उल्हासनगर - महानगरपालिकेच्या स्थापनेपासून पहिल्यांदा महिला आयएएस अधिकारी असणाऱ्या मनीषा आव्हाळे यांनी आयुक्त पदाचा पदभार स्विकारला असून त्यांच्या हस्ते अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. त्यासाठी लेखा विभागाची यंत्रणा कामाला लागली असून येत्या एकदोन दिवसात अर्थसंकल्प सादर करण्याची तारीख निश्चित केली जाणार आहे.
मागच्या वर्षी महानगरपालिकेचा अर्थसंकल्प हा 977 कोटी रुपयांचा होता. यावर्षी अर्थसंकल्पात वाढ होणे अपेक्षित आहे. शासनाकडून दरमहा येणाऱ्या 22 कोटी 11 लाख रुपयांच्या अनुदानातून अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न मिटतो.
मुख्य उत्पन्नाचे स्तोत्र हे मालमत्ता कर विभाग, नगररचना विभाग असले तरी आणखी कोणत्या प्रकारे उत्पन्न वाढवले जाणार हे अर्थसंकल्पात समोर येणार आहे. रस्त्यां व्यतिरिक्त इतर कोणती विकासकामे हाती घेतली जाणार, शाळा, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाणी पुरवठा विभाग, विद्युत विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग आदींसाठी किती निधीची तरतूद केली जाणार आहे. पाणी, टॅक्स, बांधकामांची, बाजार परवान्यांची फी वाढवली जाणार आहे का ही आकडेवारी देखील अर्थसंकल्पात स्पष्ट होणार आहे.
याघडीला प्रशासक राजवट असल्याने व महापौर,उपमहापौर,स्थायी समिती सभापती सह लोकप्रतिनिधी नसल्याने सर्वेसर्वा ह्या आयुक्त तथा प्रशासक मनीषा आव्हाळे आहेत. त्यांच्याकडून शहर विकासाचा, नागरिकांच्या हिताचा अर्थसंकल्प अपेक्षित आहे.
आयुक्त यांची एकंदरीत कार्यप्रणाली व शेवटच्या अभय योजनेची केलेली घोषणा याचा विचार करता अर्थसंकल्पातून त्यांच्याकडून अनेक आशा असून त्या निराश करणार नाहीत, अशा अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.