी चहलला त्याची पत्नी धनश्री वर्मा यांना पोटगी म्हणून ४.७५ कोटी रुपये द्यावे लागतील, असे समोर आले आहे. यापैकी चहलने धनश्रीला २.३७ कोटी रुपयेही दिले आहेत. उर्वरित रक्कम घटस्फोटानंतर द्यावी लागेल. पण मधल्या काळात चहलने धनश्रीला ६० कोटी रुपयांची पोटगी दिल्याची अफवा पसरली होती.

धनश्री आणि बऱ्याच काळापासून एकमेकांसोबत राहत नाहीत आणि घटस्फोटाचा खटला कौटुंबिक न्यायालयात सुरू आहे. बार अँड बेंचच्या म्हणण्यानुसार, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश माधव जामदार यांनी आदेश दिला की चहलचा इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये खेळणे लक्षात घेऊन कुटुंब न्यायालयाला उद्यापर्यंत घटस्फोटाच्या याचिकेवर निर्णय घ्यावा लागेल. हिंदू विवाह कायद्याच्या कलम १३ ब अंतर्गत घटस्फोटासाठी सहा महिन्यांचा कूलिंग ऑफ कालावधी प्रदान केला आहे. घटस्फोटाचा निर्णय लवकरात लवकर घेता यावा म्हणून धनश्री वर्मा यांनी उच्च न्यायालयात हा कालावधी माफ करण्याची याचिका दाखल केली होती. धनश्री आणि चहल गेल्या अडीच वर्षांपासून वेगळे राहत आहेत आणि हे लक्षात घेऊन उच्च न्यायालयाने हा आदेश दिला.

२०१७ साली एका खटल्यादरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले होते की जर पती-पत्नीमधील वाद सोडवण्यास वाव नसेल तर सहा महिन्यांचा कालावधी देखील माफ केला जाऊ शकतो. चहल हा टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू आणि लेग स्पिनर आहे, तर धनश्री ही एक प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे.

दोघांनी डिसेंबर २०२० साली लग्न केले, पण जून २०२२ नंतर ते वेगळे राहू लागले. यानंतर घटस्फोटासाठी हे प्रकरण मुंबई कुटुंब न्यायालयात गेले. अलीकडेच, चहल आणि देखील सुनावणीसाठी न्यायालयात पोहोचले. दोघांनीही सहा महिन्यांच्या कूलिंग पिरियडमधून सूट मिळावी म्हणून कुटुंब न्यायालयाकडे विनंती केली होती, परंतु २० फेब्रुवारी रोजी न्यायालयाने ती फेटाळून लावली, त्यामुळे चहल आणि धनश्रीला धक्का बसला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.