गाडीत सख्खे भाऊजी होते, हिंजवडी हत्याकांडातील चालकाच्या कुटुंबाचा दावा; म्हणे, नाहक गोवलं जातंय
esakal March 21, 2025 08:45 PM

पुण्यात हिंजवडी परिसरात आयटी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना नेणाऱ्या मिनी बसला आग लागून चौघांचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र हा अपघात किंवा शॉर्टसर्किट नसून चालकानेच घडवून आणलेलं हत्याकांड असल्याची माहिती समोर येताच खळबळ उडाली. या प्रकरणी चालक जनार्दन हुंबर्डीकरवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, चालकाच्या कुटुंबियांनी या प्रकरणी धक्कादायक दावे केले आहेत. जनार्दनला विनाकारण गोवलं जात असल्याचा आरोप त्याच्या पत्नी आणि भावाने केलाय.

हिंजवडी हत्या कांड प्रकरणी जनार्दनवर आरोप होत आहेत. पण त्याच्या कुटुंबियांनी पोलिसांच्या तपासावर प्रश्न उपस्थित केलेत. जनार्दनचा जबाब तो शुद्धीत नसताना घेतला असून असा जबाब कसा नोंदवला असा प्रश्न कुटुंबियांनी विचारलाय.

कुटुंबियांनी असाही दावा केला की ज्या बसला आग लागली त्या बसमध्ये आरोपी जनार्दनचे सख्खे भाऊजीसुद्धा होते. अशावेळी जनार्दनने रिस्क कशी घेतली? जनार्दन हुंबर्डीकरच्या कुटुंबियांनी म्हटलं की, जनार्दन पूर्ण शुद्धीत नसताना पोलिसांनी त्याचा जबाब कसा नोंदवला? बसला आग लागली त्यात त्याच्या सख्ख्या बहिणीचे पतीही होते. त्यामुळे रिस्क घेऊन ते आग कशी लावतील?

पोलिसांच्या तपासावर प्रश्न उपस्थित करताना कुटुंबियांनी म्हटलं की, या घटनेत काहीजण वाचलेत त्यांना खरचटलंसुद्धा नाही. पेटलेल्या बसमधून ते सुखरुप बाहेर कसे पडले? जनार्दनने बसला आग लावली असेल तर त्यासाठीचं केमिकल कंपनीतून आणताना कुणीच कसं रोखलं नाही? असंही जनार्दनची पत्नी आणि कुटुंबियांनी विचारलं.

कंपनीने चालकाचा दावा फेटाळला

जनार्दनने त्याच्या जबाबात आपल्याला कंपनीकडून हीन वागणूक दिल्याचा आणि दिवाळीला पगार न दिल्याचा आरोप केला होता. त्याच रागातून हे हत्याकांड केल्याचंही जबाबात म्हटलं होतं. कंपनीने याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटलं की, आम्ही सध्या धक्क्यात आहोत. पोलीस तपास सुरू आहे. पोलिसांना सहकार्य करत आहोत. त्याचा कोणताही पगार थकित नाही. त्याला वेळोवेळी पगार दिलाय असं व्युमा ग्राफिक्सच्या मालकांनी सांगितलं.

काही दोष नसताना चौघांचा मृत्यू

जनार्दनचा ज्यांच्यावर रोष होता ते सुदैवाने या दुर्घटनेतून वाचले आहेत. जनार्दनने म्हटलं की, माझा रोष वेगळ्या लोकांवर होता. पण या घटनेत ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्याशी काहीच वाद नव्हता. काही दोष नसताना त्यांचे प्राण गेले. माझा हेतू फक्त कंपनीला धडा शिकवण्याचा होता.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.