Pune News : सायबर पोलिसांच्या प्रयत्नांमुळे कंपनीला मिळाले ४१ लाख परत
esakal March 20, 2025 06:45 AM

पुणे - सायबर चोरट्यांनी शहरातील एका नामांकित कंपनीला ४१ लाख रुपयांना गंडा घातला. परंतु सायबर पोलिसांनी सतर्कता दाखवत ही सर्व रक्कम संबंधित कंपनीला परत मिळवून दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाईल क्रमांकावरून एका कंपनीच्या अकाउंटंटला व्हॉटसअॅप संदेश पाठविला. कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक असल्याचे भासवून ते एका महत्त्वाच्या बैठकीत असल्याचे अकाउंटंटला सांगितले. ‘हा माझा वैयक्तिक मोबाईल क्रमांक आहे. दुसऱ्या कंपनीचे पैसे तत्काळ द्यावयाचे आहेत.

कंपनीच्या बँक खात्यातून ४० लाख ९० हजार रुपये तातडीने पाठवा,’ असे सांगितले. त्याची खातरजमा न करता अकाउंटंटने ती रक्कम ऑनलाइन पाठवली. व्यवस्थापकीय संचालकांची प्रत्यक्ष भेट झाली तेव्हा त्यांनी अकाउंटंटला असा संदेश पाठविलाच नसल्याचे सांगितले. सायबर चोरट्यांनी फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

याबाबत गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे यांनी तपासाच्या सूचना दिल्या. त्यानुसार आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त विवेक मासाळ, सहाय्यक आयुक्त मच्छिंद्र खाडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्वप्नाली शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक तुषार भोसले, पोलिस अंमलदार नवनाथ कोंडे, किरण जमदाडे, अश्विनी भोसले, ज्योती दिवाणे, माधुरी कराळे, सोनाली चव्हाण यांच्या पथकाने तपास सुरू केला.

सायबर पोलिसांनी परराज्यातील संबंधित बँक खात्याबाबत पत्रव्यवहार केला. परराज्यातील बँक खाती असल्याने तेथील नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांच्या मदतीने सायबर चोरट्यांची बॅंक खाती गोठविण्यात आली. ही रक्कम कंपनीला परत मिळवून देण्यात सायबर पोलिसांना यश आले.

सायबर फसवणूक टाळण्यासाठी-

१. अनोळखी मोबाईल क्रमांकावरून तुमच्या कंपनीचे प्रमुख किंवा जवळची व्यक्ती असल्याचे भासवून पैशांची मागणी केली जाते. अशा वेळी त्या व्यक्तीशी प्रत्यक्ष संपर्क साधल्याशिवाय पैसे पाठवू नका.

२. तुमच्या जवळच्या व्यक्तीचा आवाज काढून पैशाची मागणी केल्यास, त्या व्यक्तीशी प्रत्यक्ष संपर्क साधा.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.