नागपुरात महाल परिसरात 17 मार्चला रात्री हिंसाचार झाला. जमावाने वाहनांची तोडफोड केली. काही वाहनांना आग लावली. टायर जाळले. तसेच पोलिसांवर दगडफेक केली. यामध्ये तीन पोलीस उपायुक्तांसह 33 पोलीस कर्मचारी जखमी झाले.
पण, नागपुरात खरंच दंगल होईल असं वातावरण आहे का? नागपुरातला सामाजिक सलोखा कसा आहे? सौहार्दपूर्ण वातावरण कसं आहे? नागपूरला दंगलीचा इतिहास आहे का? पाहुयात.
नागपूर हे गोंड राजा बख्त बुलंद शाहने वसवलेलं शहर आहे.
नागपूरला आदिवासी, आंबेडकरी चळवळींचा मोठा इतिहास आहे. याच नागपुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 साली बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि बुद्धांच्या विचारांचा प्रचार प्रसार केला. हीच दीक्षाभूमी नागपुरात आहे. तिथं दरवर्षी लाखो अनुयायी येतात.
दुसरीकडे नागपुरात ताजबाग परिसरात ताजुद्दीन बाबांचा दर्गा आहे.
हिंदूत्वादी विचारांचा प्रचार-प्रसार करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय नागपुरात आहे.
अशा सगळ्या धार्मिक स्थळांचा इतिहास लाभलेलं हे नागपूर शहर. याच नागपुरात दरवर्षी रामनवमीला शोभायात्रा निघते त्यावेळी मुस्लीम बांधव या शोभायात्रेचं स्वागत करतात.
पण, याच नागपुरात 17 मार्चला दोन गटात हिंसाचार झाला. असा हिंसाचार उभ्या आयुष्यात पहिल्यांदा पाहिल्याचं अनेक लोक सांगतात. तिथले स्थानिक सुद्धा आम्ही हिंदू आणि मुस्लीम एकोप्यानं राहतो, मग असं कसं घडलं? असा प्रश्न उपस्थित करतात.
या हिंसाचारानंतर नागपुरात सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे कार्यकर्तेही दुःख व्यक्त करतात. यापैकी एक ज्ञानेश्वर रक्षक हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचे अभ्यासक आहेत.
रक्षक नागपुरात सामाजिक सलोख्याचं वातावरण कसं आहे? याबद्दल बीबीसी मराठीसोबत बोलताना म्हणाले, "नागपुरात विविध जाती संप्रदायाचे लोक एकत्र आणि गुण्यागोविंदानं नांदतात. इथं ताजुदीन बाबाच्या दर्ग्यावर सगळ्या धर्माची लोक माथा टेकायला जातात."
"उरुसात वेगवेगळ्या धर्माचे लोक सहभागी होतात. आमच्या नागपुरातल्या दीक्षाभूमीवर बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रचार प्रसार होतो. त्याच नागपुरात हे घडणं अत्यंत खेदजनक आहे."
पुढे बोलताना ज्ञानेश्वर रक्षक म्हणाले, "वेगळ्या विदर्भासाठी जांबुवंतराव धोटेंनी केलेलं आंदोलन असू द्या किंवा मराठवाडा विद्यापीठाच्या नामकरणावेळी झालेली आंदोलनं यावेळीही अशी परिस्थिती आणि असं वातावरण तयार झालेलं नव्हतं."
"कुठल्यातरी मेघायलयात दंगल होते आणि त्याचे पडसाद देशाच्या विविध भागात उमटतात. पण, माझ्या नागपुरात काहीच घडत नव्हतं. आपलं नागपूर असं केंद्र आहे जिथं मानवतेचा विचार प्रत्येकामध्ये रुजलेला आहे. याच शहरात अशाप्रकारची दंगल झाल्यानं आश्चर्य वाटतं."
पुढे ते विदर्भातल्या संत परंपरेचा दाखला देत धर्म कसा असायला हवा यावर सुद्धा भाष्य करतात.
ते म्हणाले, "बाह्य दिखावा हा धर्म नाही. अंतर्मनातील रागाची, लोभाची, द्वेषाची, मत्सराची जी घाण आहे ती घाण दूर करणे म्हणजे धार्मिकता आहे. म्हणजे अध्यात्मिकता आहे. याचा विचार विदर्भात तरी व्हायला हवा. कारण विदर्भाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगेबाबा असे संत लाभले."
