मुंबई - ‘नागपूर हिंसाचाराच्या घटनेत ज्यांनी पोलिसांवर हल्ला केला, अशांना कबरीतून शोधून काढू. या आरोपींना कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही,’ असा निर्वाणीचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत दिला. नागपूर हिंसाचार प्रकरणात ज्यांनी सामाजिक स्वाथ्य बिघडविले त्यांच्यावर कारवाई होईलच. शिवाय ज्यांनी अफवा पसरविल्या त्यांनाही या घटनेत दोषी धरले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आज विधानसभेत २०२५-२६ च्या अर्थसंकल्पातील गृह विभागाच्या अनुदानाच्या मागण्या मंजूर करण्यात आल्या. तत्पूर्वी झालेल्या चर्चेत भास्कर जाधव यांनी राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असल्याचे सांगत चिंता व्यक्त केली. त्यांच्यासह इतर सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर दिले.
यावेळी फडणवीस यांनी नागपूर दंगल प्रकरणात राज्य सरकारने कठोर भूमिका घेतल्याचे सांगितले. नागपूरची घटना ही पूर्वनियोजित होती. नागपूर पोलीस आयुक्तांनी व आपण याबाबत कोणतेही वेगळे मत मांडलेले नाही. त्यांच्याकडून माहिती घेऊनच आपण सभागृहाला माहिती दिली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नागपूर हे शांत शहर आहे. नागपूरमध्ये १९९२ नंतर कधीही दंगल झालेली नाही. मात्र, परवाची घटना काहींनी जाणीवपूर्वक घडवून आणल्याचे लक्षात येते, असा पुनरुच्चार फडणवीस यांनी केला.
ते म्हणाले, ‘नागपूरमध्ये आंदोलकांनी औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर जाळली. मात्र, त्यावर कुठेही आयात लिहिलेली नव्हती. तरीही जाणीवपूर्वक आयात जाळल्याचे संदेश व्हायरल केले गेले. त्यामुळे या प्रकरणात विशिष्ट वेळेत कारवाई केली जाईल,’ असे आश्वासनही फडणवीस यांनी दिले. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेसमोर अनेक आव्हाने आहेत. या आव्हानांना सामोरे जाताना राज्याची कायदा आणि सुव्यवस्था चांगली राखली जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या उत्तरात महाराष्ट्रातील गुन्ह्यांच्या घटना, आरोपी पकडण्याचे प्रमाण, दोषसिद्धी याची तुलना देशाच्या अन्य राज्यांशी, शहरांशी केली. संपूर्णपणे गुन्ह्यांचा विचार केला तर आपले राज्य हे आठव्या क्रमांकावर आहे. असे असले तरी गुन्हेगारीत देशातील पहिल्या १० शहरांमध्ये राज्यातील एकही शहर नाही.
राज्यात मोठ्या प्रमाणात शहरीकरण होऊन विकास होत असतानाही राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती उत्तम आहे. दिल्लीत २०१३ मध्ये निर्भया कांड घडल्यानंतर विनयभंगाच्या गुन्ह्यातील अनेक कलमे आता बलात्काराच्या गुन्ह्यात लावली जातात.
याशिवाय तक्रारींचे प्रमाण वाढल्याने २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये विनयभंग आणि बलात्काराच्या गुन्ह्यात वाढ झाल्याची कबुलीही फडणवीस यांनी दिली. एकूण गुन्ह्यांच्या संख्येत २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये २,५६८ गुन्ह्यांची वाढ झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
आकडेवारीच्या दृष्टीने एकूण गुन्ह्यांची संख्या महत्त्वाची नसली तरी त्यातून बोध आवश्यक आहे, असे सांगत फडणवीस म्हणाले, ‘एकूण गुन्ह्यांच्या ९० टक्के प्रकरणांत ६० दिवसांत आरोपपत्र दाखल होत आहे.
दोषसिद्धीचे प्रमाण ९ टक्क्यांवरून आता ५० टक्क्यांपर्यंत पोचले आहे. ही टक्केवारी वाढली असली तरी समाधानकारक नाही. पुढील काळात दोषसिद्धीचे प्रमाण ७५ टक्क्यांपर्यंत नेण्यात सर्वतोपरी उपाययोजना अमलात आणल्या जातील,’ असे त्यांनी सांगितले.
पोलिसांची ३५ हजार पदे भरली
पोलिस दलात १० हजार ५०० जागा रिक्त असून गेल्या तीन वर्षात पोलिसांची विक्रमी ३५ हजार ८०२ पदे भरण्यात आली आहेत. ज्या प्रमाणात पोलिस दलातून अधिकारी-कर्मचारी निवृत्त होत आहेत, त्या प्रमाणात पोलिसांची पदे भरण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.
महासायबर लॅब सुरू
गुन्ह्याच्या प्रकरणात पुराव्यांशी छेडछाड होऊ नये, यासाठी पंचनाम्याचे चित्रीकरण केले जाणार आहे. त्यासाठी पोलिसांना टॅब दिला जाईल. सायबर गुन्हे रोखण्यासाठी नवी मुंबईत आधुनिक महासायबर लॅब सुरु करण्यात आली आहे. तीन राज्यांनी आपल्या राज्याच्या सायबर लॅबला काम दिले आहे, अशी माहितीही देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
‘औरंगजेबाच्या कबरीला विरोधच’
औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू असलेला हिंसाचार पाहता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेता हा मुद्दा सयुक्तिक नाही, असे संघाने म्हटले आहे. त्याच वेळी महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने मात्र आपली भूमिका स्पष्ट केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी भूमिका मांडली तीच शिवसेनेची भूमिका आहे.
आमचा औरंगजेबाच्या कबरीला विरोधच आहे. कोणाची काही भूमिका असली तरी आमचा पक्ष वेगळा आहे. त्यामुळे आमची भूमिकासुद्धा वेगळीच असल्याचे मत मंत्री शंभुराज देसाई यांनी व्यक्त केले. विरोधी पक्षांना औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात कशाला पाहिजे, असाही सवाल त्यांनी केला.
ते म्हणाले, ‘आरएसएस स्वतंत्र संघटना आहे. ज्या औरंगजेबाने क्रूरपणे छत्रपती संभाजी महाराजांचे हाल केले, त्यांच्या विरोधात कटकारस्थान केले त्या औरंगजेबाचा आम्ही कायम विरोध करत राहू. आमचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी भूमिका मांडली तीच पक्षाची भूमिका राहील.’
संघाच्या भूमिकेचे स्वागत - आव्हाड
नागपूर दंगलीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रवक्ते सुनील आंबेकर यांनी औरंगजेबाची कबर हा मुद्दा सयुक्तिक नसल्याचे म्हटले आहे. मी आरएसएसचा कट्टर विरोधक असलो तरी त्यांच्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो, असे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले. ते म्हणाले, ‘आरएसएसने मांडलेल्या या भूमिकेबद्दल मी त्यांचे स्वागत आणि अभिनंदन करतो.
हीच भूमिका आम्ही मांडली असती तर टीका करणाऱ्यांची रांग लागली असती आणि औरंगजेब आमचा बाप असल्याचे त्यांनी सांगितले असते. पण महाराष्ट्रावर चाल करून आलेल्या औरंगजेबाला येथेच गाडला, हे आमचे छत्रपती संभाजी महाराज आणि ताराराणींच्या शौर्याचे प्रतीक आहे,’ असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.