उरण, ता. १९ (वार्ताहर) आपले आरोग्य उत्तम राखण्याच्या दृष्टिकोनातून मौखिक आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन जागतिक मौखिकदिनानिमित्त उरण आरोग्य विभागाचे ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी डॉ. बाबोसो कालेल यांनी केले. मौखिक आरोग्य म्हणजे दात, हिरड्या, सभोवतालचे परिवेष्टन, जीभ, लाळ तयार करणाऱ्या ग्रंथी, घसा इत्यादी संदर्भातील आरोग्य होय. वरील भागांची व्यवस्थित काळजी घेतली, तर त्यांचे आरोग्य उत्तम राखले जाऊन सर्वसाधारण आरोग्याचेही रक्षण होते. मौखिक आरोग्याचे महत्त्वाचे घटक म्हणजे दात आणि हिरड्यांचे आरोग्य. सर्वसाधारणपणे ६० ते ९० टक्के शाळकरी मुलांमध्ये दात किडण्याचे प्रमाण आढळून येते. खाण्याच्या अनियमित सवयी, गोड व चिकट पदार्थांचे अधिक सेवन, मौखिक आरोग्याकडे दुर्लक्ष त्यामुळे सर्वसाधारण जनतेमध्ये दात किडण्याचे प्रमाण अधिक आढळून येते. वेळीच उपचार करून ही कीड थांबवली नाही, तर पुढे डेन्टीन आणि पल्पपर्यंत जाऊन दात प्रचंड दुखू लागतो. त्यामुळे प्रत्येकाने मौखिक आरोग्य जपले पाहिजे, असे डॉ. कालेल यांनी सांगितले.