"नागपूरच्या गंगा-जमुनी संस्कृतीला काळीमा फासणारी घटना"सामाजिक कार्यकर्ते प्रमोद मुनघाटे देखील नागपूरची बहूसांस्कृतिक रचना ही उदारमतवादी असल्याचं सांगतात. सोबतच ही दंगल टाळता आली असती असं त्यांना वाटतं.
ते म्हणाले, "नागपुरात झालेली घटना दुर्दैवी आहे. ही घटना टाळता आली असती. ही मानवनिर्मित दंगल आहे. काही दंगली दोन समाजाच्या अस्मितांच्या संघर्षातून होतात. याआधी झालेल्या आहेत."
"कालची दंगल टाळता आली असती. त्यासाठी आधी घडलेला घटनाक्रम पाहिला, तर छावा सिनेमा आल्यानंतर हिंदू-मुस्लिमांच्या संदर्भात काही नरेटीव्ह सोशल मीडियातून प्रसारीत झाले."
"राहुल सोलापूरकरांचं विधान, नागपूरच्या प्रशांत कोरटकरचं विधान आहे. याविरोधात सरकारनं कारवाई केलेली नाही. त्याआधीही हिंदू-मुस्लीम तेढ निर्माण करणारी वक्तव्य झाली आहेत."
"महाराष्ट्रात खरोखरच महत्वाचे प्रश्न आहेत. महाराष्ट्रात एक वर्षात दोन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मराठी शाळा बंद पडत आहेत. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे. हे सगळे प्रश्न दूर राहिले आणि आपण एका सिनेमापासून दंगलीपर्यंत कसे पोहोचलो? याचा विचार करायला पाहिजे."
हे नागपूरच्या गंगा-जमुनी संस्कृतीला काळीमा फासणारं असून हे घडू नये प्रत्येकानं काळजी घ्यायला हवी, असं शेतकरी प्रश्नांवर काम करणारे कार्यकर्ते अमिताभ पावडे सांगतात.
ते म्हणाले, "कुठंतरी कबरी उखडायच्या, कुठंतरी आणखी काहीतरी करायचं आणि कुठल्यातरी समाजाचं राक्षसीकरण करायचं. त्यातही ते समाज अल्पसंख्याक असले पाहिजेत याची काळजीही घेतली जाते."
"त्यात कधी दलित, कधी मुस्लीम, कधी ख्रिश्चन, तर कधी शीख भरडले जातात. हा लोकशाहीला अत्यंत घातक प्रकार आहे. याचा आम्ही निषेधच करणार."
"मुख्यमंत्र्यांना असं वक्तव्य शोभतं का?""सत्ताधारी पक्ष भाजपचे नेते व मंत्री नितेश राणे औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याची मागणी करतात. इतकंच नाहीतर नितेश राणे खुलेआम धमकीची भाषा वापरतात. काही आमदार, खासदारही औरंगजेबाच्या कबरीबद्दल हीच मागणी करतात."
"पण, सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांपेक्षा त्यांना साडेतीनशे वर्षांपूर्वीची औरंगजेबाची कबर महत्वाची वाटते का?" असा प्रश्न नागपुरातील सामाजिक कार्यकर्ते जगजीतसिंह उपस्थित करतात.
जगजीतसिंह म्हणतात, "नागपूर हे कॉस्मोपॉलिटीयन शहर आहे. इथं सर्व धर्माचे लोक एकोप्याने राहतात. आता औरंगजेब औरंगजेब म्हणून त्याला समोर आणलं जातंय."
"शिवजयंतीच्या दिवशी औरंगजेबाचा फोटो जाळणं त्यांचा सुनियोजित कट होता. त्यावर कोणाला आक्षेप नाही. पण, आमच्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणतात? औरंगजेबाची कबर उकरून फेकून द्यावी अशी मागणी लोकांची आहे, असं फडणवीस म्हणतात."
