M F Husain Artwork: प्रसिद्ध भारतीय चित्रकार एम.एफ. हुसेन यांच्या एका पेंटिंगने इतिहास रचला आहे. 'अनटाइटल्ड (व्हिलेज ट्रिप)' नावाची त्यांची पेंटिंग 1.38 कोटी डॉलर्स (सुमारे 118 कोटी रुपये) मध्ये विकली गेली आहे. भारतीय कलाकृतीसाठी ही आतापर्यंतची सर्वोच्च लिलाव किंमत आहे.
न्यूयॉर्कमधील क्रिस्टीज येथे झालेल्या या लिलावानंतर एका संस्थेने हे पेंटिंग विकत घेतले. 1954 मध्ये बनवलेल्या या पेंटिंगचा 70 वर्षांनंतर पहिल्यांदाच सार्वजनिक लिलाव करण्यात आला. या लिलावाने अमृता शेरगिलचा विक्रम मोडला आहे.
या पेंटिंगची सुरुवातीची किंमत 25 लाख इतकी होती. पण, अपेक्षेपेक्षा जास्त किंमतीला हे पेंटिंग विकले गेले. याआधी हुसेन यांची सर्वात महागडी पेंटिंग 'अनटाइटल्ड' होती. सप्टेंबर 2023 मध्ये ही पेंटिंग लंडनमधील सोथेबीज येथे सुमारे 26 कोटी रुपयांना विकली गेली.
या लिलावात अमृता शेरगिलचा विक्रमही मोडला. याआधी सर्वात महागड्या भारतीय कलाकृतीचा विक्रम अमृता शेरगिल यांच्या 'द स्टोरी टेलर (1937)' या पेंटिंगच्या नावावर होता. सप्टेंबर 2023 मध्ये हे मुंबईत सुमारे 63 कोटी रुपयांना विकले गेले.
हुसैन यांचे हे पेंटिंग 1954 मध्ये बनवण्यात आले होते. हे अंदाजे 14 फूट लांब आहे. यात भारतीय गावांची 13 वेगवेगळी दृश्ये दाखवली आहेत. 70 वर्षांनंतर पहिल्यांदाच ते लिलावासाठी लोकांसमोर आणले गेले.
ही पेंटिंग कोणी विकत घेतले?हे पेंटिंग प्रथम नॉर्वेजियन सर्जन लिओन एलियास वोलोडार्स्की यांनी खरेदी केले होते. 1954 मध्ये त्यांनी ते नवी दिल्लीत विकत घेतले. नंतर 1964 मध्ये त्यांनी ते ओस्लो युनिव्हर्सिटी हॉस्पिटलला दान केले. तेथे खासगी न्यूरोसायन्स कॉरिडॉरमध्ये ठेवण्यात आले होते. त्यामुळे सर्वसामान्यांना पाहण्यासाठी ते उपलब्ध होत नव्हते.
किरण नादर यांनी हे विकत घेतले असल्याचे सांगितले जात आहे. किरण नादर म्युझियम ऑफ आर्टच्या (KNMA) अध्यक्षा असलेल्या नादर यांनी मात्र यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
या लिलावातून मिळालेल्या पैशातून डॉ. व्होलोडार्स्की यांच्या नावाने डॉक्टरांसाठी प्रशिक्षण केंद्र बांधले जाणार आहे. आधुनिक भारतीय कलेचे जगभरात कौतुक होत असल्याचे या लिलावावरून दिसून येते. एम.एफ. हुसेन यांची कला आजही लोकांच्या हृदयात आहे.