आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात 23 मार्चला सामना होणार आहे. या सामन्यात हार्दिक पांड्या खेळू शकणार नाही. त्यामुळे सूर्यकुमार यादवला संघाचं नेतृत्व करावं लागणार आहे. हार्दिक पांड्याला मागच्या पर्वात एका सामन्याची बंदी घातली गेली होती. त्या बंदीबाबत या पर्वात भुर्दंड भरावा लागणार आहे. आता आयपीएलच्या इतर कर्णधारांसोबत हार्दिकसारखं काही होणार नाही. कारण बीसीसीआयने या नियमात बदल केला आहे. आयपीएल 2025 पर्व सुरु होण्यापूर्वी बीसीसीआयने स्लो ओव्हररेटसाठी कर्णधारांना बंदी घालण्याचा नियम बदलला आहे. त्यामुळे यापुढे कोणत्याही कर्णधार स्लो ओव्हरसाठी सामन्याला मुकणार नाही. आयपीएलचं नवं पर्व सुरु होण्यापूर्वी बीसीसीआयने 20 मार्चला सर्व कर्णधारांसोबत एक बैठक घेतली. यावेळी कर्णधारांचं फोटोशूट झालं तसेच या बैठकीत काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चाही झाली.
चेंडूला चकाकी आणण्यासाठी लाळेचा वापर करणे, त्याचबरोबर दोन चेंडूंच्या वापराबाबत स्पष्ट केलं गेलं. दुसरीकडे, स्लो ओव्हर रेटचा फटका कर्णधारांना बसत होता. हा नियम देखील बदलला आहे. रिपोर्टनुसार, बीसीसीआयने स्लो ओव्हरसाठी दिली जाणारी शिक्षा ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियमानुसार केली आहे. आयसीसी नियमानुसार, स्लो ओव्हररेटसाठी कर्णधारा दंड आणि डिमेरिट पॉइंट दिला जातो. आता बीसीसीआय या नियमाची अंमलबजावणी करणार आहे. डिमेरिट पॉइंट कर्णधाराच्या खात्यात जमा केली जातील. हे डिमेरिट प्वॉइंट तीन वर्षांपर्यंत राहतील. बीसीसीआयने कर्णधारांना स्पष्टपणे सांगितले आहे की त्यांना डिमेरिट पॉइंट्स मिळतील पण कोणत्याही प्रकारची बंदी घातली जाणार नाही.
स्लो ओव्हररेट प्रकरण गंभीर असेल तर ‘लेव्हल-2’ अंतर्गत येईल आणि 4 डिमेरिट पॉइंट्स थेट दिले जातील. कर्णधाराला 4 डिमेरिट पॉइंट्स मिळताच, मॅच रेफरी कर्णधाराच्या मॅच फीच्या 100 टक्के रक्कम कापू शकतात किंवा अतिरिक्त डिमेरिट पॉइंट्स देऊ शकतात. गेल्या पर्वात मुंबई इंडियन्सने अनेक वेळा स्लो-ओव्हर रेटची चूक केली होती. कर्णधार आणि संघाला दंड ठोठावण्यात आला होता, परंतु शेवटच्या सामन्यानंतर हार्दिकवर एका सामन्याची बंदी घालण्यात आली होती. मागच्या पर्वात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार असलेल्या ऋषभ पंतवरही त्या काळात एका सामन्याची बंदी घालण्यात आली होती.