"जे संविधानाची शपथ घेऊन मुख्यमंत्री झाले त्यांना असं वक्तव्य शोभतं का? आताही ते म्हणतात की, औरंगजेबाच्या कबरीला दुर्दैवानं सुरक्षा द्यावी लागतेय. यांच्याकडे दुसरे कुठले मुद्दे नाहीत."
"आता साडेसात लाख रुपयांचं बजेट पास झालंय आणि साडेनऊ लाख रुपयांचं महाराष्ट्रावर कर्ज आहे. इतक्या योजनांची घोषणा केली आहे. इतक्या समस्या महाराष्ट्रात आहेत त्याकडे कोण लक्ष देणार आहे. त्यावर कोणी काही बोलत नाही. पण, औरंगजेबावर वक्तव्य करून त्याला पुढे आणलं जातं."
"सरकार शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनापासून लोकांचं लक्ष हटवण्यासाठी हे घडवून आणत आहे," असा आरोप अमिताभ पावडे करतात.
पावडे म्हणाले, "आपल्या राज्यात खूप प्रश्न आहेत. राज्यात शेतकऱ्यांचे खूप प्रश्न आहेत. मराठवाडा आणि विदर्भात 2706 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यात सगळ्यात जास्त अमरावती विभागात झालेल्या आहेत."
"विधानसभेच्या निवडणुकीत कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. पण, त्याला बगल देण्यासाठी असे प्रकार घडतात हे दुर्दैव आहे. मूळ प्रश्नांना बगल देण्यासाठी अशा गोष्टी केल्या जातात," असंही मुनघाटे यांना वाटतं.
ते पुढे म्हणाले, "महाराष्ट्रात महायुतीची एकहाती सत्ता आहे. महाराष्ट्राच्या जनेतची अपेक्षा होती की, राज्यातील जनतेचे प्रश्न सोडवले जातील. पण, विधानमंडळ सुरू झालं तेव्हापासून हे प्रश्न सोडवताना दिसत नाहीत. त्याऐवजी सामाजिक आणि धार्मिक अस्मितेचे मुद्दे उकरून काढले जातात."
"परवा छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदीर स्थापन झालं तिथे मुख्यमंत्र्यांनी भाषण केलं. मुख्यमंत्री राज्याचे पालक असतात आणि राज्याच्या शांतीसाठी काम करणं अपेक्षित असतं. पण, त्यांनी औरंगजेबाच्या कबरीवर भाष्य केलं. त्यांचे मंत्री तर बोलतातच. पण, हे सगळं टाळता आलं असतं. या मंत्र्यांना आधीच तुम्ही हे बोलू नका असं सांगितलं जाऊ शकलं असतं."
"मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नांवर फार बोलायला नको होतं. गेल्या तीन महिन्यात मंत्रिमंडळातील अंतर्गत प्रश्न समोर येतात आणि लोकांचे प्रश्न सोडवले जात नाहीत. लाडकी बहीण योजनेचं काय आहे आपल्याला माहिती आहे. या प्रश्नांवरून जनतेचं लक्ष हटवण्यासाठी हे केलं जातंय," असा आरोप पावडे यांनी केला.
नागपुरात याआधी कधी झाली होती दंगल?नागपूर तसं फार शांत शहर आहे. पण, इथून जवळपास 60 वर्षांपूर्वी नागपुरात दंगल झाल्याची आठवण ज्ञानेश्वर रक्षक सांगतात.
ज्ञानेश्वर रक्षक राष्ट्रसंतांच्या मोझरीच्या आश्रमात शिकायला राहायचे. पण, ते उन्हाळ्याच्या सुट्टीत नागपुरात आले, तेव्हा झालेल्या दंगलीच्या आठवणी ते सांगतात.
ते म्हणाले, "1968 ला नागपुरात एक दंगल झाली होती. ती देखील हिंदू-मुस्लीम दंगल होती. पूर्ण नागपूर शहरात आग पेटत होती. लोकांच्या झोपड्या जळत होत्या. केवळ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्यामुळे ही दंगल थांबली होती."
"यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रुग्णशय्येवर होते. ते कॅन्सरसोबत लढा देत होते. त्यांना कॅन्सरच्या वेदना होत होत्या. पण, दंगलीच्या बातमीनं महाराज अस्वस्थ झाले. त्यावेळी तुकडोजी महाराजांनी नागपूरचे समाजसेवक रतनचंदजी डागा आणि इतर धर्माच्या धर्मगुरुंना मोझरीला आश्रमात बोलावलं."
