हरिचरणगिरीत मोबाईल टॉवरसाठी उपोषण
esakal March 21, 2025 09:45 PM

swt2111.jpg
N52619
सावंतवाडी : सरपंच दत्ताराम दुतोंडकर यांना सरबत देऊन उपोषण मागे घेण्यासाठी सांगताना ठाकरे गटाचे विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ. बाजूला महेश सारंग, बाळू देसाई, नितीन मांजरेकर व अन्य

हरिचरणगिरीत मोबाईल टॉवरसाठी उपोषण
वायंगणी ग्रामस्थांची निदर्शने; १५ मे पर्यंत कार्यान्वित करण्याची बीएसएनएलची ग्वाही
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २१ः हरिचरणगिरी (आवेरा तिठा) वायगंणी येथील बीएसएनएलचा फोरजी टॉवर तत्काळ कार्यान्वित करा, या मागणीसाठी वांयगणी सरपंच दत्ताराम दुतोंडकर यांच्यासह ग्रामस्थांनी येथील बीएसएनएल कार्यालयासमोर उपोषण केले. यावेळी हा टॉवर १५ मेपर्यंत कार्यान्वित करण्याची लेखी ग्वाही अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. त्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले.
बीएसएनएलकडून हरिचरणगिरी (आवेरा तिठा) वायगंणी येथे सहा-सात महिन्यांपूर्वी फोरजी टॉवर उभारण्यात आला आहे; परंतु टॉवर कार्यान्वित नसल्याने तेथील बीएसएनएलचे ग्राहक सेवेपासून वंचित राहिले आहेत. वेळोवेळी बीएसएनएल कार्यालयाशी संपर्क साधूनही टॉवर कार्यान्वित करण्यासाठी टाळाटाळ होत असल्याने अखेर ग्रामस्थांनी सरपंच दत्ताराम दुतोंडकर यांच्या नेतृत्वाखाली येथील बीएसएनएल कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. या उपोषणाला शिवसेना ठाकरे गटाचे विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, बाळू देसाई, मायकल डिसोजा, अशोक धुरी, विनोद ठाकूर, शिंदे गट तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांनी भेट देत पाठिंबा दर्शविला. हा टॉवर कार्यान्वित करण्यासाठी लागणारी मायक्रोवेव्ह कनेक्टिव्हिटी मिळत नसल्याने अन्य कनेक्टिव्हिटीसाठी प्रपोजल वरिष्ठ कार्यालयापर्यंत पाठविण्यात आले आहे. यासाठी कार्यालयाकडून वेळोवेळी पाठपुरावा सुरू आहे. ही कनेक्टिव्हिटी मिळण्यासाठी कमीत कमी दोन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याने १५ मेपर्यंत टॉवर कार्यान्वित करण्याची लेखी ग्वाही यावेळी बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. त्यानंतर ग्रामस्थांनी उपोषण स्थगित केले. यासाठी उपस्थित सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले.
या उपोषणामध्ये उपसरपंच रवींद्र धोंड, भाजप सरचिटणीस प्रशांत प्रभुखानोलकर, माजी ग्रामपंचायत सदस्य आनंद दाभोलकर, माजी ग्रामपंचायत सदस्य भिकाजी गावडे, ग्रामपंचायत सदस्य अनंत मठकर, ग्रामपंचायत सदस्य अनंत केळजी तसेच ग्रामस्थ प्रताप करंगुटकर, सुनील प्रभुखानोलकर, विलास मांजरेकर, प्रकाश नागोळकर, सचिन वाडेकर, सत्यवान दुतोंडकर, शशिकांत असोलकर, श्रीकृष्ण हळदणकर, रवींद्र शिरोडकर, साहिल सावंत, नीलेश म्हापणकर, जयेश आकेरकर, समीर केळुसकर आदींनी सहभाग दर्शवला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.