नागपूर हिंसाचारामधील मास्टरमाईंडचा फोटो अखेर समोर आला आहे. गणेशपेठ पोलीस ठाण्यात दंगलखोरांविरुद्ध दाखल झालेल्या एफआयआरमधून घटनेच्या सुत्रधाराची माहिती समोर आली आहे. फहीम शमीम खान असे आरोपीचे नाव असून, त्यानेच लोकांची माथी भडकवली आणि गर्दी जमवली होती, असं पोलिसांनी म्हटलं आहे.
नागपूर उपराजधानीत दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं. औरंगजेबाच्या कबरीवरून २ गटात राडा झाला होता. त्यानंतर पोलिसांनी ५१ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. एफआयआरनुसार, फहीम शमीम खान हा हिंसाचाराचा मास्टरमाइंड असून, त्यानेच लोकांची माथी भडकवली आणि गर्दी जमवली असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३८ वर्षीय फहीम शमीम खान याने त्यावेळेस भाषण केलं होतं. त्याने केलेल्या भाषणानंतरच नागपुरात हिंसाचाराने पेट घेतला. त्याच्यावर लोकांना भाषणेद्वारे भडकवण्याचा आरोप आहे.
लोकसभा निवडणूक लढवली
शमीम हा मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी नागपूर अध्यक्ष आहे. फहीम खान याने २०२४ मध्ये नागपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. २०२४ च्या नागपूर लोकसभा मतदारसंघातून त्यानं नितीन गडकरी यांच्या विरोधात अल्पसंख्याक डेमोक्रॅटिक पक्षाकडून निवडणूक लढवली होती. मात्र, त्याचा पराभव झाला होता.
आरोपीच्या वकिलाचे म्हणणे काय..?
या प्रकरणी चे वकिल आसिफ कुरेशी म्हणतात, 'एफआयआरमध्ये एक नाव आहे. ते म्हणजे फहीम शमीम खान. हे मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचे शहर अध्यक्ष आहेत. एफआयआरमध्ये ज्या ५१ आरोपींची नावे आहेत. त्या नावांमध्ये फहीम खान याचेही नाव आहे. या प्रकरणात ज्यांचा काही संबंध नाही, अशा लोकांना अटक झाली आहे', असा आरोप वकिल आसिफ कुरेशी यांनी केला आहे.
'वेगवेगळ्या कामासाठी त्याभागात काही लोक आले होते. त्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलंय. घरातील लोकांचे सीसीटीव्ही तपासून पोलिसांनी अटक करायला हवं', असंही वकिलांनी म्हटलं आहे.
'दंगल घडवण्यासाठी लोक बाहेरून आले असावे. गुन्ह्याशी सबंध नाही अशा लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. अशिक्षीत लोकांमुळे ही घटना घडली. वकील म्हणून न्यायालयात निर्दोष लोकांसाठी लढा देणार. ज्यांनी खरंच हे कृत्य केलंय, त्यांना शिक्षा मिळायला हवी', असंही फहीम शमीम खानच्या वकिलांनी म्हटलं आहे.