"तसेच सर्व धर्मगुरूंसह मोझरीच्या आश्रमात प्रार्थना सभा घेतली. यावेळी महाराजांना न बोलण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. पण, महाराजांची तीव्र इच्छा होती आणि डागा यांनी प्रयत्न केले. त्यामुळे महाराज व्हीलचेअरवर प्रार्थना सभेत आले."
यावेळी राष्ट्रसंतांनी सगळ्यांना एकच प्रश्न विचारला, "सर्वधर्म मानवाच्या कल्याणासाठी आहेत, तर मग तुमचे मतभेद का होतात? पोथी से पोथी झगडने लगी और प्यार की बाते बिघडने लगी. सर्व धर्मोपदेशकांनी आपली जबाबदारी खऱ्या अर्थानं पार पाडली, तर या देशात धार्मिक दंगे कधीच होणार नाहीत."
"माणसं माणसाजवळ माणुसकीनं येतील आणि जगाच्या पाठीवर हा देश सर्वधर्म समभावाचं प्रतीक बनेल. वाघ आणि शेळी यांच्यात प्रेम निर्माण केल्यानंतर जर ते एकाच घाटावर पाणी पिऊ शकतात, तर मग आपण माणसं आहोत."
"शेवटी धर्म, संप्रदायांपेक्षा देश मोठा आहे. त्याचं रक्षण करण्याची जबाबदारी आपली आहे", असं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज त्यावेळी म्हणाले होते.
या प्रार्थना सभेत स्वतः ज्ञानेश्वर रक्षकही उपस्थित असल्याचं ते सांगतात.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?या प्रकरणावर सभागृहात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, "राज्याच्या पोलीस महासंचालकांनी सर्व पोलीस आयुक्तांची बैठक घेऊन राज्यभर शांतता राखण्याचे निर्देश दिलेले आहेत."
"नागपूरमध्ये सकाळची घटना घडल्यानंतर मध्यंतरीच्या काळामध्ये पूर्णपणे शांतता होती. पण त्यानंतर संध्याकाळी काही लोकांनी जाणीवपूर्वक हल्ला केल्याचं लक्षात येतं आहे. एक ट्रॉलीभरून दगड मिळाले आहेत त्यामुळे हा हल्ला जाणीवपूर्वक करण्यात आला हे स्पष्ट होतं."
"काही लोकांनी दगड जमा करून ठेवलेले पाहायला मिळाले. मोठ्या प्रमाणात शस्त्रं देखील जप्त करण्यात आले आहेत. वाहनांची जाळपोळ करण्यात आली आहे आणि ठरवून काही ठराविक घरांना आणि आस्थापनांना लक्ष्य करण्यात आलेलं आहे. त्यामुळे अशाप्रकारे सुनियोजित पद्धतीने हल्ला केलेल्या लोकांवर नक्कीच कारवाई केली जाईल," असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले.
'छावा चित्रपटामुळे लोकांच्या भावना प्रज्वलित झाल्या आहेत'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितलं, "छावा या चित्रपटाने छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास आपल्यासमोर आणला. त्यामुळे राज्यातील लोकांच्या भावना प्रज्वलित झाल्या आहेत. औरंगजेबाविषयी असणारा राग समोर येतो आहे. त्यामुळे महाराष्ट्र हे प्रगतिशील राज्य आहे. मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत आहे आणि राज्यातील जनतेला कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचा केला पाहिजे, कुणीच दंगा भडकवण्याचा प्रयत्न केला तर त्याची जात धर्म न पाहता त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल."
"विधिमंडळाबाहेर बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांना सांगितलं की,"औरंगजेब हा महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे. त्यामुळे काही लोक हा कलंक पुसून टाकण्यासाठी काही लोक आंदोलन करत आहेत. ते चुकीचं नाहीये. औरंगजेबाने अन्याय केला, जुलूम केला आणि त्याचं उदात्तीकरण करणं महाराष्ट्र सहन करणार नाही. महाराष्ट्र अशा लोकांना माफ करणार नाही."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)